भाग : ४
" दादा ... " आराध्या धावत पुढे आली आणि नचिकेतला मिठी मारली. मध्यम बांध्याचा, सावळा रंग, बारीक मिशी, उंच, निळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला नचिकेत, आराध्याचा मोठा भाऊ. नचिकेत बाहेर आला.
" अग ... हे काय काय आणलेस सोबत , तुझ्या सोबत मोठं सरप्राईज आहे मागे. "
नचिकेत हसत हसतच आत आला. आराध्याही त्याच्यासोबत आत आली. बऱ्याच दिवसांचा झालेला तिचा आणि झोपाळ्याचा विरह संपणार होता. आराध्या येऊन तडक मोठ्या झोपाळ्यावर जाऊन बसली. बाहेरचा सगळा गोंधळ ऐकून आराध्याची आई म्हणजे सगळे तिला प्रेमाने " माई " म्हणत. माई बाहेर आली. माई म्हणजे सगळ्यांना बांधून ठेवणारी जादूची दोरीच. साडी आणि ठळक कुंकू, एका ठिकाणी खोचलेला पदर, मोठा आंबाडा आणि पारंपरिक वेषातली. सगळ्यांची आई. आण्णा आराम खुर्चीत बसलेले उठून उभे राहिले. धीर गंभीर स्वभावाचे अण्णा मनाने मात्र प्रेमळ असणार. असा अंदाज त्यांच्या हलचालीतून येत होता. प्रत्येकाबद्दल थोडे फार माहिती असताना ही साक्षीला सारेच अजून ही अनोळखी होते. त्यामुळे ती शांत होती. जो तिचा खर तर स्वभाव नव्हता. ती आली आणि शेजारच्या बसायच्या सेठी वर स्वतः ला थोडं सावरून बसली.
भानूने नचिकेतला इशारा करून म्हणले " बघितलं का दादा... आपल्याकडे आणखी एक पाव्हनी आली हाय ! बसली बघा तिथं "
आराध्या आपल्या घरी येण्याच्या आनंदात साक्षीला पार विसरून गेली होती. " दादा ... ही माझी कॉलेजची मैत्रीण बरं ... साक्षी उर्फ सायरन !"
" आम्ही एकाच क्लास मध्ये आहोत आणि आता इथे पण एकत्रच काम करतोय. साक्षी आपल्या सोबतच राहणार दादा " आराध्याने साक्षीची ओळख करून दिली.
" साक्षी ये ना इथे झोपाळ्यावर ये बसायला. सामान राहू दे तिथे... नंतर नेऊ आत " आराध्या साक्षीला तिथल्या वातावरणाशी परिचित करून देत होती.
साक्षी जागेवरून उठून समोर आली. समोर नचिकेत होता. माई, अण्णा होते. नचिकेतने तिला पाहिले " हॅलो मी नचिकेत ... आराध्याचा मोठा भाऊ. तुला आता पर्यंत माहिती झालं असेल आरुने सांगितले असेल ."
" हो दादा... मी तिला सगळयांबद्दल सांगितले. खरं तर तिचीच इच्छा होती आपल्या घरी सगळ्यांची भेट घ्यायची "
" वा ... साक्षी भेट सगळयांना मी आलोच " नचिकेत तिथून बाहेर भानूकडे आला. काही शेतीच्या कामाबद्दल तो भानुशी बोलू लागला.
" हो... मला आराध्याने तुम्हा सगळ्यांबद्दल सांगितले. मी साक्षी ... हॅलो माई - अण्णा " साक्षीने उठून अण्णांचे आणि माईचे आशिर्वाद घेतले.
" आरु... शिक तिच्याकडून ... तू आली आणि गेली लगेच झोपाळ्यावर " नचिकेत आत येत येत म्हणाला.
माई साक्षीला पाहत तिच्या चेहऱ्यावरुन हात फिरवत म्हणाली, " गुणी बाळ... तुम्ही दोघी आता तुमचं सामान ठेवून या. भुका लागल्या असतील. मी वाढते. जेवून घ्या आधी " माई स्वयंपाक घरात गेली. अण्णा त्याच्या आराम खुर्चीत पुन्हा बसले.
आराध्या साक्षीला घेऊन तिच्या खोलीत गेली. हे सगळे नाट्य संपते तोवर भानू तिथून निघतच होता. नचिकेतने त्याला थांबवले.
" भानू कुठे निघालास थांब ... तुझ्या मैत्रिणी वाट बघतात बाहेर, माहिती आहे. त्यांना जा घेऊन, त्या आधी माझं एक काम कर. "
"आपल्या मागच्या बियाणांच्या किती पिशव्या शिल्लक आहेत ? हे आज जाशील मळ्यात तर मोजून ठेव "
" व्हय दादा बघतो की, या वेळी नवीन शोध लागलाच पाहिजे. आपली ताई पण आली आता शहरातून शिकून. काय दादा...बरोबर बोलतोय ना मी "
" हो ... हो ते पुढे बघू, आता सध्या तुला त्या गोपिका बोलवतात ना... त्यांना घेऊन जा. " नचिकेत बाहेरच उभे राहून म्हणाला.
भानू मेंढराना घेऊन निघाला. उंच, मोठ्या दंडाचा, अंगावर एक राखाडी लांब सदरा आणि पांढरा पायजमा. गळ्याभोवती एक लांब शाल. पिळदार शरीर असलेला पैलवान अशी भानूची एक प्रतिमा होती. तो पुढे आणि मागे तीस ते चाळीस शेळ्या. राजा प्रजेला दिशा दाखवत न्यावा तसा हा प्रसंग. साक्षी माडी वरल्या खोलीतुन हे दृश्य पाहत होती. तिला त्यात फारच गंमत वाटतं होती. नचिकेत मागे दारातच होता. नचिकेतची नजर वळताना वर गेली. वरून हसताना साक्षी दिसली. काही तरी नवीनच बघते असं काही तरी ती त्या जाणाऱ्या कळपाला बघत होती. नचिकेत तिच्याकडे बघून हसत हसत आत आला. साक्षीला आराध्याचा तितक्यात आतून आवाज आला " साक्षी ... साक्षी इकडे ये लवकर ... "
क्रमशः
No comments:
Post a Comment