भाग : ७
दुसऱ्या दिवशी नचिकेत लवकर उठून न्याहरीसाठी टेबलावर येऊन बसला. तितक्यात आराध्या आणि साक्षी खाली आले. आण्णा आराम खुर्चीत पेपर वाचत बसले होते. माईने नचिकेतला हाक मारली.
" इथे आलास का रे दोन मिनिटं ... तो वरच्या फळीवरचा डबा काढून दे ... त्यात कुरडया, पापड ठेवलेत. "
" मी निघालोय ग आता ... नंतर सुमितला सांग ...झोपला आहे बघ भावी जवान " नचिकेत न्याहारी करत होता. आराध्या आणि साक्षी ही समोर येऊन बसल्या.
आण्णा खुर्चीत बसल्या बसल्या पेपर वाचत बोलले,
" आले का धाकटे चिरंजीव "
" हो आले ना ... मध्यरात्री गोडीवलीचा सूर्य उगवला इतकंच. " नचिकेत
माई नचिकेतकडे पाहत म्हणाली " तरीच रात्री कुजबुज ऐकू आली. मी येणारच होते. तुझा आवाज तेवढयात ऐकू आला "
" साक्षी आहे ना साक्षीदार ! " नचिकेत तिच्याकडे पाहत म्हणाला.
" हो ना साक्षी ... तिनेच दार उघडलं " साक्षीने फक्त होकारार्थी मान हलवली.
आराध्याला रात्रीचा किस्सा पुरेसा कळला नव्हता पण नचिकेतकडे बघून नक्की काय गौडबंगाल आहे हे तिला ऐकायचे होते.
इतक्यात सुमित डोळे चोळत बाहेर सगळे बसले तिथे आला आणि बोलू लागला
" काय फॅमिली ... कशावर चर्चा रंगली आहे. थांबा जरा आलो मी पण "
आराध्या मिश्किल हसत म्हणाली ," येतोस ये ना ... तुझ्या येण्यावरूनच आहे चर्चा. "
" काय "
" हाच असणार मग ... दादा तू सांगितले का रे "
सुमित थोडा कावरा बावरा झाला.
" वेट... फॅमिली वेट ... मी येतोय "
सुमित फ्रेश होऊन बरोबर सगळ्यांसमोर येऊन बसला. त्याला तशी सवयच होती. आपले नाव कायम चर्चेत रहावे असं त्याला सारखे वाटत.
नचिकेत म्हणला " या या बसा जवान; आम्ही निघतो आता कामगिरीला ..तुमचं चालू द्या "
आराध्या म्हणाली " अरे थांब ना ...आम्ही पण निघतोय. सोबतच निघू "
" अग मैना ... तो भीमा वाट बघतोय माझी ... त्याला कामं देऊन ठेवली आहेत. तुम्ही या निवांत. मी निघतो आता " नचिकेत
" पण साक्षीला बागेतून जायचे होते ना रे. आमच्या जाण्याच्या वाटेतच लागते आपली द्राक्षांची बाग. "
" हो पण आता नको ... तुम्ही परत घरी येताना या बागेत ... तेव्हा ओढ्यावरचा सूर्यास्त पण बघता येईल.. हो ना साक्षी "
साक्षी आता पर्यंत फक्त मान हलवूनच उत्तर देत होती. पण आता तिच्या तोंडून शब्द बाहेर येऊ लागले.
" आपण येऊ येताना तेव्हा भाऊंच्या त्या मैत्रिणी पण हव्या तिथे " सगळे हसायला लागले. नचिकेत निघाला. मागोमाग साक्षी आणि आराध्या पण निघाले. आई स्वयंपाक घरातून मोठ्याने म्हणू लागली " नीट जा ग पोरींनो... सुम्या आत ये जरा ... डबा काढून दे मला " सुमितने उत्तर दिले " आलो आलो ... माँ साहेब ! "
क्रमशः
No comments:
Post a Comment