भाग : १२
सकाळी सगळे न्याहरीकरता टेबलावर गोळा झाले. साक्षी आणि आराध्या ही आल्या. साक्षीने आराध्याला झाला प्रकार सांगितला होता आणि आता पुढे काय करायचे ते ठरवायचे होते. आराध्या, सुमित, आई, आण्णा सगळे तिला धीर देत होते.
आराध्या म्हणाली, " साक्षी आपण एकदा साठ्ये सरांना पुन्हा भेटू, तू काळजी करू नको. पुन्हा ही स्थिती पहिल्या सारखी होईल. आपण करू काही तरी "
साक्षी काही केल्या पुन्हा तिथे जाणार नव्हती. तिच्या सगळ्या स्वप्नाना, आशेला त्या अपघाताने तडा गेला होता. तिने पी व्ही कंपनीत जाण्यासाठी स्पष्ट नकार दिला.
सुमित आराध्याला मध्ये वाक्यात तोडत म्हणाला " म्हणजे साक्षी तू आता पुढे काय करणार ? तुझा प्रोजेक्ट कसा पूर्ण होणार ? "
साक्षी म्हणाली " मी अजून घरी काहीच सांगितले नाही. दुपारी घरी कळवेन आणि मी परत माझ्या घरी जाईन. तिथेच छोटा मोठा प्रोजेक्ट शोधून पुढे पूर्ण करेन."
साक्षीचे बोलणे झाल्यावर नचिकेत तिच्याकडे पाहत म्हणाला " कोणाला कुठेही जायची गरज नाही. आराध्याचा कंपनीत प्रोजेक्ट सुरू आहे ना मग साक्षी पण इथेच आपल्या गावीच प्रोजेक्ट पूर्ण करेल.
आराध्या म्हणाली " ते कसे शक्य आहे दादा. साक्षी परत कंपनी जॉईन कशी करेल ? "
नचिकेत सांगू लागला " हे बघ साक्षी, तुला आवडणार असेल तर तू माझ्या छोट्याशा प्रयोगशाळेत पण प्रोजेक्ट करू शकतेस. मी तुला हवी ती मदत करतो. हवं तर माझं आता जे काम सुरू आहे ते तुला करायला देतो. तुला नक्की आवडेल. चालेल ना तुला ?
साक्षीला आश्चर्याचा धक्का बसला. ती बोलू लागली. " हो... मला का नाही आवडणार ? चालेल पण मला गाईड करायचं तू, मग नक्की आवडेल " नचिकेतचे प्रोत्साहनाचे शब्द ऐकून निराशामध्ये कुठेतरी तिला आशेचा किरण दिसला.
नचिकेतने सांगितले " आज एक काम कर दुपारचे ऊन उतरले की ये प्रयोग शाळेत. मी भानूला बोलवून घेतो. तो पण तुला थोडं मार्गदर्शन करेल. मी ही सोबत असेन. मी निघतो आता. सुमित आणेल तुला. एकटी येऊ नको."
सुमित म्हणाला " हो हो, मै हु... ना...डोन्ट वरी "
नचिकेत आराध्याला घेऊन गेला. तिला वाटेत सोडले. जाता जाता आराध्याने नचिकेतला घट्ट मिठी मारली.
साक्षीवर नचिकेतने टाकलेल्या विश्वासासाठी ती मिठी होती हे नचिकेतला न सांगताच कळाले. इतरांच्या अंतरंगात डोकावून माणसे ओळखण्याचे कसब नचिकेतला लहान वयातच अवगत झाले होते.
दुपारची वेळ झाली. सुमित साक्षीला घेऊन आला. पहिल्या दिवशी फक्त तोंड ओळख झाली. साक्षीला माहिती काढण्यासाठी काही पुस्तके दिली. द्राक्षाच्या झाडावर येणाऱ्या विशिष्ट कीड आणि त्या पासुन कमीत कमी नुकसान कसे होईल. यावर नचिकेतचे संशोधन सुरू झाले होते. त्यासाठीची वेगळी बियाणे, खत आणि छोटी जागा राखीव ठेवलेली होती. काही उपकरणे आणि अत्याधुनिक साहित्य, किट त्यासाठी त्याने विकत आणलेले. हा सारा संशोधनाचा संसार त्याने साक्षीला दाखवला. पाहुणे वाटणारे हे साहित्य आता आपल्याशी नाते जोडणार त्यामुळे साक्षी ही प्रत्येक गोष्ट स्पर्श करून, निरीक्षण करून पाहत होती. नंतर भानूने पॉलिहाऊसमध्ये लावलेली रोपे दाखवली. प्रयोगशाळेच्या मागच्या बाजूला एक रोप वाटिका केलेली दाखवली. हे सगळे दाखवताना भानूचे संशोधक प्रश्न सुरूच होते. साक्षीला फारशी माहिती नसल्याने ती फक्त तेव्हा ऐकायच्या भूमिकेत होती. भानूचे काही प्रश्न पुढे जाऊन ती नचिकेतला विचारण्याच्या बेतात होती. हळूहळू भानूच्या सततच्या प्रश्नांची तिने सवय करून घेतली. नचिकेत तिच्यावर लक्ष ठेवून होता. कामासोबत ही माणसांशी ही छान जुळवुन घेते. हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे साक्षीला ही संधी दिल्याचा त्याला आनंदच झाला. बरीच माहिती कळली होती. सूर्य मावळायला आला. आराध्या आणि सुमित ही तिथे तेवढ्यात आले.
साक्षीचा फुललेला चेहरा पाहून आराध्या म्हणाली " साक्षी... काम आवडलं वाटतं... आज जाऊया ना ओढ्यावर ! "
नचिकेत म्हणाला " हो पण लवकर निघू आज. पावसाची चिन्ह दिसतात. आज काल रोज च हा पाऊस हुलकावणी देऊन जातो. सगळे आकाश काळे करून जातो. येत मात्र नाही. तरीही काळजी घेऊया. कधी ही येईल. चला निघुया. "
सगळे तिथून निघाले. भानू त्याच्या वाटेने घरी गेला. बाकीचा सारा गोतावळा ओढ्यावरचा सूर्यास्त पाहून घरी आला. दिवस आनंदात सरला. काळ्या ढगांचे आच्छादन आले होते, पण त्याला बरसून येण्यासाठी ती वेळ आली नव्हती. ती लवकरच येणार होती. तेव्हा फक्त सुसाट वारा सुटला होता. वाऱ्याच्या वेगाने रात्र ही सरली.
क्रमशः
No comments:
Post a Comment