Friday, 31 January 2025

६. कातर वेळ

भाग : ५

साक्षी भानावर आली. ती खिडकीतच होती. आराध्याकडे गेली. 
" काय झालं ... कुठे तू आराध्या... आरु ? " 
" अग इथे बाहेर ... हा बघ ... राघू " 
" कोण हा ...पोपट " 
" तू तू तू तू ... " पिंजऱ्यातला पोपट बोलत होता. 
साक्षी ते ऐकून चाटच पडली.
" आय्या ... हा बोलला काही तरी." 
" हो ... त्याला शिकवले सुमितने ... भारी ना " 
" हो ... मस्त याला अजुन काय काय शिकवलं आहे " 
" त्याला फक्त इतकंच बोलता येतं ... पण त्याला हे असं शिकवुन सुमितने खरं तर चूक च केली " 
" म्हणजे ? " 
" अग... तो आधी फक्त पोपटासारखे आमचे मनोरंजन करत होता. आता त्याला ते शिकवले ना ... ते नेहमी चुकीच्या वेळी बोलून आणखी समोरच्याला तोंडावर पाडतो. मला कधी कधी त्याच्या समोर काही बोलायचं तर भीती वाटते ... सुमित सगळं सांगत असतो याला. राघू ..." 
" तू तू तू तू ..." पिंजऱ्यातून परत आवाज आला 
" बघ ... कळेल तुला हळूहळू " आराध्या साक्षीला सांगत होती.

साक्षी त्या पिंजऱ्यात बोट घालत बोलत होती. पिंजरा तिच्या समोर गोल गोल फिरत होता. पिंजरा तोच होता पण वेगवेगळ्या बाजू सतत समोर येत होत्या. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत होत असते ना तसे काहीसे 
" आराध्या,  इंटरेस्टिंग आहे ग इथे सगळं... आधी ते भाऊ मग चिंगी, सुमी, सखू आणि आता हा राघू " 
" तू तू तू ..." परत पिंजऱ्यातून आवाज आला.

दोघी हसत हसतच तिथून बाहेर आल्या. आपल्या खोलीत सामान आवरू लागल्या. तेवढ्यात माईने खाली जेवणासाठी बोलवले. साग्रसंगीत सगळे भरपेट जेवण झाले. जेवणाच्या ताटात भरलेल्या हर एक चवी आणि स्वभाव इथे प्रत्येकात साक्षी पाहत होती. अनुभवत होती. जेवण झाली. रात्रीचा काळोख वाढला तसे आराम करायला दोघी त्यांच्या खोलीत गेल्या. खोलीत पडल्या पडल्या लगेच डोळा लागला. खोलीत पूर्ण अंधार झालेला. पंखा बंदच होता तरी जमिनीत आणि भिंतीत थंडावा खूप होता. गारवा आणि उबदार थंडी रोमारोमात भिनत गेले. शहरातली वेगवान दमट वारे इथे बिलकुल जाणवत नव्हते. वातावरणातील हा विरुद्ध बदल पुढच्या प्रत्येक अनुभवात तितकाच प्रकर्षाने जाणवत होता. लवकरच सुरू होणाऱ्या कंपनीच्या ट्रेनिंगचा स्वप्नात मागोवा घेत दोघीही गाढ झोपी गेल्या. 

पहाट झाली. थोड्या वेळाने नचिकेत तिथे आला. खटकन काही तरी पडल्याचा आवाज आला. आराध्या इतके दिवस नव्हती. त्यामुळे काही शेतीची अवजारे तिच्या खोलीत ठेवलेली काढून घ्यायला तो तिथे आला होता. त्यातलंच काही हातून निसटून पडलं आणि तिथे खणखणीत आवाज झाला. दोघी मिनिटाच्या आत उठून बसल्या. नचिकेतला मेल्याहून मेल्यासारखं झालं.
" सॉरी सॉरी ... मला इथून सामान घ्यायचं. घेतो आणि जातो. " 
आराध्या नचिकेतवर खेकसली.
" काय रे दादा... इथे का ठेवलं ते सगळं... " 
" म्हातारे उठ... चार वाजले... मळ्यात ये काम आहे तिथे तुझ्यासाठी " 
" आता उठले मी ... तू च जा " 
आराध्या डोळे चोळत चोळत उठून बसली. साक्षी पण उठलीच होती. तिला मात्र सगळी गंम्मत पहिल्याच दिवशी घ्यायची होती. 
" जाऊ या ना ... आरु, चल ना ... आराम झाला, चल लवकर उठ. " 
" अग हो... उद्या जाऊ ना ... तू थकली नाही का ? " 
" नाही ... चल तू पण, मजा येईल. " 
" बरं ... बरं थांब माईला सांगू, मग जाऊ. थांब रे आम्ही पण येतोय " आराध्या जांभया देत म्हणाली.
" या लवकर खाली. मी वाट बघतोय " नचिकेत खाली निघून गेला.

