भाग : १५
नचिकेतने भानूला घडल्या घटनेची माहिती देण्यास सांगितले. भानू दम खात काही तरी अजून सांगण्याचा प्रयन्त करत होता. तो म्हणाला,
" दादा ... आपली रेणू, सोनल, धन्या, रामराव सगळेच होते, घटकाभरात सगळे संपले..."
नचिकेतने त्याला पुन्हा पाणी दिले. भानू थोडा सावरला आणि सांगू लागला
" दादा, टेकडीच्या पायथ्याशी असलेली जमीन घसरली. उतारावरची घरं पडली. नुसता गोंधळ सूरु आहे तिथं, देवाला ठावं किती नुकसान झालं ते. मातीचे ढीगारे दिसतात तिकडं नुसती... खालची शेतीवाडी बी मातीत गेली. तुम्ही पाह्यलं का आपण लावलेली नवीन कलमं समदी मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. " नचिकेत उठून उभा राहिला. साक्षीने बाहेर पाहिले. लोकांचा आवाज थोडा कमी झाला. घोळक्याने लोक गावात ओरडत जात होते.
एव्हाना बातमी गावात गेली. घरून फोन आला. झालेली सगळी हकीकत साक्षीने आराध्याला सांगितली. तेव्हा नचिकेतने साक्षीकडून फोन घेतला. आराध्याला म्हणाला " मी आणि साक्षी ... त्या टेकडीजवळच्या वस्तीजवळ आहोत. आपलं किती नुकसान झाले ते बघून आम्ही घरी येतो . आई, आण्णा ना सांग आम्ही सुखरूप आहोत."
त्याने फोन ठेवला आणि साक्षीला, भानूला घेऊन तो दुर्घटना स्थळी पोहोचला. वाटेत द्राक्षाच्या बागा आडव्या झालेल्या दिसल्या. आपली सगळ्यांची मेहनत क्षणार्धात जमीन दोस्त झालेली पाहून प्रत्येकाचे मन विषण्ण झाले. तिथे फार काळ रेंगाळता येणार नव्हते. पुढचे चित्र कसे असेल याचा अंदाज ही येत नव्हता. गाडीत साक्षी, नचिकेत आणि मागे भानू उतारावरच्या वस्तीच्या मार्गाला लागले.
थोड्याच वेळात त्यांनी वाटेत मातीचे मोठे मोठे ढीग पाहिले. सिमेंट काँक्रीटच्या पडलेल्या भिंती आणि त्यावर आडवे पडलेले पत्रे, मोडलेली कौले. गावाबाहेरची वस्ती असल्याने हवी तशी मदत ही अजून पोहोचली नव्हती. तिथले रहिवासी गावकरी जमेल तसे ढिगाऱ्यातून आपली माणसे शोधत होते. काही मदतीसाठी आवाज देत समूहाने आजूबाजूच्या गावात धाव घेत होते. काही हे हृदयद्रावक चित्र पाहून शून्यात स्तब्ध उभे होते. तर काही वाट मिळेल तिथे सैरावैरा पळत होते. साक्षी अजूनही गाडीतून हे चित्र पाहत होती. गाडीतून उतरून पुढे जायचे धाडस तिला होत नव्हते. पाय तिथेच जडावले गेले होते. थंडी ही वाजत होती. ती समोरच्या काचेतून फक्त अंदाज घेत होती. नचिकेत गाडीतून उतरून फोन कॉल वर तात्काळ मदतीसाठी बोलवत होता. भानू ही घोळक्यात जाऊन दगड विटा बाजूला करत होता. लहान मुले, बायका, गुरे, प्राणी, भांडी, कपडे काहीही ढिगाऱ्याखाली मिळत होते. कित्येकांची आजवरची मेहनत, स्वप्ने, दगड विटांचा ढीग सगळे सगळे नजरेस पडत होता.
