Friday, 10 January 2025

२. खुश खबर

भाग : २

" बोला आरु मॅडम. आज सकाळी सकाळी आठवण कशी झाली ? काय विशेष ? " साक्षी कानाजवळ फोन आणून बोलू लागली. 

" तू आज आली नाहीस वरून मलाच विचार हो, आठवण कशी झाली ते ! तुम्ही विसरला वाटत आपलं शेवटचं वर्ष आहे. आपल्याला कामगिरी दिली आहे. ती पूर्ण करण्यासाठी आपण किती फेऱ्या मारल्या होत्या " आराध्या पुढे बोलु लागली. 
  
" आठवलं का ? पी व्ही कंपनीत आपण प्रोजेक्टसाठी ऍप्लिकेशन दिले आहे. त्याच अप्रुवल अजुन आलं नव्हतं." 

साक्षी फोन घेऊन सोफ्यावर पहुडलेली तशीच झटकन उठून बसली.

 " अरे यार ... हो आज आपल्याला कॉलेजमध्ये पण ऍप्लिकेशन द्यायचे होते ना ..." 

 " हो तेच ते. आहे कुठे तू अग आपलं जायचे आज कन्फर्म झालं " आराध्या आनंदात मोठ्या आवाजात फोन वरून बोलली. 

" काय...सिरियसली... " साक्षी बोलता बोलता सोफ्यावरुन उभी राहीली.

" येस... आता पुढची तयारी करायची. मला खूप काही गोष्टी घ्यायच्या. सगळे प्रिपरेशन बाकी आहे. " 

" बर झालं यार तू लगेच मला कॉल केला. पुस्तकं घ्यायची आहेत. नवीन कपडे घ्यायचे. एक बॅग, बरंच काही राहिले. लिस्ट बनवायला घेते. वा वा ! " साक्षीची बडबड सुरूच होती. 

आराध्या तिला शांत करत म्हणली, 
" हो, हो...ते झालं पण त्याआधी साक्षी मॅडम तुम्हाला तुमचा चेहरा इथे प्रोफेसर मुंगळेना दाखवावा लागेल. त्यांना रीतसर सांगावं लागेल तुझं प्लॅनिंग. " 

" तू माझ्या गावी येत आहेस ना; हे कुठे सांगितले अजून आपण. ते पण सांगायचं हो,  नंतर उगाच त्यावर चर्चा नको. " 

" होय ग आरु... मला घरी पण सांगायचे अजून... डोन्ट वरी ... मी येते ना उद्या " फोन वरचे बोलणे संपले. साक्षीने फोन ठेवला.

         दुसऱ्या दिवशी दोघी वर्गात आले नाही की आधी मुंगळे मॅडमची लगेच भेट घेतली. परवानगी मिळाली. दोघींचे नियोजन तयार होते. आता फक्त घरी ही बातमी द्यायची की पुढच्याच आठवड्यात त्यांची रवानगी " गोडीवली " - आराध्याच्या गावी होणार होती. 

        कॉलेज सुटल्यावर आनंदात घरी येऊन साक्षीने तिचे सगळे सामान आवरून वस्तू जागच्या जागी ठेवल्या. घरी जेवणाच्या वेळी पुढाकार घेऊन भाजी, कोशिंबीर बनवली.  साक्षी सगळे काम करताना पाहून आईला आश्चर्य वाटले. शेवटी ती वेळ आली. जेवणाच्या ताटावर बसताच आईने पहिला प्रश्न विचारला;

" आज कॉलेजमध्ये काही विशेष कार्यक्रम होता का ग ... खुश दिसतात राणी साहेब ! " 

" नाही ग... विशेष काय असणार, रोजचेच आपले लेक्चर आणि प्रॅक्टिकल." नंतर काही तरी आठवल्याचा आव आणत साक्षी पुढे म्हणाली

 " अरे हो ... तुला एक सांगायचं राहिलंच की, आमचा शेवटच्या वर्षाला सहा महिन्यांचा एक प्रोजेक्ट असतो. कॉलेजकडूनच असतं हे बरं... त्याला मार्क आहेत. "

आई तिच्याकडे प्रश्नार्थक कटाक्ष टाकून म्हणाली, 
" मग त्याच काय आता ? " 
 
" अगं, एक पी. व्ही नावाची वायनरी आहे सातारा जिल्ह्यात. तिथे मी आणि आराध्याने आमच्या या प्रोजेक्टसाठी ऍप्लिकेशन केलं होतं." 

