भाग : २३
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे घरची सगळीच मंडळी नचिकेतसोबत मळ्यात गेली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. अंधुकशी उद्याची चिंता होतीच पण त्या दिवशी सगळ्यांनी जमेल तितक्या आठवणी जमवल्या. गेल्या गेल्याच नव्या सेट अप चे दर्शन सगळ्यांनी घेतले. साक्षीचा त्यातला सहभाग पाहताना साक्षीच्या वडिलांना तिचा अभिमान वाटला. साक्षीच्या आईने मुंबईत दाखवण्यासाठी तिथले फोटो काढले. दुपारी जेवण झाले. गप्पा गाणी आणि नंतर ओढ्यावरचा सूर्यास्त पाहून सगळे घरी गेले. तिथला ओढ्यावरचा सूर्यास्त सुमतीच्या ही आठवणीत राहिला. दिवसभराच्या कामानंतर आणि विरंगुळा नंतर घरी गेल्यावर फारशी ऊर्जा राहिली नव्हती. माईने मक्याची कणसे चुलीवर भाजली. कणसे खायला सगळे खाली बसले. कणसे खाऊन झाल्यावर भानू म्हणला,
" साक्षी ताईला आम्ही आता समदिकडे तुमच्या शहरी भाषेत काय म्हणतात ते तुम्हाला मिस करणार. "
सुमित आणि आराध्याने ही साक्षीच्या बाबांना तिला अजून काही दिवस तिथे थांबण्याची गळ घातली. तेव्हा बाबा काहीच बोलले नाही. रात्रीची जेवण आटोपून सगळे लगेच झोपले.
दुसऱ्या दिवशी आपले सामान सुमान घेऊन साक्षीचे आई बाबा खाली न्याहरीला आले. साक्षी रात्री फार थकलेली असल्याने तिला फार काही सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांच्या हातात असलेल्या बॅग पाहून साक्षी म्हणाली,
" बाबा माझं सामान वरच आहे. भरायचे अजून. मी आले थांबा माझी बॅग घेऊन "
बाबा म्हणाले " साक्षी बेटा... तुझी बॅग राहूदे वरच. तुझं काम तू पूर्ण करून ये. आता आम्ही निघतो. मला सुट्टी अगदीच दोन दिवसाची मिळाली. नाही तर अजून थांबलो असतो. "
" बाबा... पण ... " - साक्षी
" हो ... बेटा मला काल नचिकेत जी नी सांगितले सगळे. तुमचे काम मोठे आहे. इथल्या लोकांसाठी करतेस ना. काम अर्धवट सोडून येऊ नको. पूर्ण कर आणि घरी ये " - बाबा
" खरंच बाबा " आंनदाच्या भरात तिने बाबांना मिठी मारली.
" आई, मी लवकरात लवकर इथलं काम संपवून येते. " साक्षीच्या आई बाबांचा निरोप घ्यायला घरचे मोठे मंडळी जमले होते. सकाळची वेळ होती रेणू, माई आणि अण्णा आवरुन आले होते. बाकी सगळे आपापल्या खोलीत झोपले होते. त्यामुळे त्यांचा निरोप घेऊन आई बाबा मुंबईला निघाले. तासभरानी नचिकेत, आराध्या, सुमित, भानू सगळे आले. त्यांना साक्षीचे आई वडील परत मुंबईत गेल्याचे कळले.
सुमित म्हणाला " आले आणि गेले ही ! थांबायला हवे होते ना अजून काही दिवस ... "
आराध्या म्हणाली, " साक्षी पण तुझ्यावरच मोठं टेन्शन हलकं झालं बघ, आता पूर्ण लक्ष घालून द्राक्षाच्या प्रोसेसिंगच काम हातात घेशील. "
नचिकेत म्हणाला " हो तर ... काही दिवसांचा प्रश्न आहे साक्षी ... व्ही विल डू इट "
साक्षीला पुन्हा नव्याने हुरूप आला.
काही दिवस नव्या कलमांची चाचणी, कीटकांचा प्रादुर्भाव आणि नव्याने सुरू केलेले तांत्रिक काम सगळ्यात झोकून देऊन काम सुरू झाले.
फळांचा ज्युस काढुन त्याचे निर्जंतुकीकरण करणे आणि फरमेन्ट करायला ठेवणे ही प्रक्रिया होती. ते करताना मध्ये मध्ये त्याची क्वालिटी पाहत राहणे. यासाठी चाचण्या सुरू होत्या. दिवस संपून रात्र कधी होत कळत नसे. बराच वेळ आराध्या ही कंपनीतुन येऊन साक्षीला मदत करत असे. नचिकेतला या दरम्यान बरेच बाहेर ही फिरावे लागले. भानू आणि नचिकेत यांच्या शहराच्या ठिकाणी सतत फेऱ्या होऊ लागल्या.
साक्षी एक दिवस बराच वेळ तिथेच प्रयोगशाळेत थांबली होती. भानू नचिकेत शहरातून समान आणून तिथे ठेवणार होते. त्यामुळे ते ही तिथेच येत होते. रात्रीचे नऊ, सव्वा नऊ वाजले होते. रात किड्यांचा आवाज होता. साक्षीसोबत तेव्हा तिथे रेणू होती. रेणूच्या मदतीने ती काही तरी काम करत होती. अशात अचानक दिवे गेले. काय झाले पाहायला रेणू बाहेर आली. दूरवर नजर फिरवली. तिला फारसा अंदाज लावता आला नाही. थोडी आणखी पुढे गेली. योगायोगाने तेव्हा नचिकेत आणि भानू ही तिथेच समोरून येताना दिसले. रेणूच्या हातात कंदील होते. त्याच्या प्रकाशात तिने त्यांना ओळखले.
रेणूने पुढे जाऊन दोघांना सांगितले " भानू रे... तिथं दिवे गेलेत, आपण बघूया का काय झालं ते ? तिथे काम राहिले साक्षी ताईचं "
" अचानक काय झालं ? आत कोण आहे आता ... " - नचिकेत
" आम्ही दोघी होतो... साक्षीताई आहे आता आत " - रेणू
" ती एकटीच आत आहे का ... भानू जा, पाहून ये, तिथे काय सिरियस इशू आहे का ? अचानक वीज कशी गेली ? " - नचिकेत
" दादा मी बी जाते " - रेणू
" बरं जा ... " - नचिकेत
" इतका वेळ झाला तुम्ही इथे कसे " - नचिकेत
" अहो दादा... साक्षी ताईंना काही तरी काम होते. त्यासाठी थांबावं लागलं होत. " - रेणू
" तुम्ही तिथं जा... त्या एकट्याच आहेत " - रेणू
इतक्यात काचेची वस्तू पडून फुटल्याचा आवाज प्रयोगशाळेतुन आला. तिघेही घाबरले. नचिकेत रेणूच्या हातचे कंदील घेऊन धावत तिथून प्रयोगशाळेकडे आला. इथे अंधारात एक दुर्घटना घडली होती.
क्रमशः
No comments:
Post a Comment