Saturday, 26 April 2025

३०. कृषी मेळावा


भाग : २८

     मुंबईत साक्षी आपले पुढचे शिक्षण पूर्ण करत होती. ऍग्री प्रोडक्ट मार्केटिंगचा एम बी ए कोर्स ती तिच्या शहरातून करत होती. डिग्रीच्या दुसऱ्या वर्षाला असताना कॉलेजच्या माध्यमातून एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास सांगितले होते. एक दिवस साक्षी आणि सुमती, साक्षीचे बाबा संध्याकाळी त्या मेळाव्याला भेट देण्यासाठी निघाले.

तिथे मोठ्या प्रमाणात शेतकरी, होलसेल विक्रेते, वितरक आले होते. वेगवेगळ्या नवनवीन शेतमालाला व्यासपीठ मिळावे या हेतूने केलेले हे आयोजन साक्षी तास भर पाहत होती. बाबांना कौतुकाने त्याबद्दल माहिती ही देत होती. तिला तिच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून यातल्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या. त्याची उजळणी तिची मनोमन सुरू होती.     

चालता चालता तिथेच एक मोठे बॅनर तिने वाचले. त्यावर गोडीवलीचे चित्र होते. मोठे मोठे द्राक्षांचे मळे आणि भानू चा ही फोटो त्यावर होता. शेतकऱ्याच्या पोशाखातला त्याचा फोटो पाहता क्षणी साक्षीने ओळखला. तिने जवळ जाऊन पाहिले आपल्याच ओळखीचे हे असल्याचे तिला जाणवले. आई बाबा पुढेच होते. नक्की काय ते पाहावे म्हणून ती दोन पावले मागे आली. तिथे नचिकेत बसला होता. फॉर्मल वेशातील नचिकेतला साक्षीने ओळखायला थोडा वेळ घेतला. साक्षी तिथेच थांबली. तो उठून उभा राहिला. तिच्या सोबत आलेले आई बाबा पुढे गेले होते. 

नचिकेतने साक्षीला मात्र लगेच ओळखले आणि म्हणाला " साक्षी ... कशी आहेस ? " 

साक्षीला आश्चर्याचा धक्का बसला. साक्षी म्हणाली " मी ठीक आहे पण तू इथे... गावापासून दूर मुंबईत ? "

नचिकेत म्हणाला " हो ... आपले प्रोडक्ट गावात आणि जवळपास खूप विकले गेले. लोकांना आवडले. त्यांनी मला इथे पाठवले त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलो आज बघ , हे संपले की परत आपल्या गावी जाणार " 

साक्षी त्याच्याकडे पाहत राहिली, हा तोच मातीत, शेतात रमणारा नचिकेत आहे त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. त्याच्या पेहरावात सुद्धा आता आमूलाग्र बदल झालेला होता, नचिकेत बिजनेस मॅन झाला होता. ती म्हणाली "... तू खूप बदलला आहेस, नचिकेत " 
    
नचिकेत म्हणाला " हो ... बदल आवडला आहे हा मला साक्षी ... त्याच वर्तुळात राहून पुढची वाट मिळत नव्हती. शेवटी आलो इथवर.आपल्या प्लांटला हळूहळू अजून डझनभर हात आणखी जोडले गेले. आता फार मोठे वर्तुळ झाले ते. साक्षी... परत येतेस का ओढ्यावरचा सूर्यास्त पाहायला ? " साक्षी भावून झाली.

आपल्या हाताने सुरवात करून मांडलेले प्रॉडक्ट ती हातात घेऊन पाहत होती. आता नवा साज चढला होता. 

नचिकेत म्हणाला " तुला आठवते का एकदा म्हणलेलीस " गावाच्या  सीमा बांधून ठेवतात... आज त्या सीमा पार करुन आलो बघ... मिस्टर साठेंच्या मदतीने आपले प्रोडक्ट देशाबाहेर ही जाणार आहे. " 

आपले शब्द आज ही नचिकेतच्या लक्षात आहेत आणि हा बदल झाला नसून घडवून आणला आहे. याचे निमित्त मी असेन या विचाराने साक्षी मनोमन खुश झाली. बोलायचे बरेच होते पण साक्षी काहीच बोलली नाही. फोन वाजला आणि "  लवकरच भेटू " इतकं बोलून ती पुढे निघून आली. नचिकेत तिच्याकडे पाहत राहिला, अगदी तसाच  ज्या प्रमाणे साक्षी गोडीवलीतून जाताना तो पाहत होता. त्याच वेळी नचिकेतचा फोन वाजला, तो फोन साक्षीचा होता आणि त्याच्या फोनमध्ये डिलीट केलेला साक्षीचा नंबर पुन्हा एकदा सेव्ह झाला गोष्टीची नव्याने सुरुवात करण्यासाठी तो ही कायमचा...

★★★★★★★★★समाप्त★★★★★★★★★★

Thursday, 24 April 2025

२९. निरोपाचा क्षण

भाग : २७

     पुढच्या दोनच दिवसात नव्या सेटअपचे पहिले प्रोडक्ट तयार झाले. सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला. नव्या लावलेल्या कलमांना ही टपोरी गोड द्राक्षे लागलेली दिसली.  दोन्ही कामात यश मिळाले होते. सगळे मजूर, माई, अण्णा, भानू, रेणू, मिस्टर साठे त्यावेळी तिथे उपस्थित होते. प्रत्येकाच्या मेहनतीचे फळ उत्तम आणि भरगोस मिळाले. त्या दिवशी साक्षी, आराध्या, सुमित, नचिकेत परत ओढ्यावरचा सूर्यास्त पाहायला गेले. खर तर ती संध्याकाळ संपूच नये असे प्रत्येकाला वाटत होते. पुस्तकातला एक धडा संपतो म्हणजे पूर्ण पुस्तक संपले असे होत नाही. काही वेळा ती नव्याची सुरुवात असते. कदाचित साक्षीला हेच हवे होते. नवे काही तरी या गावाच्या मातीत पेरून या कथेचा शेवट तिला करायचा होता. गोडीवलीत तिच्या या धड्याचा शेवट जवळ आला होता  याची तिला जाणीव झाली. अंधार वाढल्यावर सगळे माघारी आले.
          
साक्षी ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सगळ्यांचा निरोप घेऊन निघणार होती. साक्षी सकाळी आपले सामान सुमान घेऊन खाली आली. सगळ्यांना भेटली. माई, अण्णा, आराध्या कोणाचीच साक्षीला अलविदा करण्याची इच्छा नव्हती. निघताना तिला तिथे नचिकेत कुठेच दिसला नाही. ती सगळ्यांमध्ये त्याला शोधत होती. तिला नंतर कळले, पहाटेच तो प्रयोगशाळेत गेला आहे. शेवटी ती निघाली. सुमित तिला सोडायला तिच्यासोबत निघाला.

सुमितने गाडी मुद्दाम बागेच्या रस्त्याने  नेली. तिथे थांबवून साक्षीने सगळ्या मजुरांचा ही निरोप घेतला. रेणू, भानू आणि योगायोगाने भानूच्या मैत्रिणी सखू, सुमी,चिंगी तेव्हा चरायला तिथे आल्या होत्या. त्याचा ही निरोप घेतला. मनोमन जुन्या आठवणी आठवत तिच्या चेहऱ्यावर हसू आले होते. 

" भाऊ... या मैत्रिणींना कधी एकटे सोडू नका ... मी तुम्हा सगळ्यांना मिस करणार आहे ... माझी आठवण कायम सोबत असुद्या " तिने एक छान से पेन भानूला भेट दिले. म्हणाली " तुमच्या सगळ्या प्रश्नांना या पेनाने लिहुन ठेवत जा ... मला माहिती आहे. सायंटिस्टना सारखे प्रश्न पडतात आणि तेव्हाच नवे शोध लागतात. तुम्ही ते नक्की कराल भाऊ... " 

भानू भावुक झाला, खाली झुकला. साक्षीने शर्टाच्या खिशाला ते पेन लावले. रेणू मागुन हे सगळे पाहत होती. रेणूच्या जवळ जाऊन साक्षी म्हणाली, 

" रेणू ताई, मी सोनल ची जागा कधीच घेऊ शकणार नाही. पण मी सतत त्याचा प्रयन्त केला. माझं काही चुकलं असेल तर सॉरी ... तुझ्यातली झाशीची राणी अजून माझ्या सोबत आहे. ती माझ्यात होतीच. आता तिला आणखी एक आई मिळाली. तुला खूप मिस करेन मी रेणू ताई " 

रेणू काहीच बोलली नाही. ती मनातून फक्त खूप सारे आशीर्वाद देत होती. साक्षी वळली तेव्हा फक्त " पुन्हा कधी येणार साक्षी ताई ? " इतकंच ती बोलली. साक्षी काहीच बोलली नाही, जाऊन गाडीत बसली. तिथूनच तिने रेणूला अलविदा केले. सुमितला तिथून निघायला सांगितले. गाडी थेट बस स्टँडकडे न्यायला सांगितले. 

होकारार्थी मान हलवून ही सुमितने गाडी मात्र थांबवली ती ओढ्यापाशी ... तो म्हणाला " उतर एक मिनिटं ..  हा आमच्या गावचा ओढा आवडला ना तुला... जा एकदा जवळून बघून ये शेवटचं " 

साक्षी आता गाडीतून उतरणारच नव्हती. पण तिचे मन तिला त्यासाठी भाग पाडत होते. ती शेवटी उतरलीच. सुमित गाडीतच बसून होता. दूर कट्ट्यापाशी पाठमोऱ्या आकृतीत कोणीतरी बसलेले तिला दिसले. दोघे जण होते. तिने पुढे जाऊन पाहिले तर तीच सहा वर्षांची बाहुलीसाठी घर मागणारी मुलगी नचिकेत सोबत बसली होती. तिला ही तो ओढा आवडला होता. आता ही तिच्या एका हातात ती बाहुली होती आणि दुसरा हात नचिकेतने घट्ट पकडला होता. सोनलसाठी आणलेला तो झगा तेव्हा त्या मुलीने घातला होता. अबोली रंगाच्या फ्रॉक मध्ये तिला पाहून साक्षीच्या डोळ्यात पाणी आले. क्षणभर सोनल समोर बसल्याचा भास झाला. बाहुली घेऊन ती मुलगी उतरली आणि साक्षीला पायाशी जाऊन मिठी मारली. साक्षी खाली बसली. तिला पापी देऊन मिठीत घेऊन रडू लागली. 

हे सगळे सुरू असताना नचिकेत फक्त पाहत होता. आपल्या वाटचा आनंद समोर त्या मुलीच्या जवळ ओसंडुन वाहत होता. फार काही न बोलता त्याने फक्त इतकंच म्हणलं " पुन्हा भेटू ... साक्षी, मी तुझी वाट पाहीन "

साक्षीने नचिकेत कडे पाहिले, ती काहीच न बोलता गाडीत जाऊन बसली. बघता बघता साक्षीचा सुरू झालेला प्रवास परतीच्या वळणावर येऊन थांबला होता. फरक इतकाच होता की यावेळी घरची ओढ तिला तिथे थांबू देत नव्हती. पण तिचे मन मात्र तिथेच रेंगाळत होते. ओढ्यावर. दोलायमान मनस्थितीत शेवटी आपल्या परिघातून बाहेर आलेल्या तिच्या व्यक्तीमत्वाला तेच वर्तुळ पुन्हा बोलवत होते. जाता जाता इथे एक मोठे वर्तुळ निर्माण करून तिने सारेच सिद्ध केले होते. निघताना वर आलेला सूर्य त्या वर्तुळाची तिला जाणीव करून देत होता. त्याकडे पाहतच ती गाडीत बसली आणि सुमितने गाडी सुरू केली. नचिकेत गाडीला दूर जाताना पाहत राहिला. त्याच्या आयुष्यात नकळत आलेले हे एक सुंदर स्वप्न होते... साक्षी... जे आता संपले असं त्याच्या मनाला वाटू लागले. साक्षी परत मुंबईला गेली. 

क्रमशः 

२८. परतीचा प्रवास

भाग : २६

         साक्षीच्या वागण्यातला बदल नचिकेतला जाणवला होता. त्याने घरी येऊन आराध्याला विचारले.

 " साक्षीचा हात कसा आहे आता ... ती ठीक आहे ना ... आज काही तरी वेगळीच वागत होती. तिला घरची आठवण येते का ? 

