Saturday, 15 February 2025

९. रेणू

भाग : ८

     कामाचा पहिला दिवस दोघींचा ही उत्साहात सुरू झाला. पहिल्याच दिवशी तांत्रिक विभागाचे प्रमुख साठ्ये सरांनी त्यांना काम समजावले. हवे ते मार्गदर्शन केले. दिवसा अखेर दोघींच्या ही कामावर ते खुश होते. कामात दिवस गेला, निघायची वेळ झाली. कामाच्या  नादात आराध्या पुरते विसरून गेलेली पुन्हा घरी जायची वेळ झाली आहे. साक्षी आली आणि तिने विचारले 
" अग सुमित आलाय बाहेर बघितलं का ?  निघाले सगळे चल ... चल आता घरी " 
आराध्याने बाहेर पाहिले तर खरंच सुमित गाडीला टेकून उभा होता. 
" होय ग " 
" आलो आलो आम्ही " आराध्या खिडकीतूनच त्याला मोठ्या आवाजात म्हणाली. 
" चल तू हो पुढे, मी हे सगळं ठेवून आले. साठ्ये सरांना सांगून निघुया. " 
टेबलावरचा फाईल्सचा पसारा एकत्र करत आराध्या साक्षीला म्हणली तशी साक्षी तिथून निघाली. 

साक्षी साठ्ये सरांना भेटायला त्यांच्या केबिन मध्ये गेली. साठ्ये सरांनी तिच्या कामाविषयी कौतुक केले पण आता जबाबदारीचे काम देणार अशी कल्पना ही दिली. साक्षी काहीश्या द्वंद्व स्थितीत तिथून बाहेर पडली. साक्षीला दुरून येताना पाहून सुमित म्हणाला.
" आलात का सायंटिस्ट ... दुसऱ्या सायंटिस्ट राहिल्या का मागे ?"
" हो ... ती येते. आपण बागेच्या रस्त्यानेच जातो ना आता ... मला परत जायचेच आहे तिथे. " साक्षी म्हणाली.
" हो ... हो तिथूनच जाऊ ... साक्षी ताई डोन्ट व्हरी, मला सांगितले बरं दादाने " 
" तुला खुपचं आवडलेली दिसते आमची द्राक्षांची बाग ... वेल... आहे पण ती तशी भारी ... दादाने खूप मेहनतीने सांभाळली " सुमित म्हणाला.
" होय, खरंच आवडली ... तिथल्या निमुळत्या वाटेने जाताना हरवण्याची भीती वाटली नाही. उलट वर लागलेले हिरवे आच्छादन डोक्यावर सुरक्षित च वाटले. आणि त्यात ठराविक अंतरावर ठेवलेले पाण्याचे साठे आणि तयार केलेली पक्षाची आर्टिफिशयल घरटी खरंच खूप चांगली कल्पना आहे. नंतर त्या ओढ्यावर थांबून सन सेट मी कधीच विसरणार नाही. " 
" इथे आहे तो पर्यंत मी तर नक्कीच तिथे जाण्यासाठी कायम तयार असेन " साक्षी बोलत होती आणि तिच्या पेक्षा तिचा चेहरा अधिक बोलत होता. 
" आली पहा दुसरी सायंटिस्ट ... निघुया चला नाहीतर आपला सन सेट चुकायचा " सुमित आराध्याला पाहतच म्हणत होता. 
" आले आले ...थांबा " आराध्या लगेच गाडीत बसली आणि तिघे बागेच्या नागमोडी रस्त्याने निघाले. 

