Wednesday, 26 March 2025

१४. जनी ची भेट

भाग : १३

    नचिकेतच्या मदतीने साक्षीच्या प्रोजेक्टला जोरदार सुरुवात  झाली. रोजचे ठरलेले नियोजित काम करता करता संध्याकाळ होऊन जातं. भानूच्या अगणित प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता साक्षीच्या ज्ञानात भर पडत होती. दुपारच्या वेळी रेणू सोबतीला येत असे. फक्त भरगोस उत्पन्न हे लक्ष समोर न ठेवता आता सामाजिक विचार करून इतर बागायतदारांना ही उपयोगात येईल अशा काही पद्धती सगळे मिळून तिथे विकसित करत होते. काही आणखी मजुरांना हाताशी घेऊन त्यांना ही रोजगार मिळवून दिला. यश अपयश या फिरत्या चक्रातून जाताना त्यांनी दोन महिन्यात बरीच प्रगती केली. भरगच्च भरलेली बाग आणि इवल्या इवल्या द्राक्षांची गर्दी अगदी लोभसवाणी दिसत होती. एकदा संध्याकाळचे पाच वाजले असताना रेणू सगळ्यांसाठी घरी केलेलं खरवस घेऊन आली. नुकतेच तिच्या घरी गाईच्या वासराचे आगमन झाले. रेणू सगळ्यांना खरवस देत होती. सोनल साक्षीला तिच्या घरी आलेल्या त्या पाहुण्याविषयी सांगत होती. 

    जनी नाव ठेवलं होतं तिचं. तिच्या करड्या काळ्या रंगाविषयी, तिच्या तुटक तुटक चालण्याविषयी, तिच्या मोठ्या काळ्याभोर डोळ्यांविषयी सोनल भरभरून सांगत होती. तिचे सगळे साग्रसंगीत बोलणे ऐकता ऐकता संध्याकाळ उलटून गेली. काळोख होऊ लागला. 

रेणू साक्षीला म्हणली " ताई एकदा या जनी ला पाहायला ..  लय मायाळू लेकरू हाय... आवडलं तुम्हाला बी " 

त्यांचे हे सगळे बोलणे सुरू असताना नचिकेत त्याचं काम आटोपून आला आणि रेणूला म्हणाला " रेणू आक्का ... खरवस बेस्ट होतं. उद्या घरी नेतो आई साठी. असेल तर उदयाला पण आण "

" हो आणते की... दादा... उदया सगळ्यांसाठी परत आणते. बर मी निघते आता. लय उशीर झाला. सांजच्याला दिवा बी लावायचा. चल ग सोनल. येती मी साक्षी ताई... मी सांगितलेले लक्षात ठेवा. या घरला एकदा " 

नचिकेत म्हणला " हो आम्ही पण निघतोच आता. माझं पण झालं काम सगळं. नीट जा आणि उदया खरवस आण नक्की. " 

" साक्षी चल आपण पण निघुया आता. " 

साक्षी आणि नचिकेत गाडीत बसले. साक्षी म्हणली.
" मी उद्या रेणू ताईकडे जाऊन येऊ का नचिकेत ... तिच्या घरी बोलवले तिने. गाईच्या बाळाला बघायला..प्लिज.. " 

" हो जा की त्यात काय विचारायचे ... फक्त उद्या वातावरण कसे बघ. काल रात्री पाऊस होता. पावसाच्या आधी जाऊन ये." 

" घरी काय सांगू ? तू सांगशील ना ! साक्षी नचिकेतला मनवण्याचा प्रयन्त करत होती. 

" तू वेळेत ये ... मी सांगतो बाकी ..." 

" वा ...मला सोनल साठी  एक छानसा फ्रॉक पण घ्यायचाय, तिला भेट म्हणून घेऊन जाते. मी कंपनीतला अपघात झाल्या पासून तिच्याशी फार बोललेच नाही. तिला काही तरी घेईन म्हणते. आज घरी जाताना घेऊ आपण. अबोली रंगाचा, गोल हाताचा छान फुलांनी सजलेला फ्रॉक घेऊयात आपल्या सोनलसाठी. मी उद्याच तिला देते. " 