आराध्या म्हणाली " मला तसे काहीच वाटलं नाही. मी आली तेव्हा खोलीत ती आराम करत होती. नंतर तस आमचं फारसं बोलणं झालं नाही. तिला मी जेवणानंतर विचारते. ती आज खाली पण फार दिसली नाही. खोलीतच आहे. जेवणासाठी मी तिला बोलवायला जाते. तेव्हा येईल ती खाली " 

नचिकेत " बर ... बोलावं तिला " इतकंच म्हणाला आणि तिथून तडक खोलीत निघून गेला. जेवणाच्या वेळी सगळे आपापल्या जागेवर बसले. आराध्याने मुद्दाम विषय काढला

 " आता कसे काम सुरू आहे दादा... होतच आले असेल ना आता "

नचिकेत म्हणाला " हो ... जवळपास झालेलेच आहे, तीन दिवसात आपल्याला रिझल्ट मिळतील. आपले प्रॉडक्ट बनून ते व्यवस्थित राहते की नाही ? किती दिवस टिकते ? हे पाहायला पुढे थोडा वेळ जाईल. पण महत्वाचं काम आता जवळ जवळ झालेच आहे. "

 सुमित म्हणला " अरे वा ... म्हणजे मग आता परत आपल्याला ओढ्यावरचा सूर्यास्त पाहायला जाता येईल तर... हो ना साक्षी " 

साक्षीने एकदा नचिकेतकडे पाहिले आणि सुमितला म्हणाली " हो आपण जाऊन येऊ एकदा. माई, आण्णा काम आता शेवटच्या टप्यात आले. एक दोन दिवसात ते ही होईल. मग मी पुन्हा माझ्या घरी जायचा विचार करते. " 

आराध्या हे ऐकून म्हणाली " काय... अग लगेच  परवा म्हणजे. थांब की अजून काही दिवस, माझा या महिन्यात प्रोजेक्ट पूर्ण होतोय दोघी एकत्र जाऊया की परत " 

साक्षी म्हणाली " आरु... नको अग आता अजून. हे सगळे लिहून मला पुढच्या ऍडमिशनची तयारी करायची आहे. त्याला आणखी वेळ लागेल. मी इथले सगळे काम पूर्ण करूनच जाणार आहे. पण आता जाऊ दे मला " 

कितीही लाटा दूर दूर वाहत गेल्या तरी किनाऱ्याला आदळून पुन्हा आपल्याच वाळूत येऊन शांत होतात. तसे काहीसे साक्षी चे झाले होते. तिने तिच्या मनाशी ठरवले होते. काहीही झाले तरी आपल्या घराच्या वाटेवर पुन्हा जायचे. घराची ओढ तिला सतत माघारी बोलवत होती. 

सुमित, भानू, रेणू काहीच बोलले नाही. नचिकेत जेवण करून उठला आणि काहीच न बोलता आपल्या खोलीत निघून गेला. 

माई म्हणाली " साक्षी ... तू आलीस आणि आम्हा सगळ्यांसाठी एक आमच्या घरातलीच सदस्य झालीस ... कळलं पण नाही की तू आराध्याची मैत्रीण म्हणून आलीस, आम्ही विसरून गेलो की तू परत तुझ्या घरी जाणार आहेस ... बाळा खूप प्रगती कर, पण आम्हाला विसरू नकोस. " माईच्या डोळ्यात पाणी आले.

सगळ्यांची जेवण आटोपली. सगळे आपापल्या खोलीत गेले. साक्षीचा निर्णय हळूहळू सगळ्यांना मान्य झाला. नचिकेतच्या मनात मात्र साक्षीने प्रेमाचे बीज रोवले जे आता काही झाले तरी साक्षीचा निर्णय मान्य करत नव्हते. नचिकेतला साक्षीचे दूर जाणे मनाला वेदना देत होते. क्षणभर त्याच्या मनात तिच्या सोबत शहरात जाण्याचा ही विचार आला. त्या विचारात तो झोपी गेला.

 क्रमशः

Wednesday, 23 April 2025

२७. न तुटणारे बंध

भाग : २५

साक्षी तिच्या खोलीत आली. ती विचार करू लागली. आजवर झालेल्या प्रत्येक घटनेची ती साक्षीदार होती. न तुटणारे बंध आपसूकच जोडले गेले होते. बोलता बोलता नचिकेतच्या काळजाच्या अगदी जवळच्या दोन गोष्टी, गाव आणि द्राक्ष बाग यावर आपण त्याला उगाच बोललो याची तिला तेव्हा जाणीव झाली. अपराधीपणाची रेघ तिच्या मनावर कोरली गेली. कायमचीच. त्याच विचारात तिने आपला दुखरा हात हातात घेतला. आदल्या दिवशी झालेल्या  अपघाताचे व्रण तिच्या हातावर होते. सूज ही थोडीफार दिसत होती. जखमावरची फुंकर तेव्हा तिच्यासाठी अजाणतेपणी नचिकेत झाला होता त्यातच नचिकेतचा त्यावेळी आईला फोन आला. साक्षीची चौकशी केली. तिला घेऊन डॉक्टरकडे जाण्यास सांगितले. साक्षीला हे ऐकुन मनोमन आनंदच झाला. तेव्हा माईने सुमितला सोबत घ्यायला सांगितले. सुमित तिला  डॉक्टरकडे घेऊन गेला. येता येता त्याने बऱ्याच दिवसांपूर्वी भानू, आणि नचिकेतचे दारा अडून ऐकलेले बोलणे साक्षीला सांगितले. साक्षीला सुमितच्या तोंडुन सगळे ऐकताना फार मोठा धक्का बसला. जी गोष्ट काल परवा आपल्याला ही माहिती नव्हती, त्यावर भानू, सुमित आणि इतर सगळे चर्चा करत असल्याचे तिला जाणवले. मनातुन ती दुखावली गेली. पण याबद्दल ती कोणाशी ही काहीच बोलली नाही. दवाखान्यात डॉक्टरांनी पुन्हा व्यवस्थित ड्रेसिंग केलं. दोघे ही घरी आले.

दुसऱ्या दिवशी नचिकेत तिच्यासाठी थांबला होता. दोघे एकत्र च मळ्यात जाऊ असा त्याचा मानस होता. ती त्याच्या सोबत गेली. पण फार काही बोलली नाही. तिथे गेल्यावर ही तिला हाताला च लागल्याने फारसे काही करता येत नव्हते. प्रत्येक वेळी तिची होणारी धडपड नचिकेत बघत होता. तिला मदत करण्यासाठी तो पुढे येऊन काही तरी करत आणि ती त्यामुळे आणखी दूरावली जात. काहीच काम धड होत नाही हे त्या दिवशी तिला जाणवले आणि तिने तसे त्याला सांगितले . दुपार नंतर रेणू डबा घेऊन आली. हाताला जखम झाल्यामुळे तिला जेवण ही करता आले नाही. नचिकेत म्हणाला

 " मी काही मदत करू का ? " 

तिने मदतीसाठी रेणू कडे पाहिले. रेणूच्या ही गोष्ट लक्षात आली. तिने साक्षीला काही घास भरवले. जेवण झाल्यावर तिने नचिकेतला विचारले,

 " माझं काहीच काम झालं नाही आज... पुढे ही होईल असं वाटत नाही. मी घरी गेलं तर चालेल का ? 

त्याने होकारार्थी मान हलवली. शेवटी रेणू सोबत ती घरी गेली. बराच वेळ ती सुमितने सांगितलेल्या गोष्टीचा विचार करत होती. तिने रेणूला विचारले, 

" रेणू ताई ... आपलं काम करण्यात मी कुठे कमी पडते का ? " 

रेणू म्हणाली " नाही साक्षी ताई... असं का वाटलं तुम्हाला " 

 " नक्की ना ... माझं कामात लक्ष आहे हेच महत्वाचे हो ना "  - साक्षी

 " हो ताई... तुम्ही किती मन लावून काम करता ... तुमचं कामात लक्ष नाही असं कोण म्हणेल " 
मला फक्त नाव सांगा... मग दाखवते त्याला काम काय असते ते " - रेणू

साक्षी हसायला लागली. म्हणाली " तू पण ना रेणू ... सोनलमधली दडलेली खरी झाशीची राणी तूच आहेस बघ " - साक्षी

सोनलचे नाव अचानक काढले आणि रेणूला गहिवरून आले. साक्षीला ते जाणवले. ती लगेच तिच्या जवळ गेली.

 " रेणू ताई... सॉरी ग मला अस काही बोलायलाच नको होते... आय एम सॉरी " 

रेणूचे डोळे पुसून ती रेणूच्या मिठीत शिरली. रेणूने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली,

 " आपली काळजी घेणारं, आपल्याला ओळखणार, आपली आवड निवड जपणार एक माणूस सोबत असणं हे खरंच भाग्याचं लक्षण हाय ... तुम्ही खरंच लय भाग्यवान ताई... एवढी समदी जण तुमच्या जवळ आहेत, माझ्या सोनलच्या पदरचे सुख बी तुमच्या झोळीत पडो हीच त्या विश्वेश्वराला प्राथना " इतकं बोलून ती डोळे पुसत तिच्या खोलीतून निघून गेली. 

दिवसभरात झालेल्या घडामोडींचा साक्षी मागोवा घेत खिडकीशी बसली. नचिकेत, सुमित, भानू, माई आणि आता रेणू सगळेच तिच्या विचारांच्या भिंती भक्कम करत होते. एक क्षण हळवे झालेले मन दुसऱ्याच क्षणाला उसळून यावे. आठवणीत रमणाऱ्या मनाची अचानक चलबिचल व्हावी अशी काहीशी मनस्थिती तिची तेव्हा झाली होती.

क्रमशः 

Tuesday, 22 April 2025

२६. जुन्या आठवणी

भाग : २४

        रेणूने साक्षीला हाक मारली. नचिकेत क्षणार्धात भानावर आला आणि दूर झाला. साक्षी तिथेच बसली होती. रेणूने येऊन तिला पोटाशी धरले. तिच्या पाठीवरून हात फिरवत ती तिथेच थांबली.  नचिकेत तडक बाहेर निघून आला. भानू त्याच्या मागे मागे आला.  भानू तेव्हा काहीच बोलला नाही. दोघेही बाहेरच्या काळ्याकुट्ट अंधारात कट्ट्यावर बसले. नचिकेतला क्षणभर काय होते हे ही कळले नाही. भानूने नंतर थोड्या वेळाने त्यांना विचारले,

" घरी वाट पाहत असतील ना समदी ... निघुया का दादा ? "

नचिकेतने त्याला आलिंगन दिले. त्याला म्हणाला,

" भानू होईल ना सगळे ठीक ... प्रत्येक जण मेहनत करतोय, यशाच्या वाटेवर इथे आनंद तर आहेच पण सोबत खोलवर होणाऱ्या जखमा पण आहेत रे... त्या बघवत नाहीत. " 
 
भानू म्हणला " दादा... तुम्ही काळजी करू नका ... होईल समद ठीक " 

भानू काही वेळ नचिकेतकडे पाहत मनातल्या मनात म्हणत होता. " देव तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका दादा "

कधी कधी काही गोष्टी का घडतात याची कारणे आपण बरेचदा शोधत असतो. खूप प्रयन्त केला तरी त्याचे उत्तर मिळत नाही. आपल्या मनातल्या वादळाला शांत करणारी व्यक्ती आपल्या शेजारी येते. आपल्या ही नकळत. बसते आणि हवी तशी शांतता आपोआप मिळते. प्रश्नोत्तराच्या वादळात शांत करणारी तशी व्यक्ती कधी कधी आपल्यासाठी देवासारखी होऊन जाते. आज नचिकेतला भानू मध्ये तसेच काहीसे दिसले. नचिकेत आणि भानू तिथून उठले गाडीत जाऊन बसले. भानूने बाहेरूनच हाक दिली 

" रेणू ताई, साक्षी ताई चला निघू आता " 

रेणू साक्षीला घेऊन आली. घरी पोहोचल्यावर आराध्याने साक्षीचा हात पाहिला. धावत जवळ आली. साक्षीचा हात बघून आराध्याने रेणूला विचारले,

" रेणू ताई, हे काय झालं हिला ? " - आराध्या

" ताई काच लागली... त्याची जखम झाली. दादांनी मलमपट्टी केली. साक्षी ताईला आराम करुदे ..." - रेणू

" साक्षी चल वर, उद्या डॉक्टर कडे जाऊ आपण... बघू किती लाल झाला हात... बापरे " - आराध्या

" अग विशेष काही नाही. दिवे गेले त्यामुळे कळलं  नाही इतकंच आता मी ठीक आहे आरु " साक्षी तिथेच बसली आणि म्हणाली. 

