Saturday, 8 February 2025

७. त्या मध्यरात्री

भाग : ६

      रात्रीचे तीन साडे तीन वाजले होते. घराचे दार वाजले. सगळे गाढ झोपलेले असताना " राघू ... राघू "  असा आवाज येऊ लागला. तो आवाज ऐकून साक्षीला जाग आली. डोक्यात खरं तर आल्या पासूनच्या चर्चाची उजळणी सुरूच होती. त्यात झोपेत आपल्यालाच पिंजऱ्यातल्या राघूने बोलवले असं वाटून ती उठून राघूजवळ आली. यावेळी राघू ही झोपेतच दिसला. आपल्याला स्वप्न वगैरे पडले असावे असा अंदाज बांधून ती तिथुन निघाली. परत आपल्या खोलीत जाणार तोच परत आवाज आला. आता मात्र हा आवाज बाहेरुनच येत आहे हे तिने पक्के जाणले. आराध्याला उठवून तिला त्याची कल्पना दिली पण झोपेच्या अधीन झालेली आराध्या " असुदे... ग ... असुदे..वाजू दे "  म्हणत झोपेतच बरळत होती. साक्षीला काही सुचले नाही. अजून कोणी उठले कसे नाही याची वाट बघत शेवटी ती उठून पुन्हा बाहेर आली. एकदा खिडकीतून डोकावून पाहिले तर खाली एक अठरा, एकोणीस वर्षाचा मुलगा तिला दिसला. कोण भलता असेल या भीतीने तिने खिडकीचे ही दार लावून घेतले. 

     तेव्हा अचानक राघूचा ही आवाज येऊ लागला. हा आवाज राघूच्या ओळखीचा कसा ? तिच्या मनात प्रश्न निर्माण झाले. राघूचा आवाज ऐकुन कोणी तरी उठेल अशी आशा होती. पण तसे काही झाले नाही. 
साक्षीने आता बाहेरच्या व्यक्तीला आत येण्यासाठी काही तरी करणे अपेक्षित होते आणि तसेच केले. ती भराभर खाली गेली. ती खाली येण्याच्या आवाजाने मात्र तेव्हा नचिकेत जागा झाला. तो बाहेर येणार तोच साक्षीने दार उघडले होते. साक्षी कोण ते विचारणार इतक्यात दरवाजात मधोमध उभा असलेला तो मोठ्याने ओरडू लागला " कोण तू ... कोण ... चोर ... चोर " इतक्यात नचिकेत बाहेर आला. साक्षीने अंगावर लपेटून घेतलेली शाल पाहून गैरसमज झाला. तोच दूर करायला नचिकेत त्याच वेळी तिथे देवासारखा प्रकट झाला. साक्षीला हायसे वाटले.

" अरे ... वेड्या तुझी ही वेळ आहे का येणाची..तिला चोर म्हणतो... आत ये आधी "  - नचिकेत

" हो ... हो, आलो ना दादा ... ही कोण आहे... आपल्या घरी काय करते " - सुमित 

" थांब जरा... सगळेच उठतील आता ... तुझ्या स्वागताला " - नचिकेत

" अग साक्षी ... तू घाबरू नको, हा सुमित ... माझा आणि आराध्याचा धाकटा भाऊ , तू हवं तर जा वर झोपायला...यांच्याकडे मी बघतो " - नचिकेत

साक्षी सगळ पाहून क्षणभर गांगरून गेली. काय बोलावे ते ही सुचत नव्हते आणि थोडी बिथरलेल्या चेहऱ्याने ती आपल्या खोलीच्या दिशेने गेली. 

" नचिकेत दादा... बरं झालं कोणी उठले नाही ... आज मेलोच असतो नाही तर ....ती कोण होती महामाया दारासमोर आली अचानक  " - सुमित

" तुला उद्या  सांगतो बर का ... झोपायला ये आवरून, पुढच्या वेळी जाशील ना ... ट्रेंनिगला... तर परत येण्याची  खबर बात देत जा, तुझं ओरडणं बघून ती म्हणेल का तरी मिलिटरीच्या ट्रेंनिग साठी गेलेला " - नचिकेत

नचिकेत हसत हसतच पलंगावर आडवा झाला. 
सुमित सगळं आवरून अंथरूण घालून झोपतच म्हणला, 

" अरे हो दादा, मला काय स्वप्न पडलेलं, असं काही होणार आहे...आता तरी सांग कोण होती ती "

" ती आरुची मैत्रीण आहे. तिच्या सोबत आली आहे. काही दिवस इथेच आहे ती आणि ... त्यांचं काम सुरू आहे त्या पी व्ही वायनरीमध्ये. तू उगाच खोडया काढू नको तिच्या ... बिचारी आता च किती बिथरलेली वाटली. उद्याच परत जाईल ती नाही तर " - नचिकेत

" बरं ठीक आहे... ती बिथरली काय आणि आम्ही दरवाजात बेशुद्ध झालो असतो त्याच काही नाही ... "   - सुमित

" बर ठीक झोप आता शांत आणि उद्या कसे स्वागत झालं ते सांग, नाही सांगितलं तर मी आहेच सांगायला"
नचिकेत सुमितकडे पाहून हसला. सुमित घोटभर पाणी पिऊन लगेच झोपला. नचिकेतला त्याच्याकडे पाहत पाहत झोप लागली. 

क्रमशः

No comments:

Post a Comment

३०. कृषी मेळावा

भाग : २८      मुंबईत साक्षी आपले पुढचे शिक्षण पूर्ण करत होती. ऍग्री प्रोडक्ट मार्केटिंगचा एम बी ए कोर्स ती तिच्या शहरातून करत होती. डिग्रीच्...