" आज तिथून आणि कॉलेजकडून पण आम्हाला ग्रीन सिग्नल मिळाला. " 
" तर ...तर ... आ ...आम्हाला पुढच्या आठवड्यात तिथे जॉईन व्हायचे, त्या आधी तिथे जावं लागेल. "  साक्षीने पुढे सगळे आतापर्यंत ठरवलेले नियोजन सांगितले.

साक्षी थोडा उत्साह आणि थोडी चाचपतच सांगत होती. ती पुढे बोलू लागली,

 " आणि ... आणि ती वायनरी जिथे आहे ना ... तिथून जवळच आराध्याचे गावचे घर आहे. आम्ही दोघी राहू तिथे. तिची खुप मोठी फॅमिली आहे. "

" अग ... तुला माहिती आहे का ? तिचे मोठे घर आहे  तिथे ... मोठं शेत पण आहे. मी जाऊ ना... बाबा जाऊ ना ... " साक्षी प्रत्येकाचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होती. त्यावरून अंदाज बांधत होती.  बाबांनी आईकडे पाहिले आणि ती काही बोलायच्या आधी म्हणले,

" अरे वा... ऑल सेट आहे तर ... छान साकु, तू जा बिनधास्त. नवीन शिका काही तरी, आणि  हो आठवण आली की या बाबाला लगेच बोलवून घे, तुला आवडतंय ना ... गो अहेड " 

" आधी तरी सांगायच की नाही पोरीने, उद्या जायचे आणि आज सांगते. अशी ही तुमची मुलगी, मग काळजी वाटणार ना ! " 

" अजून काही तयारी पण केली नसेल राणी साहेबांनी, आणि निघाल्या. " 

" मी करते ग आई सगळं व्यवस्थित... तू उगाच काळजी करते " साक्षी तिचे मन वळवण्यात गुंतली होती.

" हो अग ...जा तू ... तुला मी नाही म्हणते का ! फक्त वेळीच सांगत जा ना इतकंच म्हणले. बर तुला काही बनवून ठेवायचं असेल तर तस सांगून ठेव मला तस सामान आणायला म्हणजे... " 

" येस्सस ... " साक्षी ताटावरुन उठली आणि लगेच आई बाबांच्या ताटाजवळ गेली. बिलगली. 

" बरं... बरं... आता पहा आनंद चेहऱ्यावर... जेवून घे जा आधी; अजून आहेत ना काही दिवस " आई म्हणाली.  साक्षी चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून आपल्या ताटासमोर बसली.
    
सगळ्यांची जेवण आटोपली. टेबलवरचे आवरून  साक्षी रूम मध्ये गेली. वही पेन घेऊन लगेच लिस्ट करायला घेतली. विचारांच्या शृंखला बांधत लिस्ट आणि पेन कधी बाजूला पडले आणि साक्षी तिच्या नव्या प्रोजेक्टची स्वप्न पाहण्यात रमली कळले नाही. आराध्याच्या गावी काय काय करायचं ?  काय पहायचं ? याचा विचार करत करत बेडवर झोपून गेली. दुमडलेली वही आणि वरच्या पानावरची लिस्ट आणि पेन साक्षीच्या हाताशी तसाच राहिला. 

क्रमशः 

No comments:

Post a Comment

३०. कृषी मेळावा

भाग : २८      मुंबईत साक्षी आपले पुढचे शिक्षण पूर्ण करत होती. ऍग्री प्रोडक्ट मार्केटिंगचा एम बी ए कोर्स ती तिच्या शहरातून करत होती. डिग्रीच्...