माईने आल्या आल्या तिला औषध गोळ्या दिल्या. लागलीच जेवण ही झाले. साक्षी आराम करायला खोलीत गेली. 

औषध घेतल्यामुळे तिला लगेच झोप लागली. नचिकेत काही रात्रभर झोपला नाही. दुसऱ्या दिवशी साक्षीला उठायला उशीर झाला. तो पर्यंत सगळे आपापल्या कामाला निघून गेले होते. साक्षी उठल्यावर माईने साक्षीची विचार पूस केली. तिला एक दिवस घरीच आराम करायला सांगितला. तिने त्या दिवशी घरी राहून च थोडे फार काम केले. बाकी वेळ माईसोबत बोलण्यात गेला. आराध्या, सुमित, भानू, नचिकेत सगळ्यांविषयी ऐकताना साक्षीला भारी कुतूहल वाटले. माई सांगता सांगता आठवणीत रमून गेली

 " आराध्या लहान होती ना तेव्हाची गोष्ट आहे साक्षी, एकदा नचिकेत आराध्याला घेऊन शहरात गेला होता. त्यात सुमित पण लहान होता. दोघे ही शाळेत शिकत होते. कॉलेजची सुट्टी होती तेव्हा दादा घरी आला होता. फार हौसेने दोघांना शहरात घेऊन गेला. दिवस भर फिरल्यावर परतीच्या प्रवासात आराध्याला सुमितने गाडीच्या मागच्या सीट वर बसायला सांगितले. ही आमची आरु झोपली तिथेच आणि कधी मागे डिकी पर्यन्त गेली कळलं नाही. सुमितला माहिती होते ती झोपलेली पण पठ्ठ्याने सांगितले नाही. मोठा गोंधळ झाला. नचिकेतला खूप मारले अण्णानी. गाडी पुन्हा जाऊन पहायची ही त्याला भ्रांत नव्हती. तो रात्र भर जेवला नाही. की कोणाशी बोलला नाही. आराध्या कुठे असेल या भीतीने आम्ही झोपलो ही नाही.  आता सारखे तेव्हा रस्तावर दिवे ही नव्हते. त्यामुळे सकाळ ची वाट पाहत रात्र काढली. दुसऱ्या दिवशी तशाच रडवेला चेहरा घेऊन नचिकेत आराध्याला शोधायला निघाला. गाडीत कोणी असेल हे ही त्याला कळले नाही. शेतातुन गाडी जाताना उड्या मारू लागली. त्यामुळे आराध्याला जाग आली. ती गाडीत रडायला लागली. तास भर दोघे तिकडेच होते. आराध्याला शांत करता करता दादा ची पार नाकेनऊ आलेली ग ... " 

माई हे सगळे सांगताना साक्षीला कंपनीत झालेला अपघात, ओढ्यावरचा घालवलेला तो दिवस आठवला. काजव्याच्या प्रकाशातले ते झाड आठवले. 

माई पुढे सांगत होती " तो प्रसंग आठवला की घरी कधी कधी हशा पण पिटतो. नचिकेत मात्र त्या दिवसापासून अगदी जबाबदार मुलगा झाला. कॉलेज संपवून जो घरी परत आला. तो आज वर सगळ्यांची काळजी घेत सोबत आहे, बघ. आम्ही सगळे त्यामुळे अगदी निश्चिंत आहोत. या घराला, शेतीवाडी, बागा या सगळ्यांना त्याची सवय लागली. त्याने ही फार जीव लावला आहे बघ साक्षी. अचानक माईंच्या डोळ्यात पाणी तरळू लागले. साक्षीने भावनेच्या भरात त्यांना आलिंगन दिले. नचिकेत आणि भानू साक्षीच्या अगदी जवळची दोन माणसे झाली होती. ती ही तेव्हा रडू लागली. माईने हसून तिचे डोळे पुसले.. " असेच असते बघ... तुझ्या डोळ्यात पाणी ... वेडा बाई...दूरवर कुठेतरी बोलवणारे आपलेच आपल्याला शोधत येते. तू जशी आमच्यात आलीस. " 

दोघींच्या गप्पा तासभर सुरू होत्या. माईसोबत गप्पा मारताना आपसूकच साक्षीला आपल्या आईची आठवण झाली. ती भावुक झाली. माईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आपल्या आईला जशी मिठी मारायची तशीच मिठी साक्षीने माईला मारली. 

क्रमशः 

Monday, 21 April 2025

२५. हळवे तरंग

भाग : २४

      नचिकेत धावत प्रयोगशाळेत आला. त्याने साक्षीला पाहिले, तिथे इतरत्र काचा पडलेल्या दिसल्या. क्षणभर तो स्तब्ध झाला.  चुकीच्या ठिकाणी बर्नर आणि बिकर ठेवल्याने गरम होऊन तो फुटला होता. नचिकेतचे लक्ष साक्षीच्या हाताकडे गेले. बिकरची काच तिच्या हाताला लागली.  तो बाजूला करताना बर्नरचा  चटका लागून हाताला सूज ही आली आणि भळाभळा रक्त ही वाहू लागले. अंधारात काही कळत नव्हते. नचिकेत आत आला. त्याने टॉर्च सुरू केला. पाहतो तर साक्षीच्या हातातून रक्त वाहत होते. तिने त्यानंतर ही काही आवाज केला नाही. पण नचिकेतला मात्र तिचे हे वागणे आवडले नाही. त्याने अंधारातच first-aid box शोधला. तिचा हात पाण्याखाली धरला. बसून तिच्या हाताला मलम पट्टी केली. आता पर्यन्त सगळे ठीक होते. तिचा हात हातात घेऊन त्यावर औषध लावताना अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आले. 

आज वर कधी न पाहिलेले नचिकेतला असे साक्षी आज वेगळ्याच रुपात पाहत होती. प्रत्येकाला हुरूप देणारा नचिकेत एवढा हळवा झाला होता. तिला वेदना होत होत्या. पण तिने तोंडातून ब्र ही काढला नाही किंवा डोळ्यातून थेंब ही आला नाही. नचिकेतच्या डोळ्यातले पाणी मात्र बरोबर साक्षीच्या हातावर पडत होते. त्याचा हात साक्षीच्या जखमी हातावर अलगद स्पर्श करत होता. त्यावर हळूहळू फुंकर मारत त्याने औषध लावले. पट्टी ही लावून झाली. तेव्हा मात्र तिच्या तोंडून " आई ग " निघाले. नचिकेतने तिला घट्ट मिठी मारली. तिच्या लागलेल्या हाताला जवळ घेऊन त्यावरून हात फिरवला. दोघेही भावनिक झाले. रेणू आणि भानू दोघे इतक्यात आले होते. ते दारातच स्थिर झाले. भानू ते पाहून स्थिमित झाला आणि म्हणाला, 

" हे कधी तरी होणारच होते " 

बराच वेळ साक्षी नचिकेतच्या मिठीत होती आणि नचिकेत काहीच बोलू शकला नाही. थोड्या वेळासाठी सारे अस्थिर जग एका मिठीत स्थिरावले होते.
    
रेणूला काही कळत नव्हते पण तिला आनंद झाला होता. साक्षीची काळजी करणारी व्यक्ती तिच्या आयुष्यात आली याचं तिला समाधान होते. तिच्या ही डोळ्यात पाणी आले. अंधारातच साक्षीने नचिकेतचे डोळे  पुसले. तिने  नचिकेतला पाणी दिले. तिच्याकडे पाहत तिच्या हाताला हातात घेऊन नचिकेत म्हणाला,

 " साक्षी... तू काळजी घेत नाही स्वतःची ... काम करताना तुला कळत नाही का काळजी घ्यायची ... काही झालं म्हणजे तुला ? " 

साक्षी काहीच बोलली नाही. तिने त्याच्या हातातून आपला हात काढून घेऊन पुन्हा एक मिठी मारली. नचिकेतच्या डोळ्यात परत पाणी आले. ती त्याला धीर देत होती. इतक्यात दिवे आले. भानू आणि रेणू दोघे ही आत आले. याच त्या भावनिक तरंगावर साक्षीचे विश्व अवलंबून आहे. याची जाणीव तेव्हा साक्षीला झाली. तिच्यातली बंडखोर वृत्ती हळूहळू निरव शांत आणि प्रवाही झाली ती त्यामुळेच. रेणू आणि भानू नचिकेत जवळ आले आणि भानूने आपला हात नचिकेतच्या खांद्यावर ठेवला. 

- क्रमशः

Sunday, 20 April 2025

२४. दुर्घटना

भाग : २३

     दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे घरची सगळीच मंडळी नचिकेतसोबत मळ्यात गेली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. अंधुकशी उद्याची चिंता होतीच पण त्या दिवशी सगळ्यांनी जमेल तितक्या आठवणी जमवल्या. गेल्या गेल्याच नव्या सेट अप चे दर्शन सगळ्यांनी घेतले. साक्षीचा त्यातला सहभाग पाहताना साक्षीच्या वडिलांना तिचा अभिमान वाटला. साक्षीच्या आईने मुंबईत दाखवण्यासाठी तिथले फोटो काढले. दुपारी जेवण झाले. गप्पा गाणी आणि नंतर ओढ्यावरचा सूर्यास्त पाहून सगळे घरी गेले. तिथला ओढ्यावरचा सूर्यास्त सुमतीच्या ही आठवणीत  राहिला. दिवसभराच्या कामानंतर आणि विरंगुळा नंतर घरी गेल्यावर फारशी ऊर्जा राहिली नव्हती. माईने मक्याची कणसे चुलीवर भाजली. कणसे खायला सगळे खाली बसले. कणसे खाऊन झाल्यावर भानू म्हणला,

" साक्षी ताईला आम्ही आता  समदिकडे तुमच्या शहरी भाषेत काय म्हणतात ते  तुम्हाला मिस करणार. "

सुमित आणि आराध्याने ही साक्षीच्या बाबांना तिला अजून काही दिवस तिथे थांबण्याची गळ घातली. तेव्हा बाबा काहीच बोलले नाही. रात्रीची जेवण आटोपून सगळे लगेच झोपले. 
    
दुसऱ्या दिवशी आपले सामान सुमान घेऊन साक्षीचे आई बाबा खाली न्याहरीला आले. साक्षी रात्री फार थकलेली असल्याने तिला फार काही  सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांच्या हातात असलेल्या बॅग पाहून साक्षी म्हणाली,

" बाबा माझं सामान वरच आहे. भरायचे अजून. मी आले थांबा माझी बॅग घेऊन " 

बाबा म्हणाले " साक्षी बेटा... तुझी बॅग राहूदे वरच. तुझं काम तू पूर्ण करून ये. आता आम्ही निघतो. मला सुट्टी अगदीच दोन दिवसाची मिळाली. नाही तर अजून थांबलो असतो. " 

" बाबा... पण ... " - साक्षी

" हो ... बेटा मला काल नचिकेत जी नी सांगितले सगळे. तुमचे काम मोठे आहे. इथल्या लोकांसाठी करतेस ना. काम अर्धवट सोडून येऊ नको. पूर्ण कर आणि घरी ये " - बाबा 

" खरंच बाबा " आंनदाच्या भरात तिने बाबांना मिठी मारली. 

" आई, मी लवकरात लवकर इथलं काम संपवून येते. " साक्षीच्या आई बाबांचा निरोप घ्यायला घरचे मोठे मंडळी जमले होते. सकाळची वेळ होती रेणू, माई आणि अण्णा आवरुन आले होते. बाकी सगळे आपापल्या खोलीत झोपले होते. त्यामुळे त्यांचा निरोप घेऊन आई बाबा मुंबईला निघाले. तासभरानी नचिकेत, आराध्या, सुमित, भानू सगळे आले. त्यांना साक्षीचे आई वडील परत मुंबईत गेल्याचे कळले. 

