भाग : १०
नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी आपली तयारी करून दोघी निघाल्या. नचिकेतने जाता जाता आठवण करून दिली,
" आज येताय ना द्राक्ष बागेत, मी वाट पाहतोय "
आराध्याचे त्याच्या बोलण्याकडे फारसे लक्ष नव्हते. साक्षीने मात्र लगेच प्रतिसाद दिला.
" हो तर ... येणार ना नचिकेत "
सुमित म्हणाला " चला आधी कंपनीत जाऊ "
सगळे आपापल्या मार्गाला लागले. पाहता पाहता त्यांचे काम सुरू ही झाले. दोन मोठे स्टीलचे कंटेनर समोर आले. सगळे दिलेल्या कृती नुसार सुरू होते. आराध्याने मध्ये काही वेळासाठी तिथून काढता पाय घेतला. जाताना साक्षीला सांगून ठेवले " बाकीचे काम झालेले आहे. आता फक्त इंस्टोलेशन बाकी आहे. ते मी पंधरा वीस मिनिटांनी येऊन करायला सांगते. तू थांबते ना इथे."
साक्षी म्हणाली " हो हो, तू जाऊन ये. मी आहे इथे."
साक्षीने ही तिचे काम पूर्ण केले होते. इंस्टोलेशन राहिलेले. मजूर नंतर आराध्याच्या कामाला लागतील; त्यामुळे आपण आपले काम पूर्ण करूया असा विचार तिच्या मनात आला. ठरल्याप्रमाणे तिने दोघांना हाताशी घेऊन ते काम करायला घेतले. याच दरम्यान अचानक एका जागेवर व्यवस्थित फिक्स न बसल्याने तो फरमेन्टर खाली आला. जागे वरून घसरला. मोठ्याने आवाज झाला. त्यात बरेचसे खर्चिक नुकसान ही झाले. लगेच गर्दी झाली. सगळे कामगार आजूबाजूला येऊन उभे राहिले. साक्षी जवळच उभी होती. यात तिला ही दुखापत होण्याची शक्यता होती, पण तसे काही झाले नाही. दोन्ही मजूर आणि साक्षी थोडक्यात बचावले.
मोठा आवाज झाल्याने मात्र तांत्रिक प्रमुख साठ्ये सर तिथे आले. चर्चा करू लागले. त्यांनी जागेची शहानिशा केली. कोणाला काही दुखापत झाली नाही याची खात्री केली. सगळे झाल्या नंतर मात्र तांत्रिक प्रमुखांनी साक्षीला बोलवून घेतले आणि तिला झाल्या प्रकारासाठी सुनावले. स्वभावाने तापट असल्याने त्यांनी तिचे काम तिथेच थांबवण्याचे जाहीर केले. हताश झालेली साक्षी काहीच उत्तर देऊ शकली नाही. तिथून तडक उठून ती तिच्या जागेवर आली. आपले होते ते सगळे सामान घेऊन ती घराच्या वाटेने निघाली. बाजूला आराध्या कुठेच नजरेस पडली नाही. तिने तिच्या टेबलावर निरोपाची एक चिट्ठी ठेवली. साक्षी कंपनीतून बाहेर पडली.
दुपारचे चार वाजले होते. रणरणत्या उन्हात ती एकटीच चालत येत होती. वळणा वळण्याच्या वाटेवर पुढचे वळण शोधत ती झपाझप पावले टाकत रस्त्याने जात होती. फोन बॅगेत कुठेतरी खाली गेलेला त्याकडे तिचे लक्ष ही नव्हते. पाहता पाहता तिला बागेचा रस्ता लागला. घरी जाऊन काय सांगावे तिला कळेना.