" हो ... चालेल कीं सायंटिस्ट " नचिकेत हसत हसत म्हणला. साक्षीने नचिकेतचा हात आपल्या जवळ घेऊन ती त्याला बिलगली. तो ही तिच्याकडे विश्वासाने पाहत होता. दोघे ही तसाच सुंदर फ्रॉक घेऊन घरी आले. जेवण झाली. रात्र झालेली. खिडकीशी उभे असताना आराध्या आणि साक्षी मध्ये गुज गोष्टी सुरू होत्या. सोनलला आणलेल्या फ्रॉक विषयी साक्षीने आराध्याला सांगितले. हळूहळू नचिकेत आणि भानूच्या सहवासात राहून आराध्याला साक्षीमध्ये त्याचे स्वभाव गुण दिसू लागले होते. अचानक वाऱ्याचा जोरजोरात आवाज येऊ लागला. पाऊस पडण्याची चिन्ह दिसत होती. दोघी आत जाऊन झोपी गेल्या. 

     दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळे आपापल्या कामाला रवाना झाले. आता सगळे आभाळ निरभ्र दिसत होते. पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा कुठे मागमूसही नव्हता. नचिकेत, साक्षी प्रयोग शाळेत गेले. दिवसा उजेडी सकाळ आणि दुपारची कामे आटोपली. रेणू दुपारच्या तिच्या ठरलेल्या वेळी आली. सगळ्यांसाठी आणलेला खरवस तिने नचिकेतच्या टेबलावर ठेवला. त्याला त्याची कल्पना दिली आणि आपल्या कामाला लागली. साक्षीने तिचे ठरलेले नियोजन रेणूला सांगितले. त्याप्रमाणे रेणूने तिची कामे आटोपली. नचिकेतला सांगून साक्षी रेणू सोबत तिच्या घरी गेली. खरवस देण्याच्या गडबडीत सोनल ला आणलेला फ्रॉक नचिकेतच्या गाडीत च राहिला. थोड्याच वेळात साक्षी रेणूच्या घरी पोहोचली. तिथे पुढे येणाऱ्या वादळापासून साक्षी, रेणू अलिप्त होत्या. गेल्या गेल्या साक्षीने ते लहानसे वासरू पाहिले. आता साक्षी सोनल आणि ते वासरू या विश्वात चांगलीच रमली होती. जेवणाचा आग्रह रेणू कडून यावा आणि तो साक्षीने स्वीकारावा. इतकीच गाठ पडली आणि पुढे भले मोठे वाढलेले संकट दाराशी येऊन उभे राहिले.

क्रमशः 

Sunday, 23 March 2025

१३. मी आहे ना...

भाग : १२
      
सकाळी सगळे न्याहरीकरता टेबलावर गोळा झाले. साक्षी आणि आराध्या ही आल्या. साक्षीने आराध्याला झाला प्रकार सांगितला होता आणि आता पुढे काय करायचे ते ठरवायचे होते. आराध्या, सुमित, आई, आण्णा सगळे तिला धीर देत होते. 

आराध्या म्हणाली, " साक्षी आपण एकदा साठ्ये सरांना पुन्हा भेटू, तू काळजी करू नको. पुन्हा ही स्थिती पहिल्या सारखी होईल. आपण करू काही तरी " 

साक्षी काही केल्या पुन्हा तिथे जाणार नव्हती. तिच्या सगळ्या स्वप्नाना, आशेला त्या अपघाताने तडा गेला होता. तिने पी व्ही कंपनीत जाण्यासाठी स्पष्ट नकार दिला. 

सुमित आराध्याला मध्ये वाक्यात तोडत म्हणाला " म्हणजे साक्षी तू आता पुढे काय करणार ? तुझा प्रोजेक्ट कसा पूर्ण होणार ? " 

साक्षी म्हणाली " मी अजून घरी काहीच सांगितले  नाही. दुपारी घरी कळवेन आणि मी परत माझ्या घरी जाईन. तिथेच छोटा मोठा प्रोजेक्ट शोधून पुढे पूर्ण करेन." 

साक्षीचे बोलणे झाल्यावर नचिकेत तिच्याकडे पाहत म्हणाला " कोणाला कुठेही जायची गरज नाही. आराध्याचा कंपनीत प्रोजेक्ट सुरू आहे ना मग साक्षी पण इथेच आपल्या गावीच प्रोजेक्ट पूर्ण करेल. 