सुमित म्हणाला " आले आणि गेले ही ! थांबायला हवे होते ना अजून काही दिवस ... " 

आराध्या म्हणाली, " साक्षी पण तुझ्यावरच मोठं टेन्शन हलकं झालं बघ, आता पूर्ण लक्ष घालून द्राक्षाच्या प्रोसेसिंगच काम हातात घेशील. " 

नचिकेत म्हणाला " हो तर ... काही दिवसांचा प्रश्न आहे साक्षी ... व्ही विल डू  इट " 

साक्षीला पुन्हा नव्याने हुरूप आला. 

काही दिवस नव्या कलमांची चाचणी, कीटकांचा प्रादुर्भाव आणि नव्याने सुरू केलेले तांत्रिक काम सगळ्यात झोकून देऊन काम सुरू झाले. 
फळांचा ज्युस काढुन त्याचे निर्जंतुकीकरण करणे आणि फरमेन्ट करायला ठेवणे ही प्रक्रिया होती. ते करताना मध्ये मध्ये त्याची क्वालिटी पाहत राहणे. यासाठी चाचण्या सुरू होत्या. दिवस संपून रात्र कधी होत कळत नसे. बराच वेळ आराध्या ही कंपनीतुन येऊन साक्षीला मदत करत असे. नचिकेतला या दरम्यान बरेच बाहेर ही फिरावे लागले. भानू आणि नचिकेत यांच्या शहराच्या ठिकाणी सतत फेऱ्या होऊ लागल्या.

साक्षी एक दिवस बराच वेळ तिथेच प्रयोगशाळेत थांबली होती. भानू नचिकेत शहरातून समान आणून तिथे ठेवणार होते. त्यामुळे ते ही तिथेच येत होते. रात्रीचे नऊ, सव्वा नऊ वाजले होते. रात किड्यांचा आवाज होता. साक्षीसोबत तेव्हा तिथे रेणू होती. रेणूच्या मदतीने ती काही तरी काम करत होती. अशात अचानक दिवे गेले. काय झाले पाहायला रेणू बाहेर आली. दूरवर नजर फिरवली. तिला फारसा अंदाज लावता आला नाही. थोडी आणखी पुढे गेली. योगायोगाने तेव्हा नचिकेत आणि भानू ही तिथेच समोरून येताना दिसले. रेणूच्या हातात कंदील होते. त्याच्या प्रकाशात तिने त्यांना ओळखले. 

रेणूने पुढे जाऊन दोघांना सांगितले " भानू रे... तिथं दिवे गेलेत, आपण बघूया का काय झालं ते ? तिथे काम राहिले साक्षी ताईचं " 

" अचानक काय झालं ? आत कोण आहे आता ... " - नचिकेत

" आम्ही दोघी होतो... साक्षीताई आहे आता आत " - रेणू 

" ती एकटीच आत आहे का ... भानू जा, पाहून ये, तिथे काय सिरियस इशू आहे  का ? अचानक वीज कशी गेली ? " - नचिकेत

" दादा मी बी जाते " - रेणू

" बरं जा ... " - नचिकेत

" इतका वेळ झाला तुम्ही इथे कसे " - नचिकेत

" अहो दादा... साक्षी ताईंना काही तरी काम होते. त्यासाठी थांबावं लागलं होत. " - रेणू

" तुम्ही तिथं जा... त्या एकट्याच आहेत " - रेणू

इतक्यात काचेची वस्तू पडून फुटल्याचा आवाज प्रयोगशाळेतुन आला. तिघेही घाबरले.  नचिकेत रेणूच्या हातचे कंदील घेऊन धावत तिथून प्रयोगशाळेकडे आला. इथे  अंधारात एक दुर्घटना घडली होती. 

क्रमशः

Friday, 18 April 2025

२३. मनातली अंतरे

भाग : २२

      पुढचे काही दिवस नव्या सेटअपच्या कामात गेले. त्यासाठी लागणारे भांडवल मागवणे, अधिकची अवजारे, काही पुस्तक आणि एक अनुभवी व्यक्ती असं बरंच काही या प्रोजेक्टसाठी लागणार होते. घरच्या सगळ्या मंडळींचा पाठिंबा आणि मदत मिळतच होती. भानू, सुमित, रेणू, आराध्या, सगळेच मदत करत होते. नचिकेतच्या या कामाविषयी खबर आराध्याच्या कंपनी पर्यन्त गेली. 

एक दिवस त्यांची ही सगळी मेहनत पाहायला मिस्टर साठ्ये तिथे आले. त्यांनी आराध्याकडून बरेच काही याविषयी ऐकले होते. आराध्याची प्रगती ते कंपनीत पाहतच होते. नचिकेत कंपनीत आलेला ते ही आराध्याने त्यांना सांगितले होते. त्या वेळी कंपनीच्या वरिष्ठांचा विरोध पत्करून  नचिकेतला मदत करणे त्यांना कठीण गेले होते. साक्षीला ओळखण्यात आपण चूक केली. असे त्यांना राहून राहून वाटत होते. तिच्याकडून झालेल्या एका चुकीची शिक्षा म्हणून तिला कंपनी सोडावी लागली. परंतु आता त्यांना ही चूक सुधारण्याची संधी होती. नचिकेत आणि साक्षीला हवी ती सगळी मदत करायची. त्यांना तांत्रिक बाबी समजून देत द्राक्षाच्या फरमेन्टेशन ची प्रक्रिया समजवायची. शासकीय आणि कायदेशीर पत्र, परवानगी घेण्याची सगळी प्रक्रिया समजवायची. सगळे ते स्व खुशीने करत होते. आठवड्यातून दोनदा येऊन ते या बाबत त्यांना मार्गदर्शन करत. इतकेच नव्हे तर संकट काळात जे मजूर बेरोजगार झाले, त्यांना ही तांत्रिक प्रशिक्षण देऊन या कार्यात खारीचा वाटा त्यांनी उचलला. सगळ्यांच्या मदतीने लवकरच सगळे सेट अप लावून होणार होते. पहिल्यांदा द्राक्षावर प्रोसेसिंग होणार होते. द्राक्षाचा रस काढून त्याला फरमेन्ट करायचे होते. सगळेच दिन रात काम करत होते. 

त्याच दरम्यान एके दिवशी साक्षीचे आई वडील आराध्याच्या गावी अचानक आले. सेटअपचे काम जवळपास पूर्णच झाले होते. साक्षी दुपारी तिथले काम आटोपून घरी आली. आई वडिलांना समोर पाहून आश्चर्याचा धक्का बसला. 

" आई बाबा तुम्ही ... " आनंदाच्या भरात तिने येऊन बाबांना मिठी मारली. 

बाबा म्हणले " येस बेटा... तुझं इकडे काम कसे सुरू आहे ... झालं की नाही अजून... परत जायचे घरी आपल्याला ! " 

आई म्हणाली " साकु... घराला, आई - बाबांना विसरलीस का ? ... इथे फार त्रास देत नाहीस ना कोणाला ? " 

माई तिथेच होती. ती म्हणली " नाही ... नाही ... हुशार आहे मुलगी ... त्रास तर अजिबात नाही... साक्षी आमच्यातली एक झाली आता.. मला आराध्या, सुमित तसे साक्षी झाली आता... अडचणीच्या काळात किती मदतीला आली लेक ... खरंच फार गुणांची आहे पोरं "

साक्षीच्या आईचे मन भरून आले. आपल्या मुलीचे इतरांकडून कौतुक ऐकताना आईला वेगळेच बळ मिळते. आजवर घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाल्या सारखे वाटते. 

सगळे कोड कौतुक झाले आणि आई बाबा जेवून आराम करायला गेले. संध्याकाळची वेळ होती. सगळे एकत्र बसले असताना साक्षीच्या बाबांनी तिला परत नेण्याचा विषय काढला. तिचा सहा महिन्यांचा प्रोजेक्टचा काळ एव्हाना संपला होता. साक्षी लगेच जाणार ही कल्पना कोणालाच रुचली नाही. घरातल्या सगळ्यांनी तिच्या आई बाबांना समजावले. काही दिवस तिला तिथेच राहू दे म्हणले. आई बाबा ठरवून आलेले " तिला परत नेण्यासाठी ते आले होते."  हे त्यांचा चेहरा स्पष्ट सांगत होता. सगळ्यांचे बोलून झाल्यावर नचिकेत मात्र विचारात पडला. बराच वेळ काही बोलला नाही. नंतर त्याने तिच्या बाबांना विचारले " साक्षीचे आता पर्यन्तचे काम तुम्ही पाहणार नाही का ? एक काम करूया उद्या आपण सगळेच प्लांट पहायला जाऊ, एक दिवस तिथे घालवू नंतर तुम्ही साक्षीला घेऊन जा " 

सुमित म्हणला " बरोबर दादा... संध्याकाळी आपण ओढ्यावर पण जाऊ " 

नचिकेत म्हणला " तुमची गैरसोय होणार नाही ... नक्की तुम्हा दोघांना ही आवडेल .. करूया ना उद्याचा प्लॅन " 

बाबा म्हणाले " व्हाय नोट... नक्कीच ... जाऊया उद्या... मजा करूया " साक्षीचे बाबा पुढारलेल्या विचारांचे होते. त्यामुळे ते लगेच तयार झाले. 

प्लांट मध्ये प्रोसेसिंग चे काम अजून सुरूच होते. पुढचे काही दिवस साक्षी इथे राहणे गरजेचे होते. उद्याचा दिवस सार्थकी लागणे नचिकेतसाठी आणि साक्षीसाठी फार गरजेचे होते. शहरात शिकलेला हुशार मुलगा आणि तिथल्याच उच्चभ्रू घरातली एक मुलगी इतके दिवस गावात राहून काही तरी नवीन रोजगाराचे साधन निर्माण करत आहेत. तिथल्या लोकांना प्रगतीच्या वाटेने घेऊन जात आहेत. गाव आणि शहर यातले अंतर कमी करू पाहत आहेत. ही गोष्ट सगळेच जाणून होते. आता ते पूर्णत्वाला येत आहे. त्यावेळी वेळेचा आणि नशिबाचा ही कस लागला. याच सगळ्या गोष्टींचा विचार करत नचिकेत झोपी गेला. पुढची सकाळ त्याची वाट पाहत होती. 

क्रमशः 

Thursday, 17 April 2025

२२. नवी सुरुवात

  भाग : २१
   
      पुढच्या दिवशी आराध्या सोबत नचिकेत कंपनीत गेला. सोबत द्राक्षाच्या दोन पेट्या घेतल्या. समोर मार्केटींग, प्रोडक्शन आणि क्वालिटी ची माणसे बसलेली होती. जवळपास तासभर चर्चा झाली. आराध्या पण समोर होती. साक्षी, भानू बागेत त्यांची कामे करत होते. सगळे जुळून येते म्हणे तोपर्यंत माशी शिंकली. नियम अटीच्या चौकटीत नचिकेतच्या द्राक्षाचा निभाव लागला नाही. काम होता होता राहिले. आराध्या आणि नचिकेत बाहेर आले. नचिकेत तसाच बागेत गेला. तिथे भानू आणि साक्षीला झालेली हकीकत सांगितली. भानूने नचिकेतला धीर दिला. साक्षीने ही त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. साक्षीचा हिरमोड झाला होता. संथ वाहत्या प्रवाहाला जसे वेगळे वळण लागावे. तसे काही तरी आता होणार होते. ते लागायच्या आधीच अचानक हा आणखी एक निराशेचा दगड या प्रवाहात पडला. त्याच्या लहरी नव निर्मितीसाठी तयार झाल्या होत्या. त्याच लहरींचा विचार करत साक्षी तिच्या कामाला लागली. 

त्या रात्री साक्षीचा फोन वाजला. घरून फोन होता. आई वडिलांनी साक्षीची चौकशी केली. काही दिवसांपूर्वी झालेले साक्षीचे अर्धवट बोलणे त्यांच्या पचनी पडत नव्हते. त्यामुळे यावेळी पूर्ण तयारीने त्यांनी तिची चौकशी केली. साक्षीला बऱ्याच दिवसांनी त्यांच्याशी बोलून बरे वाटले. जवळपास तासभर गप्पा झाल्या. फोन ठेवताना बाबांनी परतीच्या येण्याबद्दल विचारले. तिचा सहा महिन्यांचा काळ आता काही आठवड्यावर राहिला होता. 

