भाग : १८
काही दिवसांचा रोजचा दिनक्रम झाला होता. सकाळी सुमित, आराध्या, साक्षी, नचिकेत मळ्यात जात. तिथल्या लोकांसोबतच न्याहरी करत. माई घरून जेवण पुरवत असे. मळ्याचा बराचसा भाग, कुंपण कोलमडले होते. त्याची दुरुस्ती करून त्या जागेत पुन्हा नव्याने छोटेखानी कलमं लावली गेली. शेततळे बनवले. उन्हाळ्याचे दिवस होते. पाण्याची नड होती. काही भागात चांगले उत्पन्न आले होते. पण तितके पुरेसे नव्हते. गरज मोठी होती आणि उत्पन्न तितके मिळत होते. इतक्या दिवसाच्या संशोधनाचे फळ तर मिळाले होते. फळावर किडीचा प्रादुर्भाव दिसत नव्हता. द्राक्ष पण आकाराने मोठी आणि रसदार झाली होती एव्हाना. पुढे काय ? यातून मिळकत कशी वाढवायची हा प्रश्न होता.
आराध्या सकाळची न्याहरी करून तिचे कंपनीचे काम पूर्ण करण्यासाठी जात होती. पुन्हा संध्याकाळी येऊन ती साक्षीला, नचिकेतला मदत करत असे. सुमितची सामानाची, जेवणाची ने आण करण्यात सतत मदत होत होती.
आठ एक दिवसांनी दवाखान्यातुन भानूने रेणूला घरी आणले. ती माईल्ड डिप्रेशनमध्ये मध्ये गेलेली होती. आठवडाभर तिला तिथेच औषधोपचार सुरू होते. आता ती बोलू लागली होती. चेहरा उतरला होता पण ती माणसात आली होती. ती आणि तिच्या सोबत सहा वर्षाची मुलगी तिथेच भानुच्या खोलीत राहू लागल्या. भानू काही दिवस बाहेरच्या पडवीत झोपत होता.
त्या दिवशी साक्षी, आराध्या, सुमित रेणूला आणि त्या लहान मुलीला आराध्याच्या खोलीकडे घेऊन आले. सुमित राघूला ही घेऊन आला. पिंजरा खिडकीशी ठेवत म्हणला..
" आहे आहेत तर सगळे. राघू आपल्याला गाणं म्हणून दाखवणार आहे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी "
जवळपास तासभर खिडकीशी विरंगुळा सुरू होता. भानू दारा अडून सगळं पाहत होता. आज बऱ्याच दिवसांनी प्रत्येकाचे हरवलेले हास्य मोठा प्रवास करून परत आले होते. त्याने खाली जाऊन नचिकेतला हे सांगितले. नचिकेत, अण्णा, माई पुढच्या खर्चाचे नियोजन करत बसले होते.
भानू नचिकेतला म्हणाला " दादा... वरती बघितलं का ... समदी कशी एकत्र बसून गानी बिनी म्हणतायत ... चला ना आपण बी जाऊ... तुम्हाला बी छान वाटेल. "
माई अण्णांनी नचिकेतकडे पाहिले. त्याला भानूसोबत जाण्याचा इशारा केला. नचिकेत म्हणाला " चल रे आपण पण सामील होऊया त्यांच्यात "
" चला ... चला " म्हणत भानू नचिकेतला घेऊन तिथून निघाला.
वर चांगलीच जत्रा भरली होती. विरलेली ऊर्जा पुन्हा नव्याने वाहू लागली होती. आराध्या, सुमित, रेणू, भानू, साक्षी, नचिकेत सगळेच गाण्याच्या चालीवर लहरत होते. रेणूसाठी फार कठीण होते पण तिला सोबत झाली ती त्या सहा वर्षाच्या मुलीची. तिला आपल्या दोन्ही हातानी पकडून रेणू बसली होती.आराध्या, सुमित एकमेकांच्या शेजारी बसून नकला करत होते. साक्षी नचिकेतच्या शेजारी बसली होती. गाण्याच्या धुंदीत ती त्याच्याकडे सतत पाहत होती. एक क्षण त्याच्या हाताला घट्ट धरून होती. भानू तिच्या दुसर्या बाजूला बसला होता. इतरांचे चेहरे वाचता वाचता त्याने साक्षी आणि नचिकेतच्या चेहऱ्यावरचे निर्विकार प्रेम ही वाचले.
या आधी ही गोष्ट त्याने फक्त साक्षीच्या डोळ्यात वाचली होती. आता नचिकेतच्या डोळ्यात ही तेच दिसत होते. बराच वेळ झाला तरी तो साक्षीला बाजूला करत नव्हता. त्याच्याजवळ साक्षी असणे त्याला ही आवडू लागले होते. सुमितने आता या गाण्याच्या कार्यक्रमाला पूर्णविराम देण्यासाठी राघूला गायला सांगितले. त्याच्या तार सप्तकातल्या आवाजाने आजची मैफिल संपली होती. सगळे उठुन आपापल्या खोलीत जायला निघाले.
क्रमशः
No comments:
Post a Comment