भाग : ११
नचिकेत सोनल जवळ आला. सोनलला जवळ बोलवून नचिकेत विचारू लागला,
" झाशीची राणी, इथे एकटी कशी आलीस, राणू कुठे? तुला घरी सोडतो चल "
नचिकेत तिला कडेवर घेऊन निघणारच इतक्यात सोनल म्हणली.
" आई आली ना सोबत... तिथे ताईसोबत आहे वावरात ! "
" कोण ग ताई... दाखव चल मला कुठे ? "
इकडून या माझ्या मागं "
नचिकेत तिच्या सोबत मागे मागे गेला. विहिरीजवळ राणू आणि साक्षी बसलेले त्याला दिसले. राणू मांडी घालून बसली होती. तिच्या मांडीवर डोकं ठेवून साक्षी आपले डोळे पुसत होती. साक्षीला पाहून नचिकेतने सुटकेचा निश्वास सोडला.
" साक्षी .... "
" कुठे होतीस इतका वेळ; सगळे शोधत आहेत आणि तू राणू सोबत .... तुला कळत नाही का साक्षी, राणू तू तरी सांग आता " नचिकेत तिच्याकडे पाहत थोडा रागाने, राणूच्या बाजूला बसून बोलू लागला.
राणू सांगू लागली " हो दादा ... थांबा दम धरा सांगते मी... ही पोरगी मला खरं तर ओढ्यावरच दिसली. शेळ्या चरताना माझं ध्यान हिच्याकडं गेलं. भानू नेमका लवकर माघारी गेला. त्याची दुपारची काम मी घेतलेली. मग तिथे हिला बघून जवळ जाऊन इचारलं काय झालं ? तर पोरगी रडायला लागली. मग तिला घेऊन मी तिथेच जवळ शिवारावर बसले. शेळ्या जागी लावल्या आणि सोनल सोबत ती थोडी रमली. पोरगी जरा बरी झाली. सावरली तर तिला इथे आणलं म्हणली तिला इथून घरी जायचा रस्ता ठाव हाय. तर सोनल, मी आणि साक्षी इकडं निघालो. सोनल पुढं आली पळत. आता हिला इथंच राहायचे म्हणते. "
नचिकेतने राणूचे आभार मानले आणि पुढे बोलू लागला
" राणू तू हिला पाहिलेस आणि घेऊन गेलीस ते बरं केलं पण किमान कोणाला सांगायचं तरी साक्षी ... अशी कशी तू "
नचिकेतच्या कान पिचक्या ऐकून साक्षीला परत रडू आले. राणू म्हणली " राहू दे दादा ... पोरगी घावली ना. निवांत जावा आता घरला "
साक्षी डोळे चोळत उठून बसली.
" हो हो आम्ही निघतो आता. घरी वाट बघत असतील सगळे. तुम्ही दोघी पण नीट जा घरी. मी सोडू का तुम्हाला घराजवळ ? " नचिकेत
" नगं ... नगं दादा तुम्ही आता कुठे परत येता...नंतर न या... साक्षी ताईला घेऊन, आम्ही जातो आता ... चल ग सोने " राणू
नचिकेत उठून उभा राहिला. त्याने साक्षी कडे पाहिले. निराश झालेल्या साक्षीचा चेहरा उतरला होता. तिच्या खांद्यावर हात ठेवत नचिकेत म्हणाला
" चल ग साक्षी "
नचिकेतने घरी साक्षी सापडल्याचे कळवले.
साक्षी त्या दोघींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभी राहिली.
नचिकेत सगळे बंद करून टाळे लावून निघाला.
साक्षी तिथेच उंबरठ्यावर बसलेली होती.
" चल जाऊया ना घरी..."