आराध्या म्हणाली " ते कसे शक्य आहे दादा. साक्षी परत कंपनी जॉईन कशी करेल ? " 

नचिकेत सांगू लागला " हे बघ साक्षी, तुला आवडणार असेल तर तू माझ्या छोट्याशा प्रयोगशाळेत पण प्रोजेक्ट करू शकतेस. मी तुला हवी ती मदत करतो. हवं तर माझं आता जे काम सुरू आहे ते तुला करायला देतो. तुला नक्की आवडेल. चालेल ना तुला ?

साक्षीला आश्चर्याचा धक्का बसला.  ती बोलू लागली. " हो... मला का नाही आवडणार ? चालेल पण मला गाईड करायचं तू, मग नक्की आवडेल " नचिकेतचे प्रोत्साहनाचे शब्द ऐकून निराशामध्ये कुठेतरी तिला आशेचा किरण दिसला. 

नचिकेतने सांगितले " आज एक काम कर दुपारचे ऊन उतरले की ये प्रयोग शाळेत. मी भानूला बोलवून घेतो. तो पण तुला थोडं मार्गदर्शन करेल. मी ही सोबत असेन. मी निघतो आता. सुमित आणेल तुला. एकटी येऊ नको." 

सुमित म्हणाला " हो हो, मै हु... ना...डोन्ट वरी "

नचिकेत आराध्याला घेऊन गेला. तिला वाटेत सोडले. जाता जाता आराध्याने नचिकेतला घट्ट मिठी मारली. 
साक्षीवर नचिकेतने टाकलेल्या विश्वासासाठी ती मिठी होती हे नचिकेतला न सांगताच कळाले. इतरांच्या अंतरंगात डोकावून माणसे ओळखण्याचे कसब नचिकेतला लहान वयातच अवगत झाले होते. 

दुपारची वेळ झाली. सुमित साक्षीला घेऊन आला. पहिल्या दिवशी फक्त तोंड ओळख झाली. साक्षीला माहिती काढण्यासाठी काही पुस्तके दिली. द्राक्षाच्या झाडावर येणाऱ्या विशिष्ट कीड आणि त्या पासुन कमीत कमी नुकसान कसे होईल. यावर नचिकेतचे संशोधन सुरू झाले होते. त्यासाठीची वेगळी बियाणे, खत आणि छोटी जागा राखीव ठेवलेली होती. काही उपकरणे आणि अत्याधुनिक साहित्य, किट त्यासाठी त्याने विकत आणलेले. हा सारा संशोधनाचा संसार त्याने साक्षीला दाखवला. पाहुणे वाटणारे हे साहित्य आता आपल्याशी नाते जोडणार त्यामुळे साक्षी ही प्रत्येक गोष्ट स्पर्श करून, निरीक्षण करून पाहत होती. नंतर भानूने पॉलिहाऊसमध्ये लावलेली रोपे दाखवली. प्रयोगशाळेच्या मागच्या बाजूला एक रोप वाटिका केलेली दाखवली. हे सगळे दाखवताना भानूचे संशोधक प्रश्न सुरूच होते. साक्षीला फारशी माहिती नसल्याने ती फक्त तेव्हा ऐकायच्या भूमिकेत होती. भानूचे काही प्रश्न पुढे जाऊन ती नचिकेतला विचारण्याच्या बेतात होती. हळूहळू भानूच्या सततच्या प्रश्नांची तिने सवय करून घेतली. नचिकेत तिच्यावर लक्ष ठेवून होता. कामासोबत ही माणसांशी ही छान जुळवुन घेते. हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे साक्षीला ही संधी दिल्याचा त्याला आनंदच झाला.  बरीच माहिती कळली होती. सूर्य मावळायला आला. आराध्या आणि सुमित ही तिथे तेवढ्यात आले. 

साक्षीचा फुललेला चेहरा पाहून आराध्या म्हणाली " साक्षी... काम आवडलं वाटतं... आज जाऊया ना ओढ्यावर ! " 

नचिकेत म्हणाला " हो पण लवकर निघू आज. पावसाची चिन्ह दिसतात. आज काल रोज च हा पाऊस हुलकावणी देऊन जातो. सगळे आकाश काळे करून जातो. येत मात्र नाही. तरीही काळजी घेऊया. कधी ही येईल. चला निघुया. " 

सगळे तिथून निघाले. भानू त्याच्या वाटेने घरी गेला. बाकीचा सारा गोतावळा ओढ्यावरचा सूर्यास्त पाहून घरी आला. दिवस आनंदात सरला. काळ्या ढगांचे आच्छादन आले होते, पण त्याला बरसून येण्यासाठी ती वेळ आली नव्हती. ती लवकरच येणार होती. तेव्हा फक्त सुसाट वारा सुटला होता. वाऱ्याच्या वेगाने रात्र ही  सरली.