कंपनी मध्ये एकच चर्चा सुरू होती. " मोठा अपघात झाला. "
आराध्याच्या कानावर ही बातमी आली. ती कॅन्टीनमधून निघताना तिथली चार पाच मुलं यावर चर्चा करत होती. ती तशीच घाई घाईत त्या ठिकाणी पोहोचली. तिथे एव्हाना सगळे सुस्थितीत झाले होते. काम सुरू होती. पण साक्षी मात्र कुठे दिसली नाही. तिच्या जागेवर तिचे सामान पण नव्हते, बॅग नव्हती, डबा नव्हता. चिट्ठी मात्र नजरेस पडली. ज्यावर ती घरी जाते इतकेच लिहिलेले होते. आराध्याने तिला संपर्क करण्याचा प्रयन्त केला पण तो ही लागला नाही. घरी कळवले. साक्षी आली की लगेच कळवायला सांगितले. निघण्याची वेळ होण्यासाठी अजून तासभर होता. आराध्याला तिथुन निघता येत नव्हते. तिने सुमितला फोन वर सगळी हकीकत सांगितली. सुमितने घरी ही झाला प्रकार सांगितला. माई, सुमित सतत साक्षीला फोन लावत होते. तिचा फोन मात्र संपर्क कक्षेच्या बाहेर येत होता. शेवटी सुमित गाडी घेऊन कंपनीच्या दिशेने निघाला. रस्त्यात त्याची नजर साक्षीला शोधत होती. विचारत विचारत तो कंपनीच्या गेट पर्यन्त आला. थोड्याच वेळात आराध्या निघणार होती. ती खिडकीपाशी आली तसे तिला खाली सुमित गाडी घेऊन दिसला. तिने त्याला पुन्हा फोन लावला.
" हॅलो...अरे साक्षी आली का घरी... सांग लवकर ? " आराध्याचा आवाज फोनवरुन रडवेला झाला होता.
" आरु... मला रस्त्यात ती कुठेही दिसली नाही. तूला तुझ्या बॉस ना विचारून निघता येतं का पहा. मी थांबतो खाली तो पर्यंत " सुमितने तिला उत्तर दिले.
" हो मी विचारते. ती ठीक असेल ना. इथे नक्की काय झाले ते पण मला कळलं नाही. अचानक कुठे गेली ही मुलगी " आराध्या फोनवर चिंतेच्या स्वरात बोलत होती.
" तू फोन ठेव आता. विचारून ये आणि लवकर, बघू आपण. शोधू तिला " सुमितने सांगत सांगत फोन ठेवला.
आराध्याने झाला प्रकार साठ्येच्या कानावर घातला. साक्षी गेले दोन तास गायब आहे हे ऐकून त्यांच्या ही चेहऱ्यावर आठ्या पडल्या. कपाळाला दरदरून घाम आला. आराध्याला निघण्याची परवानगी दिली. सुमित खालीच थांबला होता. दोघेही घरच्या दिशेने निघाले. सूर्यास्त व्हायची वेळ झाली. पण साक्षी कुठेच दिसली नाही. आराध्या आणि सुमित घरी आले. थोड्याच वेळात नचिकेत ही आला. त्याला अजूनही झालेला प्रकार माहिती नव्हता. काही कामानिमित्त तो दुपार पासून तालुक्याच्या ठिकाणी गेला होता. सगळी हकीकत कळल्यावर त्याने आराध्याला आणि आईला शांत राहायला सांगितले. बाहेर अंधारले होते. त्यात साक्षीला शोधणे आणखी अवघड झाले असते.
थोडा विचार केल्यावर तो तडक तिथून उठला आणि गाडी घेऊन मळ्याच्या दिशेने गेला. तिथे सगळीकडे सामसुम झालेले. रात किड्यांचा तेवढा किर... आवाज येत होता. तिथून पुढे तो ओढ्यापाशी गेला. ओढ्याजवळ ही साक्षी नव्हती. काय करावं सुचत नव्हते. तसाच तो मळ्यात आला. प्रयोग शाळेत जाऊन बसला. पाच दहा मिनिटे तिथेच बसुन राहिला. बाहेरून लहान मुलीचा बोलण्याचा आवाज यायला लागला. नक्की कोण ? पाहण्यासाठी तो बाहेर आला तर तिथे सोनल होती. गुरांच्या बाजूला ती हसत इकडून तिकडे पळत होती.
क्रमशः
No comments:
Post a Comment