भाग : १७
वाड्यात गावातले वयोवृद्ध, जेष्ठ, शेतात काम करणारे मजूर आले होते. सुमित हॉस्पिटल मध्येच होता. अण्णानी सगळ्यांना आत बोलवले. आलेले सगळे गावकरी खाली बसले. अण्णा झोपाळ्यावर बसले. माई काय झाले पहायला बाहेर आली. भानू तिथेच शेजारी बसला होता. नचिकेत खाली आला. त्याने समोर बसलेली वीस, पंचवीस माणसं पाहिली. त्याने अण्णाना विचारले,
" हे सगळे इथे का आलेत ? "
अण्णा काहीच बोलले नाही. सगळीकडे शांतता होती. कोणीच काही बोलत नव्हते. भानू आधीच बाहेर कट्ट्यावर येऊन बसला होता. त्याने गावकर्यांच्या मनातलं ओळखलं होतं. नचिकेतच्या जवळ जाऊन हलक्या आवाजात त्याने सांगितले.
" दादा...हे सगळे मदतीच्या अपेक्षेने इकडे आलेत. या सगळ्यांनी काल तुम्हाला तिथे मदत करताना पाहिलय. हास्पिटलात बी काहींनी बघितलं, ते मदत मागायला आलेत. घराचं आणि शेताचं असं दोन बाजूनी संकट आलंय यांच्यावर. कोनी बी काय बी बोलणार न्हाई. तुम्ही एकेकाला येगळ घेऊन इचारल तरच बोलतील. "
अण्णाना कदाचित हे कळले असावे. त्यामुळे त्यांना काही बोलणे उचित वाटत नव्हते. अशा वेळी नचिकेतने जबाबदारी घेतली. त्यांना त्यांच्या बागेत दुसऱ्या दिवशी यायला सांगितले. नचिकेतचे बोलणे साक्षी ऐकत होती. बाहेरची गर्दी आणि गर्दीत हरवलेली माणसं तिला चित्रपटातल्या कथेसारखे वाटू लागली, पाहता पाहता एक एक उठून जाऊ लागले. जाताना कित्येकांनी नचिकेतचे पाय धरले. सगळे गेल्यावर एक सहा वर्षाची मुलगी हातात बाहुली घेऊन मागून आली. नचिकेतच्या पायाला हात लावून गेली. तिला थांब म्हणे पर्यन्त तिने दार ओलांडले होते.
नचिकेतने आपल्या मळ्याचा काही भाग त्यांना राहण्यासाठी तयार करण्याचं ठरवलं. काही दिवसांची जेवणाची ही तजवीज केली. भानूच्या मदतीने गावकर्यांच्या आठवड्याच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली.
दुपार पर्यन्त सारे काम सुरू होते. संध्याकाळच्या वेळी नचिकेत सुमितला घेऊन त्या जागेवर गेला. आठ ते दहा बिऱ्हाड राहण्याची तात्पुरती सोय झाली होती. काम करणारे हात त्यांचेच होते. प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही देत होता.
तेवढ्यात तिथे आदल्या दिवशी पाहिलेली ती मुलगी आली, बाहुली घेऊन आलेली ती मुलगी आपल्या ओढणीने जमीन पुसून काढत होती. एका हातात घट्ट मुठीत पकडलेली बाहुली आणि दुसऱ्या हातात तिची ओढणी. त्याने जमीन पुसत पुसत ती पुन्हा नचिकेतच्या पायाशीच येऊन थांबली. तिला नाव विचारलं तर ती काहीच बोलली नाही. " माझ्या बाहुलीला घर पाहिजे " इतकंच म्हणली. नचिकेत तिला घेऊन घरी आला. तिला भानूच्या खोलीत बसवले. जेवायला दिले. रात्री ती तिथेच झोपली. एका कुशीवर, आपल्या बाहुलीला घट्ट मिठी मारून झोपली. तिला पाठमोरी झोपलेले साक्षीने पाहिले. ठिगळ पडलेल्या तिच्या झग्याने स्वतःचे पाय झाकत झाकत ती झोपली होती. साक्षी तडक आपल्या खोलीत आली. सोनलसाठी तिने आणलेला अबोली रंगाचा फ्रॉक तिने हातात घेतला. क्षणभर तिला तो फ्रॉक घालून बागडणारी सोनल तिथे दिसू लागली. नंतर तिथे झोपलेल्या मुलीच्या अंगावर तो फ्रॉक असावा असं तिला क्षणभर वाटून गेलं. डोळ्यातून पाणी आले. ते थेट त्या फ्रॉकवरच्या फुलांवर पडले. तो फ्रॉक घेऊन ती भानूच्या खोलीत आली. त्या शांत झोपलेल्या मुलीच्या जागी तिला सोनल दिसत होती. रेणूला घट्ट मिठी मारून झोपणारी सोनल. फरक फक्त इतकाच होता, हिच्या मिठीत बाहुली होती. तो फ्रॉक तिने त्याच बाहुलीच्या बाजूला ठेवला आणि तिथून निघून खोलीत आली. आकाशात शून्य नजरेत पाहत खिडकीशी बसली. सोनलची आठवण योग्य ठिकाणी पोहोचल्याचे समाधान तेव्हा तिला मिळाले होते. ती आकाशात पाहत होती, चांदण्यात तिला इकडे तिकडे बागडणारी सोनल दिसत होती. बदलत जाणाऱ्या ऊन सावलीच्या खेळात आजूबाजूची परिस्थिती बदलत होती. बदलत जाणारी वेळ मात्र खूप काही शिकवत होती.
क्रमशः
No comments:
Post a Comment