तिने सांगितले. " बाबा... अजून पंधरा दिवस तरी लागतील. त्यानंतर मी आपल्या घरी येते. " 

बाबांनी खुश होऊन म्हणले " बेटा... आम्ही तुला स्वतः घ्यायला येऊ. तुझं काम संपव आणि लगेच मला कळव. मी गाडी घेऊनच येतो. " 

" बाबा ... मी येईन ना, तुम्ही इथे का येता ? " - साक्षी

" हो बेटा... मला पण पाहायचं आहे ... सायरन किती जोरदार वाजतोय तिथं " बाबांनी हसत हसत फोन ठेवला. 

परत जायचे याचा आनंद तर होता. पण आता ती वेळ नव्हती. तिने आराध्याला फोनवर झालेले बोलणे सांगितले. 

आराध्या म्हणली " साक्षी ... पंधरा दिवस असेच जातील. थांबना अजून काही दिवस. माझ्या साठी, राणू साठी... दादा साठी..." 

साक्षी काहीच बोलली नाही. तशीच झोपली. रात्री जेवली ही नाही. कोणाशी काही बोलली ही नाही. 

दुसऱ्या दिवशी आपले आणलेले सामान इकडे तिकडे गेलेले एकत्र करत होती. तिच्या वह्या, पुस्तकात एक जर्नल मिळाली. त्यात फरमेन्टर सेटअप ची माहिती होती. तिने ती वेगळी काढून ठेवली. बाकीचे सगळे एका बॅग मध्ये भरून ठेवले. सगळी आवराआवर झाली तशी ती खाली जेवणाच्या टेबलावर जाऊन बसली. सुमित जेवण पोहोचवायला बागेत जाणार होता. त्याच्यासोबत ती पण  गेली. जेवण तिथेच झाले. नंतर नचिकेत प्रयोगशाळेत काम करताना ती त्याच्या जवळ आली. त्याला हातातली ती जर्नल दाखवली. पुढे म्हणाली,

" नचिकेत... ही जर्नल राहूदे का इथे... यात फरमेन्टर असेंम्बल कसे करायचे याची माहिती छान दिली आहे. वायनरी  मध्ये काम करताना कामाला येईल म्हणून मी आणलं होतं. ते फारसं वापरलंच गेलं नाही. मी ठेवू का इथे ? " 

" हो ठेव तिकडे, मी बघतो नंतर... " - नचिकेत

" थांब साक्षी ... काय म्हणली ... यात टेक्निकल गोष्टी पण असतील ना मग ... बघू दे इकडे " - नचिकेत 

" हो आहे ...बघ " - साक्षी 

" येस... आपण आपल्या द्राक्षांना इतर ठिकाणी प्रोसेसिंगला पाठवण्यापेक्षा आपण च त्याचे कमर्शियल प्रॉडक्ट बनवले तर .... कशी कल्पना आहे ? "  - नचिकेत 

" म्हणजे मला कळलं नाही.." - साक्षी 

" अग ... वेडा बाई मी म्हणतोय आपल्याकडे आपण असा एखादा प्लांट तयार करू शकतो ना ... माणसे तर आहेत आपल्याकडे काम करायला " - नचिकेत

" हो पण हे खूप मोठं काम असेल आणि रिस्क पण आहे " - साक्षी 

" आधी पायलेट स्टडी करू नंतर मोठ्या प्रमाणात करता येईल. " - नचिकेत 

" येस करूया ... आपण दुपारी प्लॅनिंग करू मग सुरुवात करू " - साक्षी 

दुपारी भानू, नचिकेत, साक्षी तिघेही हा विषय घेऊन बसले.

संध्याकाळ झाली. हळूहळू अंधार होऊ लागला. या कामात तिघे ही इतके व्यस्त झाले की घराची आठवण झाली नाही. फोन वाजला. आराध्याने साक्षीला उशीर झाल्याचे कारण विचारले. फोन वर साक्षीला काहीच सांगता आले नाही. तिघेही उठले. काम संपवून घरी निघाले. 

भानू म्हणला " दादा... जोरदार काम होतेय आपलं... साक्षी ताई आणि तुम्ही आपल्या बागेचं नाव लय मोठं करणार..." 

" चल भानू... घरी जाऊया आता ... ती साक्षी बघ झोपेल इथेच नाही तर " - नचिकेत

" चला चला " साक्षी सरळ जाऊन गाडीत बसली. घरी येऊन साक्षीने आराध्याला दिवसभर झालेल्या सगळ्या घडामोडी सांगितल्या. जेवणाच्या टेबलावर याची चर्चा सूरु होती. सगळ्यांचे मत घेऊन एक दोन दिवसात यावर ही काम सुरू झाले. 

क्रमशः 

Wednesday, 16 April 2025

२१. आनंदाची बातमी

भाग : २०

     साक्षीच्या दुपारच्या बोलण्यावरून नचिकेत अजून ही नाराज होता. फारसे कोणाशी काही बोलला नाही. साक्षीला मात्र या गोष्टीचा  काहीच अंदाज नव्हता. साक्षीने ठरवल्याप्रमाणे गेल्या गेल्याच आराध्याकडे कच्च्या मालाचा विषय काढला. तिला याबाबत तिच्या मनुफॅक्चरिंग डिपार्टमेंट मध्ये विचारायला सांगितले. 

आराध्याने दुसऱ्याच दिवशी हा प्रस्ताव सगळ्यांसमोर ठेवला. तिच्या प्रयत्नांना तात्काळ यश आले होते. कंपनी कडून त्याक्षणी ग्रीन सिग्नल मिळाला. काही द्राक्षे पेट्या कंपनीत ट्रायल म्हणून आणण्याची परवानगी मिळाली. यात पुढाकार साठ्ये सरांनी घेतला. आराध्या ही आनंदाची बातमी घेऊन घरी परतली.  नचिकेतपर्यन्त ही बातमी अजून पोहोचली नव्हती. आराध्या कडून ऐकल्यावर तिचे त्याने फार कौतुक केले. तिला मिठी मारली. त्या दिवशी तिघेही ओढ्यावरचा सूर्यास्त पाहायला गेले. नचिकेतला आनंद होता पण त्याच्या चेहऱ्यावर एक सल मात्र राहिली होती. साक्षीचे शब्द त्याच्या काळजात घर करून बसले होते. साक्षी, आराध्या, नचिकेत घरी आले. आशेचा एक एक किरण प्रजवलीत होत होता. गोष्टी मार्गी लागत होत्या. भानूला नचिकेतच्या चेहऱ्यावरची चिंतेची आठी मिटल्याचे स्पष्टपणे दिसत होते.
    
जेवणाच्या टेबलावर सगळे बसलेले असताना नचिकेतने पुन्हा आराध्याने केलेल्या कामाचे कौतुक केले. सगळ्यांनीच नंतर तिचे तोंडभरून कौतुक केले. आराध्या तेव्हा म्हणाली,

" दादा... याच श्रेय माझ्या सोबत साक्षीला पण जाते. तिने काल रात्री मला येऊन तिथली परिस्थिती सांगितली आणि त्यावर ही युक्ती पण सांगितली. तिने जर सुचवले नसते तर आजचा आनंद सेलिब्रेट करता आला नसता. " 

नचिकेतने तेव्हा साक्षीकडे पाहिले. साक्षी काहीच बोलली नाही. थांबलेल्या पाण्याला जसे अचानक प्रवाह मिळतो तसे काहीसे नचिकेतचे झाले. साक्षीच्या त्या दिवशीच्या परखड बोलण्याचा आता त्याला अर्थ कळू लागला होता. आपल्याच मनातल्या आंदोलनावर विजय मिळवण्यासाठी साक्षीने तेव्हा तसे बोलले असावे. असे काहीसे वाटले. साक्षीकडे पाहिल्यावर त्याला आता नवीन आशा आणि यशाचा मार्ग दिसू लागला होता. तो तिच्याकडे पाहतच राहिला. 

भानू बोलू लागला " खरंय खरंय ... साक्षी ताई हे बेस्ट झालं. तुमचं पण कौतुक ओ. " 

रेणू, माई, अण्णा, सुमित सगळेच एकत्र होते. 

" साक्षी लय गुणांची पोरगी बरं दादा. मला ती माझ्या सोनलपेक्षा वेगळी न्हाई. लेकच हाय माझी. " रेणू शेजारीच उभी राहून म्हणाली. तिच्या डोळ्यात आपसूक पाणी आले.

" खूप मोठी हो पोरी... " अगदी मोजून मापून बोलणारे अण्णा ही साक्षीचे कौतुक करत म्हणाले. 

नचिकेतच्या चेहऱ्यावर तिला दिलेल्या या संधीचे समाधान होते. 

" चला तर मग आज परत राघूची संगीत मैफिल होणार तर " -  सुमित .

" हो तर ... दादा आपण दोघे असणार हो त्यात "  भानू नचिकेतला म्हणाला. 

" हो ... हो " म्हणत नचिकेत जेवणाच्या ताटावरुन उठला. सगळ्यांची जेवण आटोपली. 

रात्रीची मौफिल रंगली. गप्पा, गाणी, मजा मस्ती करून सगळे आपल्या खोलीत ही गेले. सुमित जाताना राघूला न्यायला विसरला. त्याचा पिंजरा तिथेच खिडकीशी राहिला. भानू नचिकेत तिथेच होते. भानूने नचिकेतला थोडा वेळ थांबायला सांगितले. 
त्याला विचारले,
" दादा...तुम्हाला पाहून आनंदचं होतो. पण या आनंदाचं खरं कारण कळलं आम्हाला आता ! "

" भानू... अरे बघ ना ... आता थोडं रिलॅक्स झाल्यासारखं वाटते. हे सगळं साक्षी मुळे शक्य झालं " - नचिकेत

" ते झालंच दादा... पर साक्षी ताईच्या कौतुकामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद डबल झालेला तिथं टेबलावर सगळ्यांनी पाहिला. त्याच काय.. ! - भानू

" खरं तर मी हे आधीच हेरलं पर म्हणलं वेळ आली की सांगेन " - भानू 

" तुझं आपलं काही तरी असतं, चल झोपायला जाऊ " - नचिकेत

" उद्या आरुच्या कंपनीत जायचे सॅम्पल घेऊन.. " - नचिकेत 

" हो हो जावा की साक्षी ताईला पण घेऊन जावा सोबत.. इथं मी आहे बागेत. त्याची चिंता करू नका "  - भानू 

सुमितच्या लक्षात आले तो राघूचा पिंजरा तिथेच ठेवून आला. तो घ्यायला तिथे आला होता. दाराच्या जवळ उभे राहून त्याने भानू आणि नचिकेतचे सगळे बोलणे ऐकले. निघताना राघूच्या ही पिंजऱ्यातून तेव्हाच साद यावी. नकळत राघूच्या हाकेला सुमितने प्रतिसाद द्यावा. सुमित समोर आला.

सुमितला पाहून नचिकेत म्हणाला " झोपला नाही का जवान ... येत च होतो मी "

" हो दादा... मी राघूला तिथे च ठेवले, हे खोलीत गेल्यावर लक्षात आलं. म्हणून आलो. मी नंतर येऊ का ? " - सुमित 

" अरे इतकं काय... मी याला घेऊन आलो असतो...आलास तर घेऊन चल " - नचिकेत

" चल भानू " - नचिकेत

भानू, नचिकेत, सुमित सगळेच आपापल्या खोलीत गेले. आनंद तर होताच पण भानू जे काही बोलला त्यावर विचार करता नचिकेतला बराच वेळ रात्री झोप लागली नाही. एका कुशीवर वळून त्याचे मन भविष्याची मांडणी करू लागले होते. काटेरी वाटणाऱ्या वाटेवरचे बोलवणारे यशाचे, प्रगतीचे हात त्याला दिसु लागले होते. 

क्रमशः 

Tuesday, 15 April 2025

२०. भविष्याची मांडणी

भाग : १९

    आता पर्यंत बऱ्याच बिऱ्हाडानी आपली राहण्याची सोय ग्राम पंचायती च्या मदत निधीतून केली होती. आता प्रश्न होता तो फक्त पोटाचा ! नचिकेत प्रयोगशाळेत काम करत असताना भानू त्याच्या जवळ आला. त्याने नचिकेतला बोलता बोलता विचारले,

 " दादा... कामाचा व्याप एकटे घेऊ नका. काय असेल तर कधीही बिनधास्त सांगा, एकत्र करूया ..." 

