Friday, 3 January 2025

४. फोनची बेल

भाग : १

        रेवती अपार्टमेंट, तिसरा मजला, गाढ निद्रेत असलेल्या साक्षीचा फोन खणा खणा वाजत होता. तो ही बाहेरच्या खोलीत. सकाळची वेळ. आईची कामांची उजळणी सुरू होती. 

सुमती... साक्षीची आई. सतत ती कामाच्या मागे आणि कामे ही तिच्या मागे. पुढे हे करायचे मग ते आणि मग हे राहिलेच. दुपारी याला वेळ द्यायचा. आज हे पूर्ण होईल का ? एक ना धड अशी न संपणारी तिची कामे. वाण समानाच्या यादी प्रमाणे आज ही कामाची यादी सुरूच होती. त्यात हॉल मध्ये सोफ्याच्या मागे कोपऱ्यात पडलेला साक्षीचा फोन वाजला. साक्षी तिच्या खोलीत पलंगावर रात्रीच्या स्वप्नात, गाढ झोपेत आणि तिचा वाजणारा फोन इथे सगळ्या कामाचा खोळंबा करायला होता. असे हे थोडे गतिमान आणि उत्साही गोंधळून टाकणारे वातावरण साक्षीच्या घरी. सुमती हातातली कामे बाजूला ठेवून वाजणाऱ्या फोनच्या शोध मोहिमेवर. हॉलच्या कोपऱ्यात सोफ्याच्या मागे कोणी वाली नसावा तसा तो पडलेला दिसला. फोन हातात घेत घेत सुमतीने साक्षीला हाक मारली. ती काही उठली नाही. पुन्हा एक मोठी साद थेट हॉलमधून चार भिंती पार करत करत साक्षीच्या कानावर येऊन आदळली. साक्षी खडबडून जागी झाली. त्याच दरम्यान घड्याळ ही वाजू लागले. सकाळचे अर्धे प्रहर पूर्ण होऊन दहाचा सूर्य खिडकीतून डोकावत होता.  या उत्साही वातावरणात डोळ्यावरची झोप झटकून साक्षी पलंगावर उठून बसली. साक्षीच्या खेळकर, बिनधास्त वागण्यावर सुमतीचे बारीक लक्ष असायचे. तिच्या बेफिरपणा वर सुमतीकडून कायम ऐकायला लागतं.

आज ही दिवसाची सुरुवात तशीच काहीशी झालेली होती. साक्षीच्या रूम मधून डोकावतानाच सुमतीने त्याची सुरवात केलीच होती. साक्षी आणि तिचा फोन घराच्या दोन टोकाला इतके काय ते निमित्त. साक्षी येईपर्यंत सुमतीने फोन उचलला. फोन वर नाव सेव्ह होते " आराध्या ".

 फोन उचलला की लगेच  पलीकडून आवाज आला,

" सायरन ...आली का नाही ग कॉलेजमध्ये. सांगायचं तरी ? उद्या नोट्स देतच नाही तुला मी आजच्या... सांग ना काय झालं ? " 

एकूणच फोनवरचा आराध्याचा स्वर ऐकून थोडे गालातल्या गालात हसून सुमतीने उत्तर दिले, 

" सायरनची आई बोलते मी ...अजून सायरन वाजला नाही सकाळचा... साक्षी झोपली आहे. तिचा अलार्म माझ्या हातात आहे...आराध्या " 

बावरलेली आराध्या मिनिटभर शांत झाली. मग पलीकडून जीभ चावून दबक्या आवाजात ती बोलायला लागली, 

" अच्छा काकू ...सॉरी सॉरी ... साक्षीला फोन लागला का ? चुकून लागला वाटतं ... सॉरी काकू मला ना दुसऱ्याच नंबर वर फोन करायचा होता. "

" मी फोन ठेऊ का ? "  आराध्याने म्हणले. 

" असे आहे का ? " सुमतीने ही जाणून बुजून फिरकी घेत विचारले. 

" अच्छा अच्छा, आज सुट्टी आहे का ग कॉलेजला ? साक्षी अजून उठली नाही... मला काही बोलली नाही तशी ती? "

" नाही ना काकू ...सुट्टी नाही उलट आज महत्त्वाची नोटीस आली होती. ती आली का नव्हती ? तिला फोन देता का एकदा ? " 
 
" हो देते की फोन लागलाच आहे तर त्यानिमित्ताने बोलणे होईल ना तुमचे... चुकून लागला फोन तर कुठे बिघडले." सुमतीने हसत हसतच उत्तर दिले.

 सुमतीने साक्षीला हाक मारली. " साक्षी ....ए साक्षी आराध्याचा फोन आहे. येतेस का बाहेर ? " साक्षी तो पर्यंत उठलीच होती. 
 
" आराध्या ...अरे यार ...आले थांब "  बाहेर येताच तिने सुमतीच्या हातून फोन घेतला.

" काय ग, हा फोन इथे... तू तिथे ... किती वेळा सांगितलं सोबत ठेवत जा तरी नाही ... बॅटरी पण संपली बघ त्याची आता कसे बोलणार मैत्रिणीशी " 

" अग दे तरी ...मग बोलेन ना. अजून संपेल बघ बॅटरी आता. देना दे लवकर... " 

" घे... तू आणि तुझ्या वस्तू सारख्याच अस्ताव्यस्त. एक उत्तर ध्रुवावर तर दुसरे दक्षिण ध्रुवावर ! कधी शिस्त लागणार देव जाणे " सुमतीने फोन दिला. बडबडतच ती आत गेली. 

" मला समजेल ना तसे सगळयात आधी तुलाच सांगते ग आई."

" दे आरु माझी वाट बघते तिकडे." मिश्किल हसत हसतच साक्षीने फोन कानाला लावला. 

क्रमशः 

No comments:

Post a Comment

३०. कृषी मेळावा

भाग : २८      मुंबईत साक्षी आपले पुढचे शिक्षण पूर्ण करत होती. ऍग्री प्रोडक्ट मार्केटिंगचा एम बी ए कोर्स ती तिच्या शहरातून करत होती. डिग्रीच्...