भाग : ३
" गोडीवली " हे आराध्याचे गाव. तिथे तिचं छोटसं प्रेमळ कुटुंब. चार तासांच्या प्रवासानंतर साक्षी आणि आराध्या गोडीवली स्टेशनात दाखल झाले. तिथून पुढे प्रवास एस टी चा होता. पुढचा अर्धा तास आराध्या साक्षीला तिच्या गावाची सगळी ठाव ठिकाणं सांगत, तिथल्या प्रत्येक जागेची, तिथल्या लोकांची विकिपीडिया झाली होती.
माई, आण्णा, नचिकेत, सुमित, राणू ताई, भानू, राघू
आतापर्यंत आराध्या कडून इतके ऐकल्यावर ही सगळी मंडळी पाहण्याची आणि त्यांना भेटण्याची इच्छा साक्षीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. एका अरुंद वाटे शेजारी एस टी येऊन थांबली. शेजारी त्याला लागूनच मोठा ओढा होता.
" वाह ... ही नदी किती छान दिसते आणि ते टेम्पल कुठलं ? रस्ता कुठे इथून पुढे ? " साक्षी गाडीतून खाली पाऊल टाकलं नाही की तिची नजर सगळं आजूबाजूला टिपत होती.
" अग, ही नदी नाही. ती पुढे आहे. या ओढ्यातून शेताला पाणी जातं आणि त्या मंदिराच्या बाजूला आहे ना छोटी वाट, आपल्याला तिथून जायचं आहे घरी...चल " आराध्याने तिचा हात पकडला आणि त्या दोघी घरच्या वाटेला लागल्या.
बरीच वर्षे घरापासून लांब असूनही आराध्या घराकडे जाणारी वळणे विसरली नव्हती. आयुष्यात येणारी पुढची वळणे मात्र तिला आणि साक्षीला बोलावत होती. मंदिराच्या समोरचा नंदी होता स्वागताला. त्याला नमस्कार केला आणि थोडं पुढे जावं तर समोर भला मोठा शेळ्यांचा कळप येऊन उभा राहिला. दूरवर काळ्या करड्या रंगाची छटा पसरलेली होती. मेंढरांचा आवाज तर होताच त्यातून आणखी मोठ्याने " ऐ चिंगी... ए सुमी... हे हे सरा तिथं सरा चला ... " अशी आरोळी देत भानू समोर आला.
भानूला समोर पाहताच आराध्या पुढे आली.
" भाऊ ... इकडे ... मी इकडे " आराध्या शेळ्यांच्या मधून वाट काढत आणखी पुढे आली. साक्षी मागेच राहिली. थोडी बिथरलेली.
भानू लांबून पाहूनच मोठ्यानं बोलू लागला " ए मैना ... तू हित गावी... माई - आण्णाला ते सरप्राईज काय ते बोलतात ते द्यायचं व्हतं का ? दादा काही म्हनले न्हाई, तू येतीस ते. आलो असतो न्हाई तरी मी घ्यायला ... काय ग... ! "
" अरे हो भाऊ सांगते थांब ना ... या चिंगी, सुमीला साईडला घे आधी ... माझी मैत्रीण घाबरेल नाही तर ..."
" साक्षी ... अरे साक्षी तू तिथेच राहिली... ये ना पुढे "
" अग ताई थांब ... तिला जमायचं न्हाई ...आपण तिथं जाऊ " भानू म्हणला.
वाटेतल्या सगळ्या मेंढराना बाजूला करत दोघे साक्षी जवळ आले. आराध्या बोलू लागली
" ही माझी मैत्रीण साक्षी उर्फ सायरन. ही अन मी आता काही दिवस इथेच आहोत गावी भाऊ. माझ्या सोबत आली ती. आमचं इथे काम सुरू होणार आहे भाऊ "
साक्षीकडे बघत आराध्या म्हणली " आणि साक्षी, हे भानूप्रताप मी यांना भाऊ बोलते. शेतात दादा सोबत असतात. आपल्या शहरातल्या सायंटिस्टपेक्षा पण वेगळे प्रश्न यांना सतत पडत असतात आणि भाऊ ते सतत तिथे कोण असेल त्याला विचारत असतात. एकदा गाडी सुरु झाली की डायरेक्ट जगाच्या उत्तर ध्रुवावर येऊन थांबते. आमच्या गोडीवलीचे सायंटिस्ट आहेत भाऊ... "
" ही सगळी आजूबाजूला दिसतात ना, ते यांचे मित्र, मैत्रिणी ... ही सखू, ही सुमी, चिंगी ... हो ना भाऊ " आराध्या गालातल्या गालात हसत भाऊंकडे बघत होती.
" भाऊ... मी पण तुम्हाला भाऊच बोलू का भाऊ "
भानू थोडा शरामल्या सारखा झाला पण नंतर विषय बदलत विनोदात म्हणला " हो ताई... बोला की तस बी आता तेच म्हनला ना तीन येळा " कानाला सवय झाली आता ... "
" भाऊ, घरी येताय ना ... चला आम्हाला घरी सोडा."
" या सगळ्यांना पण घेऊन जाऊया का ? " साक्षी हसत हसतच त्या कळपाला पाहत म्हणाली.
" सुमी... चिंगी ... " तीन जण सगळा कळप घेऊन घराच्या दाराशी आले. त्यांचा आवाज आणि त्यावर या सोबतच्या मित्रपरिवाराची साद.
" आलं बघा ताई घर. निघतो मी आता. पहाटेला येतो " भानू म्हणला.
बाहेरचा आवाज ऐकून काय झाले ते पाहायला नचिकेत बाहेर आला. वाड्याच्या दारात बरीच गर्दी झालेली पाहिली. माणसांपेक्षा प्राणीच जास्त होते. नचिकेत पाहत मिनिटभर तिथेच उभा राहिला.
क्रमशः
भाग १ व २ आधी मला व्हाॅट्सअपला पाठव ...छान लिहीलंस उत्कंठा वाढलेय .... व्हाॅट्सअप नं. मेसेंजरवर चेक कर
ReplyDeleteथँक्स
ReplyDelete