क्रमशः

Thursday, 20 March 2025

१२. विश्वासाचा हात

भाग : ११

     नचिकेत सोनल जवळ आला. सोनलला जवळ बोलवून नचिकेत विचारू लागला, 
" झाशीची राणी, इथे एकटी कशी आलीस, राणू कुठे? तुला घरी सोडतो चल " 
नचिकेत तिला कडेवर घेऊन निघणारच इतक्यात सोनल म्हणली. 
" आई आली ना सोबत... तिथे ताईसोबत आहे वावरात ! " 
" कोण ग ताई... दाखव चल मला कुठे ? " 
इकडून या माझ्या मागं " 
नचिकेत तिच्या सोबत मागे मागे गेला. विहिरीजवळ राणू आणि साक्षी बसलेले त्याला दिसले. राणू मांडी घालून बसली होती. तिच्या मांडीवर डोकं ठेवून साक्षी आपले डोळे पुसत होती. साक्षीला पाहून नचिकेतने सुटकेचा निश्वास सोडला. 
" साक्षी .... " 
" कुठे होतीस इतका वेळ; सगळे शोधत आहेत आणि तू राणू सोबत .... तुला कळत नाही का साक्षी, राणू तू तरी सांग आता " नचिकेत तिच्याकडे पाहत थोडा रागाने,  राणूच्या बाजूला बसून बोलू लागला.

राणू सांगू लागली " हो दादा ... थांबा दम धरा सांगते मी... ही पोरगी मला खरं तर ओढ्यावरच दिसली. शेळ्या चरताना माझं ध्यान हिच्याकडं गेलं. भानू नेमका लवकर माघारी गेला. त्याची दुपारची काम मी घेतलेली. मग तिथे हिला बघून जवळ जाऊन इचारलं काय झालं ? तर पोरगी रडायला लागली. मग तिला घेऊन मी तिथेच जवळ शिवारावर बसले. शेळ्या जागी लावल्या आणि सोनल सोबत ती थोडी रमली. पोरगी जरा बरी झाली. सावरली तर तिला इथे आणलं म्हणली तिला इथून घरी जायचा रस्ता ठाव हाय. तर सोनल, मी आणि साक्षी इकडं निघालो. सोनल पुढं आली पळत. आता हिला इथंच राहायचे म्हणते. " 

नचिकेतने राणूचे आभार मानले आणि पुढे बोलू लागला 
" राणू तू हिला पाहिलेस आणि घेऊन गेलीस ते बरं केलं पण किमान कोणाला सांगायचं तरी साक्षी ... अशी कशी तू " 
नचिकेतच्या कान पिचक्या ऐकून साक्षीला परत रडू आले. राणू म्हणली " राहू दे दादा ... पोरगी घावली ना. निवांत जावा आता घरला " 

साक्षी डोळे चोळत उठून बसली.
" हो हो आम्ही निघतो आता. घरी वाट बघत असतील सगळे. तुम्ही दोघी पण नीट जा घरी. मी सोडू का तुम्हाला घराजवळ ? " नचिकेत
" नगं ... नगं दादा तुम्ही आता कुठे परत येता...नंतर न या... साक्षी ताईला घेऊन, आम्ही जातो आता ... चल ग सोने " राणू
नचिकेत उठून उभा राहिला. त्याने साक्षी कडे पाहिले. निराश झालेल्या साक्षीचा चेहरा उतरला होता. तिच्या खांद्यावर हात ठेवत नचिकेत म्हणाला 
" चल ग साक्षी "
नचिकेतने घरी साक्षी सापडल्याचे कळवले.
साक्षी त्या दोघींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभी राहिली. 