" हो ... भानू, तू म्हणतोय ते खरं आहे, पण आपल्या सगळ्या मजुरांना थोडे तरी प्रत्येकाला पैसे मिळायला हवेत आणि या फक्त उत्पन्नाच्या द्राक्षाच्या पेट्या त्याचे पोट भरू शकत नाही. त्याचे पुढे काही तरी करता आले असते तरी थोडा प्रश्न मिटला असता. पण आता करायचे तरी काय,  पुढे हा प्रश्न आहे. " - नचिकेत 

" ते बी खरंय ... आपली ताई काही तरी करत असती ना कंपनीमध्ये, तिला आपण इचारल तर " - भानू

 " त्यांचं काम वेगळं असतं रे... आपल्यालाच यातुन मार्ग काढावा लागणार. " - नचिकेत 

नचिकेत, भानू बाहेरच्या नवीन कलमांना पाहण्यासाठी गेले. तेवढ्यात साक्षी घरून आली. साक्षीला पाहून भानू मोठ्याने ओरडला, 

" छोट्या सायंटिस्ट आल्या ...साक्षी ताई या... " 

" भाऊ, आज काय करायचं ... नचिकेत कुठे ?  " - साक्षी

" ते काय तिकडं... रोपटी बघतात नवीन लावलेली... लय टेन्शन आहे दादांना, म्हणले नुसती पेटीतली द्राक्ष तरी किती जण घेणार "  - भानू

" काय करता येईल ? " - साक्षी

" मी काय सांगणार ... तुम्ही उलट काहीतरी सांगा. आरु ताई कंपनीत जातात. तुम्ही इथे शोध लावता.. माझ्यापेक्षा तुम्हीच मार्ग काढाल. " - भानू 

" भाऊ... खरंय आपल्याला काही तरी केलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काही सुचते काय... "  - साक्षी

 " आपल्याला या गावाच्या सीमा ओलांडून पुढे जावे लागेल. नचिकेत, तेव्हा अनेक मार्ग मिळतील. तू याचा विचार का नाही करत?  गोडीवली मध्ये तू कायमस्वरूपी बांधून राहू नको. बाहेर खूप प्रगतीच्या वाटा आहेत. तू फक्त एकदा यावर विचार कर. " साक्षीने रोपं पाहता पाहता नचिकेतला सुचवले.

साक्षीचे बोलणे नचिकेतला फारसे रुचले नाही. आज वर त्याचे मत अगदी विरुध्द होते. त्यामुळे त्यावर तो काहीच बोलला नाही. शहरातून शिक्षण घेऊन आल्या नंतर त्याचे या मातीशी असे काही घनिष्ठ नाते जोडले गेले होते की, त्याची या गोडीवलीशी जोडलेली नाळ वेगळी करणे काही सहज सोपे नव्हते. आपल्याच आईच्या जवळ आपले सगळे सुख दुःखाचे क्षण व्यथित व्हावे ही त्याची प्रामाणिक इच्छा असायची. त्यावर साक्षीचे हे परखड बोलणे त्याला काटेरी वाटले. 

क्षणिक शांतता पसरली. ती मोडण्यासाठी भानू पुढे म्हणाला;

" तुम्ही नक्की काही तरी शक्कल लढवाल दादा. मला इश्वास हाय तुमच्या वर " 

" बघू चल बसून चालणार नाही आता " - नचिकेत

साक्षी तिच्या विचारात होती. काही तरी आठवण्याचा प्रयत्न करत होती. भानू आणि नचिकेत लॅबचे केमिकल्स चेक करत होते. साक्षीच्या चेहऱ्यावर अचानक आनंद पसरला. ती लगेच भानू कडे आली. 

" भाऊ... आपण एक करू शकतो. मला आधी का सुचले नाही ! येस... येस...मी आजच आरुशी बोलते. " - साक्षी

" काय बोलणार ... मला बी सांगा की ताई " - भानू

 " भाऊ तुम्हीच तर सुचवलं ... आपण आपले द्राक्ष पीक आरुच्या कंपनीला देऊ शकतो. आपल्याकडे कच्चा माल आहे ना, नक्कीच थोडे पैसे जास्त मिळतील. ती कंपनी पण तशी नावाजलेली आहे. मी असच करते. थँक्स भाऊ, आजच आरुशी या बद्दल बोलते. " - साक्षी

 " ते नव्ह, एकदा दादांना पण ईचारा " - भानू 

 " हो ते बघू ना पुढे, आरुला काय वाटते ते बघू , कंपनीच्या कच्च्या मालाविषयी तिला ही माहिती झाली असेल. " - साक्षी

 " बरं चला आता बाकीची काम करू... मला फॉरमुलेशन बनवायचे आहेत. तुमची मदत लागेल. काही साहित्य आणायचे मार्केट मधून, तेवढं आणून द्या. " - साक्षी

" जी लगेच आणतो. " - भानू

साक्षी तिच्या कामाला लागली. भानू मार्केट मध्ये गेला. काम उरकून सगळे आपापल्या घरी आले. 

क्रमशः 

Monday, 14 April 2025

१९. मैफिल

भाग : १८

      काही दिवसांचा रोजचा दिनक्रम झाला होता. सकाळी सुमित, आराध्या, साक्षी, नचिकेत मळ्यात जात. तिथल्या लोकांसोबतच न्याहरी करत. माई घरून जेवण पुरवत असे. मळ्याचा बराचसा भाग, कुंपण कोलमडले होते. त्याची दुरुस्ती करून त्या जागेत पुन्हा नव्याने छोटेखानी कलमं लावली गेली. शेततळे बनवले. उन्हाळ्याचे दिवस होते. पाण्याची नड होती. काही भागात चांगले उत्पन्न आले होते. पण तितके पुरेसे नव्हते. गरज मोठी होती आणि उत्पन्न तितके मिळत होते. इतक्या दिवसाच्या संशोधनाचे फळ तर मिळाले होते. फळावर किडीचा प्रादुर्भाव दिसत नव्हता. द्राक्ष पण आकाराने मोठी आणि रसदार झाली होती एव्हाना. पुढे काय ? यातून मिळकत कशी वाढवायची हा प्रश्न होता. 

आराध्या सकाळची न्याहरी करून तिचे कंपनीचे काम पूर्ण करण्यासाठी जात होती. पुन्हा संध्याकाळी येऊन ती साक्षीला, नचिकेतला मदत करत असे. सुमितची सामानाची, जेवणाची ने आण करण्यात सतत मदत होत होती. 

आठ एक दिवसांनी दवाखान्यातुन भानूने रेणूला घरी आणले. ती माईल्ड डिप्रेशनमध्ये मध्ये गेलेली होती. आठवडाभर तिला तिथेच औषधोपचार सुरू होते. आता ती बोलू लागली होती. चेहरा उतरला होता पण ती माणसात आली होती. ती आणि तिच्या सोबत सहा वर्षाची मुलगी तिथेच भानुच्या खोलीत राहू लागल्या. भानू काही दिवस बाहेरच्या पडवीत झोपत होता.

त्या दिवशी साक्षी, आराध्या, सुमित रेणूला आणि त्या लहान मुलीला आराध्याच्या खोलीकडे घेऊन आले. सुमित राघूला ही घेऊन आला. पिंजरा खिडकीशी ठेवत म्हणला..
" आहे आहेत तर सगळे.  राघू आपल्याला गाणं म्हणून दाखवणार आहे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी " 
जवळपास तासभर खिडकीशी विरंगुळा सुरू होता. भानू दारा अडून  सगळं पाहत होता. आज बऱ्याच दिवसांनी प्रत्येकाचे हरवलेले हास्य मोठा प्रवास करून परत आले होते. त्याने खाली जाऊन नचिकेतला हे सांगितले. नचिकेत, अण्णा, माई पुढच्या खर्चाचे नियोजन करत बसले होते. 

भानू नचिकेतला म्हणाला " दादा... वरती बघितलं का ... समदी कशी एकत्र बसून गानी बिनी म्हणतायत ... चला ना आपण बी जाऊ... तुम्हाला बी छान वाटेल. " 
माई अण्णांनी नचिकेतकडे पाहिले. त्याला भानूसोबत जाण्याचा इशारा केला. नचिकेत म्हणाला " चल रे आपण पण सामील होऊया त्यांच्यात "
" चला ... चला " म्हणत भानू नचिकेतला घेऊन तिथून निघाला. 

वर चांगलीच जत्रा भरली होती. विरलेली ऊर्जा पुन्हा नव्याने वाहू लागली होती. आराध्या, सुमित, रेणू, भानू, साक्षी, नचिकेत सगळेच गाण्याच्या चालीवर लहरत होते. रेणूसाठी फार कठीण होते पण तिला सोबत झाली ती त्या सहा वर्षाच्या मुलीची. तिला आपल्या दोन्ही हातानी पकडून रेणू बसली होती.आराध्या, सुमित एकमेकांच्या शेजारी बसून नकला करत होते. साक्षी नचिकेतच्या शेजारी बसली होती. गाण्याच्या धुंदीत ती त्याच्याकडे सतत पाहत होती. एक क्षण त्याच्या हाताला घट्ट धरून होती. भानू तिच्या दुसर्या बाजूला बसला होता. इतरांचे चेहरे वाचता वाचता त्याने साक्षी आणि नचिकेतच्या चेहऱ्यावरचे निर्विकार प्रेम ही वाचले. 

या आधी ही गोष्ट त्याने फक्त साक्षीच्या डोळ्यात वाचली होती. आता नचिकेतच्या डोळ्यात ही तेच दिसत होते. बराच वेळ झाला तरी तो साक्षीला बाजूला करत नव्हता. त्याच्याजवळ साक्षी असणे त्याला ही आवडू लागले होते. सुमितने आता या गाण्याच्या कार्यक्रमाला पूर्णविराम देण्यासाठी राघूला गायला सांगितले. त्याच्या तार सप्तकातल्या आवाजाने आजची मैफिल संपली होती. सगळे उठुन आपापल्या खोलीत जायला निघाले. 

क्रमशः

Wednesday, 9 April 2025

१८. ऊन सावली

भाग : १७

      वाड्यात गावातले वयोवृद्ध, जेष्ठ, शेतात काम करणारे मजूर आले होते. सुमित हॉस्पिटल मध्येच होता. अण्णानी सगळ्यांना आत बोलवले. आलेले सगळे गावकरी खाली बसले. अण्णा झोपाळ्यावर बसले. माई काय झाले पहायला बाहेर आली. भानू तिथेच शेजारी बसला होता. नचिकेत खाली आला. त्याने समोर बसलेली वीस, पंचवीस माणसं पाहिली. त्याने अण्णाना विचारले,
" हे सगळे इथे का आलेत ? " 

अण्णा काहीच बोलले नाही. सगळीकडे शांतता होती. कोणीच काही बोलत नव्हते.  भानू आधीच बाहेर कट्ट्यावर येऊन बसला होता. त्याने गावकर्यांच्या मनातलं ओळखलं होतं. नचिकेतच्या जवळ जाऊन हलक्या आवाजात त्याने सांगितले. 

" दादा...हे सगळे मदतीच्या अपेक्षेने इकडे आलेत. या सगळ्यांनी काल तुम्हाला तिथे मदत करताना पाहिलय. हास्पिटलात बी काहींनी बघितलं, ते मदत मागायला आलेत. घराचं आणि शेताचं असं दोन बाजूनी संकट आलंय यांच्यावर. कोनी बी काय बी बोलणार न्हाई. तुम्ही एकेकाला येगळ घेऊन इचारल तरच बोलतील. "

अण्णाना कदाचित हे कळले असावे. त्यामुळे त्यांना काही बोलणे उचित वाटत नव्हते. अशा वेळी नचिकेतने जबाबदारी घेतली. त्यांना त्यांच्या बागेत दुसऱ्या दिवशी यायला सांगितले. नचिकेतचे बोलणे साक्षी ऐकत होती. बाहेरची गर्दी आणि गर्दीत हरवलेली माणसं तिला चित्रपटातल्या कथेसारखे वाटू लागली, पाहता पाहता एक एक उठून जाऊ लागले. जाताना कित्येकांनी नचिकेतचे पाय धरले. सगळे गेल्यावर एक सहा वर्षाची मुलगी हातात बाहुली घेऊन मागून आली. नचिकेतच्या पायाला हात लावून गेली. तिला थांब म्हणे पर्यन्त तिने दार ओलांडले होते. 

नचिकेतने आपल्या मळ्याचा काही भाग त्यांना राहण्यासाठी तयार करण्याचं ठरवलं.  काही दिवसांची जेवणाची ही तजवीज केली.  भानूच्या मदतीने गावकर्यांच्या आठवड्याच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली. 

