भाग : ९
संध्याकाळचा ओढ्यावरचा सूर्यास्त पाहून सगळी मंडळी परत आपल्या घरट्याकडे आली. रात्रीची भोजन पंगत उरकून साक्षी आणि आराध्या गप्पा मारत खिडकीशी बसलेल्या होत्या. तिथे तेवढ्यात सुमित आला. सोबत त्याने राघूचा पिंजरा आणलेला खिडकीत ठेवला. एका बाजूला त्यांचे चर्चा सत्र रंगले. दुसरीकडे राघूची मध्ये मध्ये लुडबुड सुरूच होती. साक्षी आराध्याला सांगत होती.
" आरु, नचिकेत किती चांगली काळजी घेतो बागेची. फक्त बागच नाही तर तिथे काम करणाऱ्या प्रत्येकाचा किती विचार करतो."
" बघ ना... मी काल काही न सांगताच त्याला कळले. मला ती जागा खूप आवडलेली. आणि आधीच येताना त्याने सुमितला सांगून ठेवले. मला त्याचा स्वभाव ओढ्यावरच्या त्या रंगीत तरंगावर पडलेल्या सूर्याच्या प्रतिबिंबासारखा वाटतो. सूर्य जितका प्रखर असतो त्याच्या उलट पाण्यावर त्याचे पडलेले प्रतिबिंब किती शांत आणि तेजस्वी वाटते. राणू, सोनल, भानू किती जणांसाठी तो तसा तेजस्वी सूर्य बनून आहे ना. जबाबदार आणि काटेकोर पण तरीही शांत उत्साही. "
तेवढ्यात बाजूच्या पिंजऱ्यातून आवाज " तू.. तू..."
सुमित हसला आणि म्हणाला " अरे राघू ऐकतोय सगळं "
" हो... हो साक्षी किती छान बोलायला लागली आहे इथे येऊन ... वा या गावाने जादूची छडी फिरवली वाटते तुझ्यावर. की दादाने..."
आराध्या पुढे बोलू लागली, " अग तू म्हणतेस ते अगदी खरंय, दादाकडे बरीच स्किल्स आहेत, पण तो इथेच सगळी वापरतो. वावरातून... द्राक्षाच्या बागेतून... गोडीवलीच्या बाहेर जातच नाही. हो ना... सुमित " राघू ची परत साद आली " तू तू तू..."
सुमित म्हणाला " होय ना यार...राघूला पण पटलं हे त्याच सगळं विश्व त्याने इथे उभं केलं. "
"मी तर किती वेळा सांगतो त्याला बाहेर पडून बघ, पण... आता कोणीतरी बाहेरच्यांनी सांगितले तरच. घरच्यांनी कितीदा सांगितले. साक्षी तू सांग ना त्याला. बघू तुझं ऐकतो का ? "
साक्षी हसली आणि म्हणाली " मी ... "
पुन्हा राघूचा आवाज " तू तू तू तू "
" सुमित त्याला शांत कर रे... " आराध्या हसत हसत म्हणाली.
साक्षी पुढे म्हणाली " हो ना ... आरु तू मला म्हणलेली ना ... ते पटले आता... राघू ची जादूच आहे ही ...हहह, चला झोपायला जाऊया आता, उद्या आपल्याला आणखी जबाबदारीचे काम मिळणार आहे, साठ्ये सर जाताना म्हणले मला "
सुमितने राघूचा पिंजरा हातात घेतला आणि तिघेही आपापल्या खोलीत गेले. सुमित राघूला घेऊन त्याच्या खोलीत गेला. साक्षीच्या आठवणीत पाण्यावरचे पडलेले सूर्याचे प्रतिबिंब कायमचे कोरले गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळची न्याहरी करून साक्षी, आराध्या घराबाहेर पडल्या. निघतानाचा उत्साह दिवसा अखेर मावळलेला असेल यांची त्या दोघींना ही पुसटशी कल्पना नव्हती. सुमित दोघींना निश्चित स्थळी सोडून आला. आज दोघींचा परीक्षेचा दिवस होता. वायनरीचे फरमेन्टर वॉशिंग आणि स्टरलायझेशनसाठी घेतले होते. दोघींना वेगवेगळ्या फरमेंटरची जबाबदारी दिलेली होती. दोघींनी आपले काम चोख पार पाडले. तांत्रिक प्रमुख साठ्ये आज ही दोघींच्या कामावर खुश होते; त्यामुळे त्यांची जबाबदारी पुन्हा वाढवण्यात आली. दुसऱ्या दिवशी हजार लिटरचे दोन फरमेंटर त्यांच्या देखरेखीखाली स्वच्छ करायचे होते. नंतर लगेचच त्यात पुढचे काम सुरू होणार होते. आजच्या कामाचे कौतुक आणि त्याचा आनंद घेऊन दोघी घरी आल्या. रात्री पुन्हा गप्पांचा फड रंगला. सुमित पुन्हा नेहमी प्रमाणे राघूला घेऊन खिडकीशी आला. यावेळी नचिकेत पण त्यांच्या सोबत होता. आराध्याचा चेहरा मात्र चिंतेत भासला. त्यावर तिने उद्याच्या कामाचे कारण सांगितले. नचिकेत आणि सुमित खट्याळ हसून तिच्याकडे पाहत होते.
नचिकेत म्हणला " बापरे इतकेच ना ... आज व्यवस्थित केलेत ना. उद्या पण तसेच काळजीपूर्वक काम करा. त्यात चेहरा पडण्याची गरज कशाला ... वेडा बाई "
सुमितने पुढे त्याची रीघ ओढली
" हर प्रॉब्लेम का इलाज... राघू ...बाकी उद्याच उद्या बघू " अशा वेळी पिंजऱ्यातल्या पोपटाने तोंड उघडायला आणि आराध्याचा पारा चढायला एकच गाठ पडली. सुमित त्याला घेऊन तिथुन लगेच निघाला.
साक्षीने आराध्याला समजावले " आरु, चल उद्याच उद्या पाहू. तू पण जास्त काळजी करू नको. झोपुया आता. तू आणि मी दोघी थकलोय "
नचिकेत म्हणला " हो... हो जाऊन झोपा आता ... उद्या पुन्हा या आपल्या बागेत. मस्त मजा करूयात. रेणू आणि भानूला पण सांगून ठेवतो. " सगळे आपापल्या खोलीत झोपायला गेले. उद्याची स्वप्न रंगवत झोप ही लगेच लागली. साक्षीचा कंपनीतला हा प्रवास लवकरच संपण्याच्या मार्गावर होता याची तिला त्या रात्री पुसटशी कल्पना ही नव्हती.
क्रमशः