बागेत नचिकेत त्याच्या प्रयोगशाळेत काही तरी काम करत होता. बाहेर एक बाई चारा घालत होती. गाई गुरांच्या अधून मधून एक चार - पाच वर्षांची मुलगी बागडत होती. निवांत बसलेल्या गायीच्या कानाशी, तिच्या गळ्यातल्या दोरखंडाशी खेळत बसली होती. सुमितने हाक मारली.
" रेणुका माता ...दादा कुठे आहे... आणि भाऊ पण दिसत नाही. " 
गाडी शेजारी लावून सुमित, आराध्या आणि साक्षी गुरांच्या शेडजवळ आले. 
आराध्याने त्या लहान मुलीला जवळ घेत तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत म्हणले 
" साक्षी ... ही रेणू ताई... भाऊ सोबत आपल्या मळ्याच्या कामात दादाला मदत करते. आणि ही तिची झाशीची राणी ... सोनल " 
रेणू तेव्हा हातातला चारा, गवत बाजूला टाकून पदराला हात पुसत समोर आली.
" हॅलो ... झाशीची राणी ... मी साक्षी, आराध्याची मैत्रीण ... तुझी ही लांब वेणी मस्त आहे ग ... मला शिकवशील " 
" मी न्हाई ... आईने घातली ... तुझ्या डोक्यावर तर किती छोटे केस आहेत ... ती मोठी वेनी कशी काय येनार ग ताई... आई बघ की ताई काय बोलते " सोनल धावत रेणू कडे जाऊन बिलगली. 
" ताई ... ती अजून छोटी हाय तिला कळना कोण आले ते ... जास्ती मनावर घेऊ नका जी " रेणू तिला कवटाळत म्हणाली.
साक्षी म्हणाली " रेणू ताई ... ही खरंच झाशीच्या राणी सारखी आहे ... बघा तरी उत्तर देताना पण डोळ्यात डोळे घालून बोलते "  
बाहेरचे संभाषण ऐकून नचिकेत तिथे आला. 
" कधी आलात ? या ... या ... सन सेट बघून जाऊ घरी. रेणू, गुरांचे चारा पाणी झालं असेल तर तू निघाली तरी चालेल. आम्ही पण तिथून घरीच जाऊ. इथं सगळं मी बंद करूनच निघतो आणि हो तुमच्या घरची ती भिंत एकदा दुरुस्त करून घे ... वस्ती अगदी उतारावर मौक्याच्या ठिकाणी आहे. भानू सांगत होता. दोन दिवसांपूर्वी लोक आलेले बघायला. " नचिकेत
" व्हय जी ... करायचं राहिले ते... तवा काही बी बोललो नाही त्यांच्या म्होर पर आता पुढच्या आठवड्यात करून घेतो. " 
" हो ... मी येऊन बघेन आता एक दिवस. त्याशिवाय ते दुरुस्त व्हायचे नाही. " नचिकेत सोनलकडे बघून तिला कडेवर घेऊन म्हणत होता. 
" चला झाशीची राणी येताय ना ... ओढ्यावर... तलवार कुठे तुमची ? आमचा खांदा म्हणजे तुमचा घोडा " नचिकेत सगळयांना घेऊन ओढ्यावर निघाला. 
" रेणू हिला घेऊन जाऊ का ? " नचिकेतने रेणू ला विचारले.
" नग नग ती आणि कुठे अधे मधे करेल. मी घरला घेऊन जाते तिला. तुम्ही जावा समदी " रेणू तिची साडी व्यवस्थित करत बोलत होती. 
" बर झाशीची राणी पुन्हा या कधी तरी गड जिंकायला आता आम्ही गड पाहून येतो " नचिकेत तिला समजावतच रेणू कडे सोपवत म्हणाला. 

साक्षी रेणूकडे, सोनल कडे आणि नचिकेतच्या काळजी वाहू स्वभाव बघून भावुक झाली. नात्याला जोडणारी साथ फक्त नजरेने आणि कणखर खांद्यामुळे आपोआप मिळते याची प्रचिती तेव्हा साक्षीला नव्याने आली. सगळे ओढ्याच्या वाटेने निघाले. प्रवास खूप काही रोमांचक अनुभव देत सुरू होता. 

क्रमशः

No comments:

Post a Comment

३०. कृषी मेळावा

भाग : २८      मुंबईत साक्षी आपले पुढचे शिक्षण पूर्ण करत होती. ऍग्री प्रोडक्ट मार्केटिंगचा एम बी ए कोर्स ती तिच्या शहरातून करत होती. डिग्रीच्...