दुपार पर्यन्त सारे काम सुरू होते. संध्याकाळच्या वेळी नचिकेत सुमितला घेऊन त्या जागेवर गेला. आठ ते दहा बिऱ्हाड राहण्याची तात्पुरती सोय झाली होती. काम करणारे हात त्यांचेच होते. प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही देत होता. 

तेवढ्यात तिथे आदल्या दिवशी पाहिलेली ती मुलगी आली, बाहुली घेऊन आलेली ती मुलगी आपल्या ओढणीने जमीन पुसून काढत होती. एका हातात घट्ट मुठीत पकडलेली बाहुली आणि दुसऱ्या हातात तिची ओढणी. त्याने जमीन पुसत पुसत ती पुन्हा नचिकेतच्या पायाशीच येऊन थांबली. तिला नाव विचारलं तर ती काहीच बोलली नाही. " माझ्या बाहुलीला घर पाहिजे " इतकंच म्हणली. नचिकेत तिला घेऊन घरी आला. तिला भानूच्या खोलीत बसवले. जेवायला दिले. रात्री ती तिथेच झोपली. एका कुशीवर, आपल्या बाहुलीला घट्ट मिठी मारून झोपली. तिला पाठमोरी झोपलेले साक्षीने पाहिले. ठिगळ पडलेल्या तिच्या झग्याने स्वतःचे पाय झाकत झाकत ती झोपली होती. साक्षी तडक आपल्या खोलीत आली.  सोनलसाठी तिने आणलेला अबोली रंगाचा फ्रॉक तिने हातात घेतला. क्षणभर तिला तो फ्रॉक घालून बागडणारी सोनल तिथे दिसू लागली. नंतर तिथे झोपलेल्या मुलीच्या अंगावर तो फ्रॉक असावा असं तिला क्षणभर वाटून गेलं. डोळ्यातून पाणी आले. ते थेट त्या फ्रॉकवरच्या फुलांवर पडले. तो फ्रॉक घेऊन ती भानूच्या खोलीत आली. त्या शांत झोपलेल्या मुलीच्या जागी तिला सोनल दिसत होती. रेणूला घट्ट मिठी मारून झोपणारी सोनल. फरक फक्त इतकाच होता, हिच्या मिठीत बाहुली होती. तो फ्रॉक तिने त्याच बाहुलीच्या बाजूला ठेवला आणि तिथून निघून खोलीत आली. आकाशात शून्य नजरेत पाहत खिडकीशी बसली.  सोनलची आठवण योग्य ठिकाणी पोहोचल्याचे समाधान  तेव्हा तिला मिळाले होते. ती आकाशात पाहत होती, चांदण्यात तिला इकडे तिकडे बागडणारी सोनल दिसत होती. बदलत जाणाऱ्या ऊन सावलीच्या खेळात आजूबाजूची परिस्थिती बदलत होती. बदलत जाणारी वेळ मात्र खूप काही शिकवत होती. 

क्रमशः 

१७. विचार चक्र

भाग : १६

     दुसऱ्या दिवशी आराध्याने साक्षीसाठी गरम चहा आणून दिला. तिला खायला काही तरी आणून दिले. साक्षी रात्रभर जागीच होती. त्या दोघींसोबत नचिकेत आणि भानू देखील वोर्डच्या बाहेर बसलेले होते. अचानक तिचा फोन वाजला. साक्षीला तिच्या बाबांचा फोन आला होता. तिच्या आवाजावरून बाबांना शंका आली. ती फार काही बोलू शकली नाही. हाल हवाल विचारून तिने फोन ठेवून दिला. थोड्याच वेळात तिथे माई, अण्णाना घेऊन सुमित आला. माई, अण्णा बाकीच्या जखमी गावातील लोकांची चौकशी करायला ओ पी डी मध्ये गेले होते. सुमित नचिकेतच्या शेजारी जाऊन बसला. त्याला म्हणाला,
" तुझी खूप दगदग झाली... दादा... घरी जा आणि आराम कर आता. " 
 नचिकेत म्हणाला " खरंच फार वाईट दिवस होता सुमित कालचा ... मी कधीही विसरणार नाही. " 
" यातून ते सगळे लोक कसे उभे राहणार... सगळ्यांची च घर गेली. आपली रेणू तर जिवंत पुतळा झाली आहे बघ तिथे. तिला मी तरीही सांगितलं होतं ... घराकडे लक्ष दे.. गेलं ना सगळं आता. " 
" तिने सावरायचे  तरी कोणासाठी आता, माय लेकी दोघीच तर होत्या एकमेकींसाठी... सोनलचे वडील पाऊस पडत नव्हता म्हणून गेले आणि ही मुलगी पाऊस पडला म्हणून. किती सहन करायचे एका कुटुंबाने ? तिला उत्तर देणार तरी कोण ? "

 नचिकेतने त्याचे दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले. सुमित त्याच्या हाताला धरून त्याला बिलगला. 
" आपण सगळे आहोत ना, तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल. आता तुम्ही तिघे घरी जा माई , अण्णा पण आलेत, त्यांना पण थोड्या वेळात घरी पाठवतो. मी आहे इथे डोन्ट व्हरी. या जवानाला संधी कधी मिळणार युद्ध जिंकण्याची ! ही परिस्थिती आपल्यासाठी त्याहून कमी नाही. भानू तू पण वाड्यात जाऊन आराम कर. रेणूला पण आपल्या सोबतच राहू दे. काही दिवस आपण सगळे एकत्र राहू " 

भानू जागेवरून उठला. ओ पी डी च्या बाजूच्या रूम मध्ये रेणू निपचित पडलेली होती. तो उठून दरवाजापर्यन्त गेला. गोलाकार खिडकीतून  रेणूला पाहत काचेवर हात ठेवून तो बोलू लागला,
 " दादा ... खरंच तुमचे लय उपकार आहेत. देवच आले तुमच्या रूपानं आमच्यासाठी. देवाने घेतलं ओरबाडून सगळं आमचं, पर तुमच्या सारखी देव माणसं ठेवली बघा इथं, ही रेणू बघा... देवाने हिला नेलं नाही. अजून जीनं जग पाह्यलं बी न्हाई त्या सोनलला घेऊन गेला. आमच्या सारखं एखादं मेंढरात मन रमवल बी पर हीच काय व्हायचं ? आता पण कळत न्हाई. कुठं जावं ? काय करावं ? उघड्यावर पडलोय आम्ही आता. डोकं झाकायला तुम्ही आम्हाला जागा देताय ... तुमचं पाय धरले पाहिजे " भानू बोलता बोलता भावनिक झाला. 

नचिकेतने सगळ्यांचे चेहरे पाहिले. निस्तेज झालेल्या चेहऱ्यावरचा थकवा स्पष्ट दिसत होता. नचिकेत उठून उभा राहिला. साक्षीच्या जवळ गेला. तिच्या डोक्यावर हात ठेवत आराध्याकडे पाहत म्हणला, 
" चला घरी जाऊ आता... पुरे झाले सारे. " 

साक्षी उठली. तिने आराध्याचा हात हातात घेतला. साक्षी, भानू आणि आराध्याला घेऊन नचिकेत घरी गेला. घरी गेल्यावर त्याने भानूला वाड्यातली एक खोली दिली. आराध्या, साक्षी त्यांच्या खोलीत गेल्या. नचिकेतने थोड्या वेळाने येऊन त्यांच्या खोलीत पाहिले. दोघी गाढ झोपल्या होत्या. मनाचा आणि शरीराचा दुहेरी थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. दार पुढे ओढून तो परत आपल्या खोलीत आला. थोडा वेळ तिथेच पलंगावर आडवा झाला. पुढे बराच वेळ त्याला झोप लागली नाही. आदल्या रात्रीचे प्रसंग सतत समोर येत त्यावर विचार चक्र सुरू होते. डोळे मिटून तो तसाच पडून राहीला. पुढे कसे होणार याची चिंता त्याच्या मनात घर करू लागली. नकळत या संकटात आपल्या द्राक्ष पिकाचे ही नुकसान झाले आहे, हे तो जाणून होता. साक्षीचा प्रोजेक्टचा काळ पण संपत आला होता. तिला तिचे प्रोजेक्ट पूर्ण करून पुन्हा घरी जायचे होते. तिने या सगळ्याचा धक्का घेतला तर... असे असंख्य प्रश्न समोर होते. दिवसभराच्या थकव्याने शेवटी त्याचा डोळा लागला. तासाभराने दारात माणसांचा आवाज बाहेरून येऊ लागला. माई, अण्णा घरी आले होते. नचिकेत उठून बाहेर आला. 

क्रमशः


Tuesday, 8 April 2025

१६. काळाचे ओरखडे

भाग : १५


    नचिकेतने भानूला घडल्या घटनेची माहिती देण्यास सांगितले. भानू दम खात काही तरी अजून सांगण्याचा प्रयन्त करत होता. तो म्हणाला,
 " दादा ... आपली रेणू, सोनल, धन्या, रामराव सगळेच होते, घटकाभरात सगळे संपले..." 
नचिकेतने त्याला पुन्हा पाणी दिले. भानू थोडा सावरला आणि सांगू लागला 
" दादा, टेकडीच्या पायथ्याशी असलेली जमीन घसरली. उतारावरची घरं पडली. नुसता गोंधळ सूरु आहे तिथं, देवाला ठावं किती नुकसान झालं ते. मातीचे ढीगारे दिसतात तिकडं नुसती... खालची शेतीवाडी बी मातीत गेली. तुम्ही पाह्यलं का आपण लावलेली नवीन कलमं समदी मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. " नचिकेत उठून उभा राहिला. साक्षीने बाहेर पाहिले. लोकांचा आवाज थोडा कमी झाला. घोळक्याने लोक गावात ओरडत जात होते.

एव्हाना बातमी गावात गेली. घरून फोन आला. झालेली सगळी हकीकत साक्षीने आराध्याला सांगितली. तेव्हा नचिकेतने साक्षीकडून फोन घेतला. आराध्याला म्हणाला " मी आणि साक्षी ... त्या टेकडीजवळच्या वस्तीजवळ आहोत. आपलं किती नुकसान झाले ते बघून आम्ही घरी येतो . आई, आण्णा ना सांग आम्ही सुखरूप आहोत." 
त्याने फोन ठेवला आणि साक्षीला, भानूला घेऊन तो दुर्घटना स्थळी पोहोचला. वाटेत द्राक्षाच्या बागा आडव्या झालेल्या दिसल्या. आपली सगळ्यांची मेहनत क्षणार्धात जमीन दोस्त झालेली पाहून प्रत्येकाचे मन विषण्ण झाले. तिथे फार काळ रेंगाळता येणार नव्हते. पुढचे चित्र कसे असेल याचा अंदाज ही येत नव्हता. गाडीत साक्षी, नचिकेत आणि मागे भानू उतारावरच्या वस्तीच्या मार्गाला लागले. 

थोड्याच वेळात त्यांनी वाटेत मातीचे मोठे मोठे ढीग पाहिले. सिमेंट काँक्रीटच्या पडलेल्या भिंती आणि त्यावर आडवे पडलेले पत्रे, मोडलेली कौले. गावाबाहेरची वस्ती असल्याने हवी तशी मदत ही अजून पोहोचली नव्हती. तिथले रहिवासी गावकरी जमेल तसे ढिगाऱ्यातून आपली माणसे शोधत होते. काही  मदतीसाठी आवाज देत समूहाने आजूबाजूच्या गावात धाव घेत होते. काही हे हृदयद्रावक चित्र पाहून शून्यात स्तब्ध उभे होते. तर काही वाट मिळेल तिथे सैरावैरा पळत होते. साक्षी अजूनही गाडीतून हे चित्र पाहत होती. गाडीतून उतरून पुढे जायचे धाडस तिला होत नव्हते. पाय तिथेच जडावले गेले होते. थंडी ही वाजत होती. ती समोरच्या काचेतून फक्त अंदाज घेत होती.  नचिकेत गाडीतून उतरून फोन कॉल वर तात्काळ मदतीसाठी बोलवत होता. भानू ही घोळक्यात जाऊन दगड विटा बाजूला करत होता. लहान मुले, बायका, गुरे, प्राणी, भांडी, कपडे काहीही ढिगाऱ्याखाली मिळत होते. कित्येकांची आजवरची मेहनत, स्वप्ने, दगड विटांचा ढीग सगळे सगळे नजरेस पडत होता.