 नचिकेत सगळे बंद करून टाळे लावून निघाला. 
साक्षी तिथेच उंबरठ्यावर बसलेली होती. 
" चल जाऊया ना घरी..."
साक्षी जागची हलली ही नाही. तिच्या चेहऱ्यावरून ती काही तिथुन उठणार नाही. असे भासत होते,
" मी आज इथेच थांबते. तू जा घरी. मी ठीक आहे सांग " साक्षी

आता नचिकेतची पुरती पंचाईत झाली. काय करावे सुचेना. त्याने तेव्हा एक युक्ती केली. तिला पुन्हा त्या ओढयाजवळ घेऊन गेला. दोघे चालत पुन्हा निघाले. त्यानं साक्षीचा हात घट्ट धरला होता. तिकडे पोहोचल्यावर तिथे आता फक्त रात किड्यांचा आवाज आणि खळाळत्या पाण्याचा आवाज होता. आजूबाजूला काळाकुट्ट अंधार होता. वर कुठे तर ढगाआड चंद्र होता. त्याचा धूसर प्रकाश पाण्यावर पडत होता. दोघे ही ओढ्यालगतच्या कट्ट्यावर बसले. सुरवातीला ती काहीच बोलली नाही. नंतर नचिकेतने बसल्या बसल्या तिला कट्ट्यावरून ढकलण्याची नक्कल केली. घाबरून ती नचिकेत खेटून बसली. ते पाहून नचिकेत हसत म्हणला " बोल काय झालं..आता ? घरी का येणार नाही. कोणी काही बोललं का तुला ? " 
" नाही ... " म्हणत मुसमुसत ती आणखी तोंड पाडून बसली. 
" हे बघ... आता मला सांग नंतर मी तुला त्या ओढ्यावर आणखी एक जादू आहे ती दाखवतो " नचिकेत तिच्याकडे पाहत पाहत तिला समजावत होता. 
" माझ्याकडून आज कंपनीत एक अपघात झाला. आणि सरांनी माझी इंटर्नशिप तिथेच थांबवली. माझ्याकडून ते काम हवे तसे झाले नाही. थोडक्यात निभावले नाही तर माझ्यामुळे दुखापत झाली असती. मी चार दिवस पण गेले नाही. आता काय सबमिट करू कॉलेजात ? मी तिथे परत जाणार नाही. उद्याच मी माझ्या घरी जाण्याची तयारी करते. " साक्षी

बोलता बोलता तिच्या डोळ्यातून गंगा जमूना सुरूच होत्या. नचिकेतच्या लक्षात आले. साक्षी आता जास्त काही बोलू शकत नव्हती. त्याने तिला तिथून उठून ओढयालगत असलेल्या चिंचेच्या झाडापाशी नेले. वाटेत खडकाळ रस्ता होता. नचिकेतने तिचा हात पकडला.  साक्षीने ही नचिकेतची मूठ घट्ट पकडली, गवताची सळसळ तेव्हा रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात आणखी भयाण वाटू लागली होती. साक्षी डोळे गच्च मिटून एक एक पाऊल पुढे टाकत होती. तिला समोर पाहायला सांगितले. बरेच काजवे तिथे झाडाला, आजूबाजूला चमकताना दिसले. ते चमचमणारे विश्व पाहून साक्षी तिचे दुःख आणि रडणे विसरून त्यात रमली. नचिकेतला ही हायसे झाले. तिच्या चेहऱ्यावर आनंद खुलला होता. आनंदाच्या भरात तिने नचिकेतला मिठी मारली. अंधार बराच झालेला. त्यामुळे तिथून निघायला हवे. हे नचिकेतच्या लक्षात आले. त्याने साक्षीला तसे सांगितले. नचिकेतने पुन्हा तिचा हात धरला. दोघे ही बोलत बोलत प्रयोग शाळेपर्यन्त आले. तिथे गाडी होती. साक्षी गाडीत बसली. गाडीत ती काहीच बोलली नाही. पण तिच्या चेहऱ्यावर तिथे पाहिलेला चमचमता आनंद होता. त्यामुळे तो तसाच रहावा म्हणून नचिकेत ही काही बोलला नाही. 

दोघे घरी परत आले. घरी सगळी गोष्ट आधीच माहिती होती. त्यामुळे आराध्याने साक्षीला आल्या आल्याच मिठी मारली. तिला खोलीत घेऊन गेली. तोपर्यन्त नचिकेतने सगळयांना ती राणूकडे असल्याचे सांगितले.
 " तिला फार काही विचारू नका." इतकं बोलून तो ही त्याच्या खोलीत गेला. साक्षीचा खोलीत गेल्या गेल्याच डोळा लागला. ती जेवायला ही आली नाही. रात्र बरीच झालेली पण नचिकेतला अजून झोप लागली नाही. आराध्या सारखेच साक्षी सोबत नचिकेतचे चांगले बॉंडिंग झाले असताना अचानक तिच्या बाबतीत आज घडलेली घटना त्याच्या पचनी पडत नव्हती. तिचा स्वभाव पाहता उद्याच ती निघून जाईल. याची ही त्याला चिंता वाटत होती. तिच्यासाठी काही तरी करायला हवे असा विचार सतत त्याच्या डोक्यात फिरू लागला. त्याच विचारात तो झोपी गेला. 