साक्षीला तिथला तो आक्रोश पाहून रेणूची आठवण झाली. नचिकेतची गाडी जिथे उभी होती. तिथून थोडे वर गेल्यावर तिचे घर होते. तिच्या डोळ्यासमोर आता रेणू, सोनल आणि नव्याने जन्माला आलेली जनी आली होती. तिच्या अंगात दहा हत्तींचे बळ आले आणि ती गाडीतून उतरून रेणूच्या घराकडे धाव घेऊ लागली. त्या दिशेने चालायला सुरुवात केली. हळूहळू जशी ती जागा जवळ येत होती. तिचे काळीज धडधडत होते. भानू आणि नचिकेत वेगळीकडे व्यस्त होते. त्यामुळे साक्षीला दोघांनी पाहिले नाही. साक्षी रेणूच्या घराजवळ पोहोचली. तिचे घर तिथे राहिलेच नव्हते. तिथे फक्त होता तो रेणूचा चार भिंतीचा मोडलेला संसार. रेणूला साक्षी त्या ढिगाऱ्यात वेड्यासारखी शोधू लागली. कुठून सुरवात करावी काहीच कळत नव्हते. शेवटी तिच्याच घराच्या पत्राच्या आडोशाला साक्षी दोन्ही गुडघे एकत्र करून बसून राहिली. तिच्या डोळ्यात रेणू आणि सोनल सोबत जोडले गेलेले भावबंध स्पष्ट दिसत होते, ते अश्रूंसोबत वाहू लागले. ओक्साबोक्शी ती रडू लागली. तासाभरात भेट झालेली ती हाडा मासाची माणसं आणि ती जागा अचानक अदृश्य झाली कशी ? असे असंख्य प्रश्न तिच्या समोर होते. तिला तेव्हा कुठून तरी बोलण्याचा आवाज आला. मुसमुसण्याचा आवाज आला. फार मोठा नसल्याने तिला तो कोणाचा हे कळले नाही. त्याचा पाठलाग करत ती पत्राच्या मागून गेली. तिथे रेणू तिला मांडी घालून बसलेली दिसली. तिच्या मांडीवर सोनल डोकं ठेऊन होती. " ती झोपली आहे " रेणू असं काही तरी बारीक आवाजातून सांगत होती. साक्षी तिच्या जवळ गेली. तिने रेणूच्या पाठीला हात लावला तर रेणूने तो झटकला आणि त्याच धक्याने सोनलचे डोके हलले. हालचाल काहीच झाली नाही. ती उठली नाही. तिने डोळे गच्च मिटलेले होते. त्या रात्री कायमस्वरूपी झोपण्यासाठी सोनलने रेणूच्या मांडीवर डोके ठेवले होते. साक्षी पुन्हा तिच्या जवळ गेली. तिच्या निस्तेज चेहऱ्याला पाहिल्यावर साक्षीला कळले तिथे सोनमचे फक्त शरीर तिच्या मांडीवर होते. ती आता जागी होणार नव्हती. आपल्याला सोडून ती गेली आहे. रेणूला कदाचित काहीच भान नाही. हे तिने जाणले होते. साक्षीला काय करावे सुचत नव्हते. शून्यात पाहणाऱ्या रेणूकडे पाहून ती दोन पावले मागे झाली. तिथेच उभी राहून ती त्या माय लेकीकडे पाहत उभी होती. पावसाच्या पाण्यात गाडीत भिजत असलेला खरवस आणि अबोली रंगाचा फुलफुलांचा फ्रॉक तिला आठवला. ती मागे वळली. गाडीजवळ पळत गेली. रस्त्यात दगड, विटा यांच्या अडथळ्यात धडपडत ती तिथून निघाली. वाटेत खाली उतरताना अडखळली, ज्यावर पडली तो रेणूच्याच घराचा पत्रा होता. पत्र्याखाली तिला जनी ही दिसली. तिचे ते नवीन नवीन जन्माला आलेले पाय ज्यांनी अजून नीट चालणे ही शिकले नव्हते ते पत्र्याखाली अडकून तिथेच तिचा जीव गेला होता. साक्षीचे हे भयाण दृश्य पाहून हृदय पिळवटून निघाले. अलगद तो पत्रा तिने जनीच्या पायावरून काढून बाजूला केला. दूर फेकून दिला. जनीच्या पायावरून ती हात फिरवू लागली. जखमा खोलवर झाल्या होत्या. आता कसेही करून नचिकेतला तिथे मदतीसाठी बोलवायचे होते. समोर जसे तिने नचिकेतला पाहिले. त्याला जाऊन घट्ट मिठी मारली. पाच मिनिटं ती तशीच होती. शब्द ही तोंडातून येत नव्हते. तिने वरच्या बाजूला जे पाहिले ते सगळे नचिकेतला सांगितले. सांगताना तिची जीभ थरथरत होती.
भानू आणि नचिकेत काही लोकांना घेऊन तडक रेणूच्या घराजवळ गेले. नचिकेतने रेणूला आणि सोनलला तिथून बाहेर काढले. भानू रेणूला घेऊन गाडीपाशी आला. सोनलचे थंड पडलेले शरीर खाली सुरक्षित जागी ठेवताना नचिकेतच्या डोळ्यातून टचकन पाणी आले. सुरू होणाऱ्या नव्या नव्या कहाणीचा अकल्पित अंत झाला होता. हे त्याला कळले होते. स्वतः ला सावरत त्याने गाडी काढून जमेल तितक्या लोकांना प्रथमोपचारासाठी गावातील सरकारी इस्पितळात आणले. शक्य तितके साहाय्य केले. साक्षी आणि भानू तेव्हा सतत त्याच्या सोबत होते. गावात आल्यावर त्याने साक्षीला घरी जायला सांगितले. साक्षीला मात्र त्याची पाठ सोडायची नव्हती. रेणूचा चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. साक्षी रुग्णालयात आली. नचिकेतने घरून आराध्याला यायला सांगितले. साक्षी त्याचे काहीच ऐकत नव्हती. आराध्या आणि सुमित दोघे रुग्णालयात आले. आराध्या साक्षी शेजारी बसली. काहीच न बोलता साक्षी तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागली. आराध्याने खूप समजावून ही साक्षी त्या रात्री रुग्णालयातच बसून होती. आराध्याने तिच्या सोबत राहण्याचे पक्के केले होते. ती रात्र काळरात्र ठरली. प्रत्येकाच्या आयुष्यावर ओरखडे मारत सरली.
क्रमशः
No comments:
Post a Comment