थोड्याच वेळात दोघी खाली आल्या. पुढे नचिकेत आणि मागे दोघी असे गाडी मधून शेतात आले. नचिकेत संशोधक वृत्तीचा होता. त्याच्या द्राक्षबागेत तो भरगोस उत्पन्न घेत. सोबत त्यावर प्रयोग ही करत होता. त्यासाठी त्याने छोटेखानी प्रयोगशाळा तिथेच उभी केली होती. छोट्या मोठया चाचण्या तो स्वतः तिथेच करत. त्यासाठी लागणारी आवश्यक सामग्री त्याने शहरातून आणून ठेवली होती. इतकेच नाही तर आजूबाजूच्या बागायत दारांना ही त्यात तो परीक्षण करून देत असे. हे सगळे त्याने साक्षी आणि आराध्याला दाखवले. बराच वेळ तिथेच बाहेर कट्ट्यावर ते तिघे बसलेले. सूर्यास्त व्हायची वेळ झाली, तोपर्यंत तिथे भानू आला. त्याने जशी बोलायला सुरवात केली. मनोरंजन आणि चिकित्सा दोन्ही नावेवर डुबक्या घेत तासभर सगळे मजा मस्करी करत बसले. अंधार होत होता. शेती, मळे पार करत मधून वाहत जाणारा ओढा आणि सूर्यास्त हे परफेक्ट कॉम्बिनेशन तेव्हा पाहण्यासाठी नचिकेतने सगळ्यांना ओढ्यापाशी नेले. ओढ्याच्या पाण्यावर पसरलेले सूर्यास्तानंतर चे रंगीत आकाशाचे प्रतिबिंब न्याहाळत ओढ्या शेजारी सगळे पहुडले होते. लाल केशरी निळ्या रंगाच्या छटा पाण्यावर तरंगताना मनाचे सतत बदलणारे तरंग समोर येत होते. त्यावर आपलेच प्रतिबिंब वाकून पाहताना बाकीच्या दिवसांपेक्षा ती कातर वेळ काही वेगळीच भासत होती.  साक्षीचा तिथून पाय निघत नव्हता. आराध्या आणि नचिकेत निघण्यास सांगत होते. भानू मात्र त्याचा पण आनंद घेत होता. शेवटी गाडी समोरुन हलत नाही हे बघून साक्षी तिथून हलली. उठली. सगळे घरी आले. 

रात्रीच्या जेवणाच्या वेळी बोलायला विषय बरेच होते. पण ओढ्यावरच्या साक्षीच्या हट्टाने बाजी मारली. जेवण होई पर्यंत प्रत्येकाने त्याचा आस्वाद घेतला. कदाचित तिच्यातली खरी खुरी सायरन तेव्हा सगळ्यांसमोर आली होती. 

सगळ्यांसमोर माईंनी शेवटी साक्षीची बाजू सावरत म्हणले 
" उद्या साक्षी शेताच्या वाटेवरूनच ये .. कामावरून येशील तर... नाराज होऊ नको बेटा, आरु ... दोघी तिथूनच या " 
माईने आराध्याकडे डोळे वटारून पाहिले. ते पाहून नचिकेत त्यावर म्हणला 
" मी पण असेन त्या वेळी बागेत ... या तुम्ही, पुन्हा ओढ्यावर जाऊ ".

साक्षीला हसावं की रडावं कळत नव्हते. नचिकेत मात्र हसत होता. दोघींचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. जेवण झाले. आपापल्या खोलीत सगळे गेले. दुसऱ्या दिवशी कंपनीत जायचे होते. त्याची तयारी करायची होती. उत्सुकता होती. पण थकवा ही आलेला. खोलीत आल्या आल्याच थोडी साफ सफाई करून आराध्या आणि साक्षी झोपून गेल्या. साक्षीच्या डोळ्यासमोर अजून ही ओढ्यावरची ती संध्याकाळ, तेव्हाची कातर वेळ आणि पाण्यावर उठणारे तरंग दिसत होते. 

क्रमशः 

2 comments:

३०. कृषी मेळावा

भाग : २८      मुंबईत साक्षी आपले पुढचे शिक्षण पूर्ण करत होती. ऍग्री प्रोडक्ट मार्केटिंगचा एम बी ए कोर्स ती तिच्या शहरातून करत होती. डिग्रीच्...