क्रमशः 

Saturday, 1 March 2025

११. अपघात

भाग : १०

नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी आपली तयारी करून दोघी निघाल्या. नचिकेतने जाता जाता आठवण करून दिली,
 " आज येताय ना द्राक्ष बागेत, मी वाट पाहतोय " 
आराध्याचे त्याच्या बोलण्याकडे फारसे लक्ष नव्हते. साक्षीने मात्र लगेच प्रतिसाद दिला. 
" हो तर ... येणार ना नचिकेत " 
सुमित म्हणाला " चला आधी कंपनीत जाऊ " 
सगळे आपापल्या मार्गाला लागले. पाहता पाहता त्यांचे काम सुरू ही झाले. दोन मोठे स्टीलचे कंटेनर समोर आले. सगळे दिलेल्या कृती नुसार सुरू होते. आराध्याने मध्ये काही वेळासाठी तिथून काढता पाय घेतला. जाताना साक्षीला सांगून ठेवले " बाकीचे काम झालेले आहे. आता फक्त इंस्टोलेशन बाकी आहे. ते मी पंधरा वीस मिनिटांनी येऊन करायला सांगते. तू थांबते ना इथे." 
साक्षी म्हणाली " हो हो, तू जाऊन ये. मी आहे इथे." 
साक्षीने ही तिचे काम पूर्ण केले होते. इंस्टोलेशन राहिलेले. मजूर नंतर आराध्याच्या कामाला लागतील; त्यामुळे आपण आपले काम पूर्ण करूया असा विचार तिच्या मनात आला. ठरल्याप्रमाणे तिने दोघांना हाताशी घेऊन ते काम करायला घेतले. याच दरम्यान अचानक एका जागेवर व्यवस्थित फिक्स न बसल्याने तो फरमेन्टर खाली आला. जागे वरून घसरला. मोठ्याने आवाज झाला. त्यात बरेचसे खर्चिक नुकसान ही झाले. लगेच गर्दी झाली. सगळे कामगार आजूबाजूला येऊन उभे राहिले. साक्षी जवळच उभी होती. यात तिला ही दुखापत होण्याची शक्यता होती, पण तसे काही झाले नाही. दोन्ही मजूर आणि साक्षी थोडक्यात बचावले. 

मोठा आवाज झाल्याने मात्र तांत्रिक प्रमुख साठ्ये सर तिथे आले. चर्चा करू लागले. त्यांनी जागेची शहानिशा केली. कोणाला काही दुखापत झाली नाही याची खात्री केली. सगळे झाल्या नंतर मात्र तांत्रिक प्रमुखांनी साक्षीला बोलवून घेतले आणि तिला  झाल्या प्रकारासाठी सुनावले. स्वभावाने तापट असल्याने त्यांनी तिचे काम तिथेच थांबवण्याचे जाहीर केले. हताश झालेली साक्षी काहीच उत्तर देऊ शकली नाही. तिथून तडक उठून ती तिच्या जागेवर आली. आपले होते ते सगळे सामान घेऊन ती घराच्या वाटेने निघाली. बाजूला आराध्या कुठेच नजरेस पडली नाही. तिने तिच्या टेबलावर निरोपाची एक चिट्ठी ठेवली. साक्षी कंपनीतून बाहेर पडली. 

दुपारचे चार वाजले होते. रणरणत्या उन्हात ती एकटीच चालत येत होती. वळणा वळण्याच्या वाटेवर पुढचे वळण शोधत ती झपाझप पावले टाकत रस्त्याने जात होती. फोन बॅगेत कुठेतरी खाली गेलेला त्याकडे तिचे लक्ष ही नव्हते. पाहता पाहता तिला बागेचा रस्ता लागला. घरी जाऊन काय सांगावे तिला कळेना.
कंपनी मध्ये एकच चर्चा सुरू होती. " मोठा अपघात झाला. " 