साक्षीला तिथला तो आक्रोश पाहून रेणूची  आठवण झाली. नचिकेतची गाडी जिथे उभी होती. तिथून थोडे वर गेल्यावर तिचे घर होते. तिच्या डोळ्यासमोर आता रेणू, सोनल आणि नव्याने जन्माला आलेली जनी आली होती. तिच्या अंगात दहा हत्तींचे बळ आले आणि ती गाडीतून उतरून रेणूच्या घराकडे धाव घेऊ लागली. त्या दिशेने चालायला सुरुवात केली. हळूहळू जशी ती जागा जवळ येत होती. तिचे काळीज धडधडत होते. भानू आणि नचिकेत वेगळीकडे व्यस्त होते. त्यामुळे साक्षीला दोघांनी पाहिले नाही. साक्षी रेणूच्या घराजवळ पोहोचली. तिचे घर तिथे राहिलेच नव्हते. तिथे फक्त होता तो रेणूचा चार भिंतीचा मोडलेला संसार. रेणूला साक्षी त्या ढिगाऱ्यात वेड्यासारखी शोधू लागली. कुठून सुरवात करावी काहीच कळत नव्हते. शेवटी तिच्याच घराच्या पत्राच्या आडोशाला साक्षी दोन्ही गुडघे एकत्र करून बसून राहिली. तिच्या डोळ्यात रेणू आणि सोनल सोबत जोडले गेलेले भावबंध स्पष्ट दिसत होते, ते अश्रूंसोबत वाहू लागले. ओक्साबोक्शी ती रडू लागली. तासाभरात भेट झालेली ती हाडा मासाची माणसं आणि ती जागा अचानक अदृश्य झाली कशी ? असे असंख्य प्रश्न तिच्या समोर होते. तिला तेव्हा कुठून तरी बोलण्याचा आवाज आला. मुसमुसण्याचा आवाज आला. फार मोठा नसल्याने तिला तो कोणाचा हे कळले नाही. त्याचा पाठलाग करत ती पत्राच्या मागून गेली. तिथे रेणू तिला मांडी घालून बसलेली दिसली. तिच्या मांडीवर सोनल डोकं ठेऊन होती. " ती झोपली आहे " रेणू असं काही तरी बारीक आवाजातून  सांगत होती. साक्षी तिच्या  जवळ गेली. तिने रेणूच्या पाठीला हात लावला तर रेणूने तो झटकला आणि त्याच धक्याने सोनलचे डोके हलले. हालचाल काहीच झाली नाही. ती उठली नाही. तिने डोळे गच्च मिटलेले होते. त्या रात्री कायमस्वरूपी झोपण्यासाठी सोनलने रेणूच्या मांडीवर डोके ठेवले होते. साक्षी पुन्हा तिच्या जवळ गेली. तिच्या निस्तेज चेहऱ्याला पाहिल्यावर साक्षीला कळले तिथे सोनमचे फक्त शरीर तिच्या मांडीवर होते. ती आता जागी होणार नव्हती. आपल्याला सोडून ती गेली आहे. रेणूला कदाचित काहीच भान नाही. हे तिने जाणले होते. साक्षीला काय करावे सुचत नव्हते. शून्यात पाहणाऱ्या रेणूकडे पाहून ती दोन पावले मागे झाली. तिथेच उभी राहून ती त्या माय लेकीकडे पाहत उभी होती. पावसाच्या पाण्यात गाडीत भिजत असलेला खरवस आणि अबोली रंगाचा फुलफुलांचा फ्रॉक तिला आठवला. ती मागे वळली. गाडीजवळ पळत गेली. रस्त्यात दगड, विटा यांच्या अडथळ्यात धडपडत ती तिथून निघाली. वाटेत खाली उतरताना अडखळली, ज्यावर पडली  तो रेणूच्याच घराचा पत्रा होता. पत्र्याखाली तिला जनी ही दिसली. तिचे ते नवीन नवीन जन्माला आलेले पाय ज्यांनी अजून नीट चालणे ही शिकले नव्हते ते पत्र्याखाली अडकून तिथेच तिचा जीव गेला होता. साक्षीचे हे भयाण दृश्य पाहून हृदय पिळवटून निघाले. अलगद तो पत्रा तिने जनीच्या पायावरून काढून बाजूला केला. दूर फेकून दिला. जनीच्या पायावरून ती हात फिरवू लागली. जखमा खोलवर झाल्या होत्या. आता कसेही करून नचिकेतला तिथे मदतीसाठी बोलवायचे होते. समोर जसे तिने नचिकेतला पाहिले. त्याला जाऊन घट्ट मिठी मारली. पाच मिनिटं ती तशीच होती. शब्द ही तोंडातून येत नव्हते.  तिने वरच्या बाजूला जे पाहिले ते सगळे  नचिकेतला सांगितले. सांगताना तिची जीभ थरथरत होती. 

भानू आणि नचिकेत काही लोकांना घेऊन तडक रेणूच्या घराजवळ गेले. नचिकेतने रेणूला आणि सोनलला तिथून बाहेर काढले. भानू रेणूला घेऊन गाडीपाशी आला. सोनलचे थंड पडलेले शरीर खाली सुरक्षित जागी ठेवताना नचिकेतच्या डोळ्यातून टचकन पाणी आले. सुरू होणाऱ्या नव्या नव्या कहाणीचा अकल्पित अंत झाला होता. हे त्याला कळले होते. स्वतः ला सावरत त्याने गाडी काढून जमेल तितक्या लोकांना प्रथमोपचारासाठी गावातील सरकारी इस्पितळात आणले. शक्य तितके साहाय्य केले. साक्षी आणि भानू तेव्हा सतत त्याच्या सोबत होते. गावात आल्यावर त्याने साक्षीला घरी जायला सांगितले. साक्षीला मात्र  त्याची पाठ सोडायची नव्हती. रेणूचा चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. साक्षी रुग्णालयात आली. नचिकेतने घरून आराध्याला यायला सांगितले. साक्षी त्याचे काहीच ऐकत नव्हती. आराध्या आणि सुमित दोघे रुग्णालयात आले. आराध्या साक्षी शेजारी बसली. काहीच न बोलता साक्षी तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागली. आराध्याने खूप समजावून ही साक्षी त्या रात्री रुग्णालयातच बसून होती. आराध्याने तिच्या सोबत राहण्याचे पक्के केले होते. ती रात्र काळरात्र ठरली. प्रत्येकाच्या आयुष्यावर ओरखडे मारत सरली.

क्रमशः
 

Monday, 7 April 2025

१५. दुहेरी संकट

भाग : १४

      साक्षीचा फोन वाजला. बराच वेळ तो आत घरात ठेवल्याने त्याच्याकडे लक्ष गेले नाही. अचानक जोराचा वारा सुटला. घराचे पत्रे आवाज करू लागले. बाहेर वासरासोबत खेळत बसलेली साक्षी, सोनल त्या गोंडस वासराच्या बागडण्यात दंग झाल्या. राणूने दोघींना आत बोलवले.

 " सोनम, साक्षी ताईला घेऊन आत ये. बाहेर वारं सुरू झालंय ... या आत जेवायला देते. " 

साक्षी भानावर आली. तिने अंगणातला खेळ थांबवला. सोनलला घेऊन आत आली. नचिकेत तिला सतत कॉल करत होता. त्यात आणखी भर म्हणून पावसाची रिप रिप सूरु झाली. राणूने फोन वाजल्याचे साक्षीला सांगितले. तोपर्यंत नचिकेतचे तीन ते चार मिस्डकॉल येऊन गेलेले होते. लगबगीने तिने त्याला कॉल केला. सुरवातीला वारा आणि पावसाच्या अडथळ्यांने कॉल काही लागला नाही. सतत प्रयन्त केल्यावर शेवटी लागला आणि तो नचिकेतने उचलला. साक्षीचा जीव भांड्यात पडला. तिने त्याला राणूच्या घरी येण्यास सांगितले. बाहेर वारा आणि पाऊस असे दुहेरी संकट सुरू होते. राणूच्या घरचे पत्रे वाऱ्यामुळे जोरजोरात वाजत होते. नचिकेत अजूनही प्रयोगशाळेतच होता. साक्षी आल्याशिवाय त्याला घरी ही जाता येत नव्हते. घरी साक्षीच्या आजच्या नियोजनाची पुसटशी कल्पना दिली नव्हती. त्यामुळे तिची वाट पाहत तो प्रयोगशाळेत काही जुने काम काढून बसला होता. बाहेरचा वादळी पाऊस आणि बागेत आलेली टपोरी हिरवी द्राक्ष याची ही त्याला  काळजी लागलेली होती. साक्षीचा फोन आल्यावर तडक तो तिथून निघाला आणि राणूचे चार भिंतीचे घर गाठले. पावसात गाडी खड्यातून, चिखलातुन काढत नेली. 

    दारात साक्षी दिसल्यावर त्याने क्षणाचा ही विलंब न करता तिला येऊन बसायला सांगितले. राणूचा निरोप घेऊन ती लगोलग तिथून निघाली. निघताना सोनलला, राणूला घट्ट मिठी मारली. नचिकेतच्या शेजारी जाऊन बसली. गाडीला वरून छप्पर नव्हते त्यामुळे दोघे ही भिजत भिजत घरच्या वाटेने निघाले. सोनलला घेतलेला फ्रॉक आणि राणूने दिलेला खरवस अजून ही गाडीत च होता. थोडे पुढे गेल्यावर साक्षीला त्या फ्रॉक ची आठवण झाली. तिने नचिकेतला सांगितले. नचिकेत तिला म्हणला " उद्या ती येईल तेव्हा दे साक्षी तिला. आज नको. मला हे वातावरण काही ठीक वाटत नाही. आपण घरी जाऊ आता. " साक्षीने मागच्या सीटवर ठेवलेला तो अबोली फ्रॉक पहिला. परत जाण्याची तिची फार इच्छा होती. पण ती काहीच बोलू शकली नाही. पावसाचा जोर आणखी वाढला. पुन्हा बागेचा रस्ता लागला. तिथवर पोहोचे तोवर दोघे ही पूर्ण पणे भिजून गेले होते. नचिकेतने साक्षीकडे पाहिले. ओल्या कपड्यात ती कुडकुडत होती.

      प्रयोगशाळेत काही ठेवणीतले कपडे असल्याचे नचिकेतच्या लक्षात आले. त्याने गाडी बाजूला लावून साक्षीला भिजलेले डोके पुसायला सांगितले.पावसाचा जोर कमी होई पर्यंत दोघे तिथेच होते. बाहेर येऊन पावसाचा जोर वाढलेला पाहत उभे होते. तोच तिथे दूरवर गावातील काही लोकांचा गोंधळ ऐकू आला. शेताच्या बाजूने ती आरडा ओरडा करत येत होती. त्यात भानूचा ओळखीचा आवाज साक्षीला लगेच समजला. तिने नचिकेतला तसे सांगितले. नचिकेतने थोडे पुढे जाऊन हाक मारली तोच भानू समोर आला. घाबरलेल्या अवस्थेत तो काही तरी सांगण्याचा प्रयन्त करत होता. बाकीचे लोक मागेच होते. नचिकेतने त्याला पाणी प्यायला दिले. बसायला खुर्ची दिली. तो शांत होणार इतक्यात आणखी रडायला लागला. साक्षी हे सगळे दृश्य पाहून त्या क्षणी घाबरली. पण नचिकेत सोबत असल्याने तिने फारसे चेहऱ्यावर दिसू दिले नाही. नचिकेतने भानूला मिठी मारली. तो नंतर सांगू लागला. बोलताना ही तो थरथरत होता.
" दादा ... दादा ती आपली पायथ्याशी असलेली वस्ती पार गेली ओ... " नचिकेत आणि साक्षी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. आता ते तिथूनच आले होते. त्यामुळे हे ऐकून त्याच्यासाठी पचवणे कठीण होते. भानूला थोडा वेळ देत साक्षी, नचिकेत तिथेच बसले. 
साक्षी उठून बाहेर गेली. 

क्रमशः

३०. कृषी मेळावा

भाग : २८      मुंबईत साक्षी आपले पुढचे शिक्षण पूर्ण करत होती. ऍग्री प्रोडक्ट मार्केटिंगचा एम बी ए कोर्स ती तिच्या शहरातून करत होती. डिग्रीच्...