साक्षी जागची हलली ही नाही. तिच्या चेहऱ्यावरून ती काही तिथुन उठणार नाही. असे भासत होते,
" मी आज इथेच थांबते. तू जा घरी. मी ठीक आहे सांग " साक्षी
आता नचिकेतची पुरती पंचाईत झाली. काय करावे सुचेना. त्याने तेव्हा एक युक्ती केली. तिला पुन्हा त्या ओढयाजवळ घेऊन गेला. दोघे चालत पुन्हा निघाले. त्यानं साक्षीचा हात घट्ट धरला होता. तिकडे पोहोचल्यावर तिथे आता फक्त रात किड्यांचा आवाज आणि खळाळत्या पाण्याचा आवाज होता. आजूबाजूला काळाकुट्ट अंधार होता. वर कुठे तर ढगाआड चंद्र होता. त्याचा धूसर प्रकाश पाण्यावर पडत होता. दोघे ही ओढ्यालगतच्या कट्ट्यावर बसले. सुरवातीला ती काहीच बोलली नाही. नंतर नचिकेतने बसल्या बसल्या तिला कट्ट्यावरून ढकलण्याची नक्कल केली. घाबरून ती नचिकेत खेटून बसली. ते पाहून नचिकेत हसत म्हणला " बोल काय झालं..आता ? घरी का येणार नाही. कोणी काही बोललं का तुला ? "
" नाही ... " म्हणत मुसमुसत ती आणखी तोंड पाडून बसली.
" हे बघ... आता मला सांग नंतर मी तुला त्या ओढ्यावर आणखी एक जादू आहे ती दाखवतो " नचिकेत तिच्याकडे पाहत पाहत तिला समजावत होता.
" माझ्याकडून आज कंपनीत एक अपघात झाला. आणि सरांनी माझी इंटर्नशिप तिथेच थांबवली. माझ्याकडून ते काम हवे तसे झाले नाही. थोडक्यात निभावले नाही तर माझ्यामुळे दुखापत झाली असती. मी चार दिवस पण गेले नाही. आता काय सबमिट करू कॉलेजात ? मी तिथे परत जाणार नाही. उद्याच मी माझ्या घरी जाण्याची तयारी करते. " साक्षी
बोलता बोलता तिच्या डोळ्यातून गंगा जमूना सुरूच होत्या. नचिकेतच्या लक्षात आले. साक्षी आता जास्त काही बोलू शकत नव्हती. त्याने तिला तिथून उठून ओढयालगत असलेल्या चिंचेच्या झाडापाशी नेले. वाटेत खडकाळ रस्ता होता. नचिकेतने तिचा हात पकडला. साक्षीने ही नचिकेतची मूठ घट्ट पकडली, गवताची सळसळ तेव्हा रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात आणखी भयाण वाटू लागली होती. साक्षी डोळे गच्च मिटून एक एक पाऊल पुढे टाकत होती. तिला समोर पाहायला सांगितले. बरेच काजवे तिथे झाडाला, आजूबाजूला चमकताना दिसले. ते चमचमणारे विश्व पाहून साक्षी तिचे दुःख आणि रडणे विसरून त्यात रमली. नचिकेतला ही हायसे झाले. तिच्या चेहऱ्यावर आनंद खुलला होता. आनंदाच्या भरात तिने नचिकेतला मिठी मारली. अंधार बराच झालेला. त्यामुळे तिथून निघायला हवे. हे नचिकेतच्या लक्षात आले. त्याने साक्षीला तसे सांगितले. नचिकेतने पुन्हा तिचा हात धरला. दोघे ही बोलत बोलत प्रयोग शाळेपर्यन्त आले. तिथे गाडी होती. साक्षी गाडीत बसली. गाडीत ती काहीच बोलली नाही. पण तिच्या चेहऱ्यावर तिथे पाहिलेला चमचमता आनंद होता. त्यामुळे तो तसाच रहावा म्हणून नचिकेत ही काही बोलला नाही.
दोघे घरी परत आले. घरी सगळी गोष्ट आधीच माहिती होती. त्यामुळे आराध्याने साक्षीला आल्या आल्याच मिठी मारली. तिला खोलीत घेऊन गेली. तोपर्यन्त नचिकेतने सगळयांना ती राणूकडे असल्याचे सांगितले.
" तिला फार काही विचारू नका." इतकं बोलून तो ही त्याच्या खोलीत गेला. साक्षीचा खोलीत गेल्या गेल्याच डोळा लागला. ती जेवायला ही आली नाही. रात्र बरीच झालेली पण नचिकेतला अजून झोप लागली नाही. आराध्या सारखेच साक्षी सोबत नचिकेतचे चांगले बॉंडिंग झाले असताना अचानक तिच्या बाबतीत आज घडलेली घटना त्याच्या पचनी पडत नव्हती. तिचा स्वभाव पाहता उद्याच ती निघून जाईल. याची ही त्याला चिंता वाटत होती. तिच्यासाठी काही तरी करायला हवे असा विचार सतत त्याच्या डोक्यात फिरू लागला. त्याच विचारात तो झोपी गेला.
क्रमशः
No comments:
Post a Comment