आराध्याच्या कानावर ही बातमी आली. ती कॅन्टीनमधून निघताना तिथली चार पाच मुलं यावर चर्चा करत होती. ती तशीच घाई घाईत त्या ठिकाणी पोहोचली. तिथे एव्हाना सगळे सुस्थितीत झाले होते. काम सुरू होती. पण साक्षी मात्र कुठे दिसली नाही. तिच्या जागेवर तिचे सामान पण नव्हते, बॅग नव्हती, डबा  नव्हता. चिट्ठी मात्र नजरेस पडली. ज्यावर ती घरी जाते इतकेच लिहिलेले होते. आराध्याने तिला संपर्क करण्याचा प्रयन्त केला पण तो ही लागला नाही. घरी कळवले. साक्षी आली की लगेच कळवायला सांगितले. निघण्याची वेळ होण्यासाठी अजून तासभर होता. आराध्याला तिथुन निघता येत नव्हते. तिने सुमितला फोन वर सगळी हकीकत सांगितली. सुमितने घरी ही झाला प्रकार सांगितला. माई, सुमित सतत साक्षीला फोन लावत होते. तिचा फोन मात्र संपर्क कक्षेच्या बाहेर येत होता. शेवटी सुमित गाडी घेऊन कंपनीच्या दिशेने निघाला. रस्त्यात त्याची नजर साक्षीला शोधत होती. विचारत विचारत तो कंपनीच्या गेट पर्यन्त आला. थोड्याच वेळात आराध्या निघणार होती. ती खिडकीपाशी आली तसे तिला खाली सुमित गाडी घेऊन दिसला. तिने त्याला पुन्हा फोन लावला. 
" हॅलो...अरे साक्षी आली का घरी... सांग लवकर ? " आराध्याचा आवाज फोनवरुन रडवेला झाला होता. 
" आरु... मला रस्त्यात ती कुठेही दिसली नाही. तूला तुझ्या बॉस ना विचारून निघता येतं का पहा. मी थांबतो खाली तो पर्यंत " सुमितने तिला उत्तर दिले. 
" हो मी विचारते. ती ठीक असेल ना. इथे नक्की काय झाले ते पण मला कळलं नाही. अचानक कुठे गेली ही मुलगी " आराध्या फोनवर चिंतेच्या स्वरात बोलत होती. 
" तू फोन ठेव आता. विचारून ये आणि लवकर, बघू आपण. शोधू तिला " सुमितने सांगत सांगत फोन ठेवला. 

आराध्याने झाला प्रकार साठ्येच्या कानावर घातला. साक्षी गेले दोन तास गायब आहे हे ऐकून त्यांच्या ही चेहऱ्यावर आठ्या पडल्या. कपाळाला दरदरून घाम आला. आराध्याला निघण्याची परवानगी दिली. सुमित खालीच थांबला होता. दोघेही घरच्या दिशेने निघाले. सूर्यास्त व्हायची वेळ झाली. पण साक्षी कुठेच दिसली नाही. आराध्या आणि सुमित घरी आले. थोड्याच वेळात नचिकेत ही आला. त्याला अजूनही झालेला प्रकार माहिती नव्हता. काही कामानिमित्त तो दुपार पासून तालुक्याच्या ठिकाणी गेला होता. सगळी हकीकत कळल्यावर त्याने आराध्याला आणि आईला शांत राहायला सांगितले. बाहेर अंधारले होते. त्यात साक्षीला शोधणे आणखी अवघड झाले असते. 

थोडा विचार केल्यावर तो तडक तिथून उठला आणि गाडी घेऊन मळ्याच्या दिशेने गेला. तिथे सगळीकडे सामसुम झालेले. रात किड्यांचा तेवढा किर... आवाज येत होता. तिथून पुढे तो ओढ्यापाशी गेला.  ओढ्याजवळ ही साक्षी नव्हती. काय करावं सुचत नव्हते. तसाच तो मळ्यात आला. प्रयोग शाळेत जाऊन बसला. पाच दहा मिनिटे  तिथेच बसुन राहिला. बाहेरून लहान मुलीचा बोलण्याचा आवाज यायला लागला. नक्की कोण ? पाहण्यासाठी तो बाहेर आला तर तिथे सोनल होती. गुरांच्या बाजूला ती हसत इकडून तिकडे पळत होती. 

क्रमशः 

३०. कृषी मेळावा

भाग : २८      मुंबईत साक्षी आपले पुढचे शिक्षण पूर्ण करत होती. ऍग्री प्रोडक्ट मार्केटिंगचा एम बी ए कोर्स ती तिच्या शहरातून करत होती. डिग्रीच्...