भाग : १३
नचिकेतच्या मदतीने साक्षीच्या प्रोजेक्टला जोरदार सुरुवात झाली. रोजचे ठरलेले नियोजित काम करता करता संध्याकाळ होऊन जातं. भानूच्या अगणित प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता साक्षीच्या ज्ञानात भर पडत होती. दुपारच्या वेळी रेणू सोबतीला येत असे. फक्त भरगोस उत्पन्न हे लक्ष समोर न ठेवता आता सामाजिक विचार करून इतर बागायतदारांना ही उपयोगात येईल अशा काही पद्धती सगळे मिळून तिथे विकसित करत होते. काही आणखी मजुरांना हाताशी घेऊन त्यांना ही रोजगार मिळवून दिला. यश अपयश या फिरत्या चक्रातून जाताना त्यांनी दोन महिन्यात बरीच प्रगती केली. भरगच्च भरलेली बाग आणि इवल्या इवल्या द्राक्षांची गर्दी अगदी लोभसवाणी दिसत होती. एकदा संध्याकाळचे पाच वाजले असताना रेणू सगळ्यांसाठी घरी केलेलं खरवस घेऊन आली. नुकतेच तिच्या घरी गाईच्या वासराचे आगमन झाले. रेणू सगळ्यांना खरवस देत होती. सोनल साक्षीला तिच्या घरी आलेल्या त्या पाहुण्याविषयी सांगत होती.
जनी नाव ठेवलं होतं तिचं. तिच्या करड्या काळ्या रंगाविषयी, तिच्या तुटक तुटक चालण्याविषयी, तिच्या मोठ्या काळ्याभोर डोळ्यांविषयी सोनल भरभरून सांगत होती. तिचे सगळे साग्रसंगीत बोलणे ऐकता ऐकता संध्याकाळ उलटून गेली. काळोख होऊ लागला.
रेणू साक्षीला म्हणली " ताई एकदा या जनी ला पाहायला .. लय मायाळू लेकरू हाय... आवडलं तुम्हाला बी "
त्यांचे हे सगळे बोलणे सुरू असताना नचिकेत त्याचं काम आटोपून आला आणि रेणूला म्हणाला " रेणू आक्का ... खरवस बेस्ट होतं. उद्या घरी नेतो आई साठी. असेल तर उदयाला पण आण "
" हो आणते की... दादा... उदया सगळ्यांसाठी परत आणते. बर मी निघते आता. लय उशीर झाला. सांजच्याला दिवा बी लावायचा. चल ग सोनल. येती मी साक्षी ताई... मी सांगितलेले लक्षात ठेवा. या घरला एकदा "
नचिकेत म्हणला " हो आम्ही पण निघतोच आता. माझं पण झालं काम सगळं. नीट जा आणि उदया खरवस आण नक्की. "
" साक्षी चल आपण पण निघुया आता. "
साक्षी आणि नचिकेत गाडीत बसले. साक्षी म्हणली.
" मी उद्या रेणू ताईकडे जाऊन येऊ का नचिकेत ... तिच्या घरी बोलवले तिने. गाईच्या बाळाला बघायला..प्लिज.. "
" हो जा की त्यात काय विचारायचे ... फक्त उद्या वातावरण कसे बघ. काल रात्री पाऊस होता. पावसाच्या आधी जाऊन ये."
" घरी काय सांगू ? तू सांगशील ना ! साक्षी नचिकेतला मनवण्याचा प्रयन्त करत होती.
" तू वेळेत ये ... मी सांगतो बाकी ..."
" वा ...मला सोनल साठी एक छानसा फ्रॉक पण घ्यायचाय, तिला भेट म्हणून घेऊन जाते. मी कंपनीतला अपघात झाल्या पासून तिच्याशी फार बोललेच नाही. तिला काही तरी घेईन म्हणते. आज घरी जाताना घेऊ आपण. अबोली रंगाचा, गोल हाताचा छान फुलांनी सजलेला फ्रॉक घेऊयात आपल्या सोनलसाठी. मी उद्याच तिला देते. "
" हो ... चालेल कीं सायंटिस्ट " नचिकेत हसत हसत म्हणला. साक्षीने नचिकेतचा हात आपल्या जवळ घेऊन ती त्याला बिलगली. तो ही तिच्याकडे विश्वासाने पाहत होता. दोघे ही तसाच सुंदर फ्रॉक घेऊन घरी आले. जेवण झाली. रात्र झालेली. खिडकीशी उभे असताना आराध्या आणि साक्षी मध्ये गुज गोष्टी सुरू होत्या. सोनलला आणलेल्या फ्रॉक विषयी साक्षीने आराध्याला सांगितले. हळूहळू नचिकेत आणि भानूच्या सहवासात राहून आराध्याला साक्षीमध्ये त्याचे स्वभाव गुण दिसू लागले होते. अचानक वाऱ्याचा जोरजोरात आवाज येऊ लागला. पाऊस पडण्याची चिन्ह दिसत होती. दोघी आत जाऊन झोपी गेल्या.
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळे आपापल्या कामाला रवाना झाले. आता सगळे आभाळ निरभ्र दिसत होते. पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा कुठे मागमूसही नव्हता. नचिकेत, साक्षी प्रयोग शाळेत गेले. दिवसा उजेडी सकाळ आणि दुपारची कामे आटोपली. रेणू दुपारच्या तिच्या ठरलेल्या वेळी आली. सगळ्यांसाठी आणलेला खरवस तिने नचिकेतच्या टेबलावर ठेवला. त्याला त्याची कल्पना दिली आणि आपल्या कामाला लागली. साक्षीने तिचे ठरलेले नियोजन रेणूला सांगितले. त्याप्रमाणे रेणूने तिची कामे आटोपली. नचिकेतला सांगून साक्षी रेणू सोबत तिच्या घरी गेली. खरवस देण्याच्या गडबडीत सोनल ला आणलेला फ्रॉक नचिकेतच्या गाडीत च राहिला. थोड्याच वेळात साक्षी रेणूच्या घरी पोहोचली. तिथे पुढे येणाऱ्या वादळापासून साक्षी, रेणू अलिप्त होत्या. गेल्या गेल्या साक्षीने ते लहानसे वासरू पाहिले. आता साक्षी सोनल आणि ते वासरू या विश्वात चांगलीच रमली होती. जेवणाचा आग्रह रेणू कडून यावा आणि तो साक्षीने स्वीकारावा. इतकीच गाठ पडली आणि पुढे भले मोठे वाढलेले संकट दाराशी येऊन उभे राहिले.
क्रमशः
No comments:
Post a Comment